मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त १५ एप्रिलला तर १२ मेला लईराई देवीची जत्रा

जाणून घ्या 'सात बहिणी आणि एका भावाची कथा'

Story: वेब डेस्क | गोंवण वार्ता |
12th April, 05:00 pm
मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त १५ एप्रिलला तर १२ मेला लईराई देवीची जत्रा

पणजी : पुरातन काळापासून गोव्याने सांस्कृतिक, सामरीक, वैचारिक आणि भौगोलिक अशी अनेकविध स्थित्यंतरे पाहिली. याच विविध गोष्टींच्या माध्यमातून गोव्याची संस्कृती आणि समाज यांची विण पक्की झाली. विविध परकीय आक्रमणांचा हाही परिणाम होता की तत्कालीन समाज अधिक जवळ आला. कुळदैवत,ग्रामदैवत, मुळपुरुष यांसोबतच सीमेपुरुष, राखणदार, सातेरी, वेताळ सारख्या देवतांचेही पूजन होऊ लागले. विविध धारणा,सण,परंपरा उदयास आल्या. यातूनच देविदेवतांशी निगडीत अनेक कथा-दंतकथा देखील प्रचलित झाल्या. याच दंतकथांनी येणाऱ्या भावी पिढीला मार्ग दाखवला. या देवतांशी समाजाची विण इतकी घट्ट बसली आहे की कामानिमित्त बाहेर गेलेला चाकरमानी उत्सवाच्या वेळी हमखास परत येतोच. म्हापसा येथील मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त १५ एप्रिलला होत आहे तर १२ मेला शिरवागच्या लईराई देवीची जत्रा होत आहे. गोव्यात प्रचलित कथांमध्ये सात बहिणी आणि एका भावाची कथाही प्रसिद्ध आहे.

शिरगावची श्री लईराई आणि तिच्या सहा भगिनी तसेच त्यांचा भाऊ खेतोबा हे आठजण दक्षिण प्रांतातून घाटमाध्यावरून गोव्यात आले. ही आठही भावंडे गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक बनले. यापैकी एका देवतेच्या उत्सवात अन्य देवतांचा सहभाग हा असतोच. यंदा म्हापशाच्या मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त १५ एप्रिल रोजी साजरे होणार असून, मे महिन्याच्या १२ तारखेला शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा पार पडणार आहे.Goan Varta: दुग्धशर्करा योग! श्री लईराई देवीची जत्रा, मिलाग्रीस फेस्त एकाच  दिवशी

प्रचलित कथेनुसार, गोव्याच्या या सात बहिणींमध्ये केळबाई, महामाया, मोरजाई, शीतला देवी, मीराबाई उर्फ मिलाग्रीस, अंजदीपा, लईराई या सात देवींचा समावेश होतो. तर खेतोबा किंवा खेतलो हा त्यांचा धाकटा भाऊ म्हणून पूजला जातो. ही भावंडे कदंब-पूर्व काळात गोव्यात आल्याचे काही दंतकथांत वर्णन आढळून येते. ही आठ भावंड ऋषींची अपत्ये असून संकटकाळी त्यांनी स्थलांतरण केले अशी मान्यता आहे. घाटमाथ्यावरून हत्तीवर बसून त्यांनी गोव्याचे डिचोली गाठले. यावेळी डिचोलीचे ग्रामदैवत श्री शांतादुर्गेने त्यांचे स्वागत पाऊणचार केले. दुसऱ्या दिवशी आठही भावंडं आपल्या डौलदार हत्तीवर बसून मये येथे पोहोचल्या. रात्रीचा स्वयंपाक करण्याचा बेत आखला गेला. पण अन्न शिजवण्यासाठी अग्नि नव्हता. त्यामुळे त्यांनी खेतोबास अग्नी आणण्यासाठी पाठवले. सरपण शोधत खेतोबा वायंगण गावात पोहोचला. इथे त्याला मुले खेळताना दिसली. मुलांना खेळताना पाहताच खेतोबा आपल्याला दिलेले काम विसरला आणि खेळ बघण्यात दंग झाला. त्याला वेळेचे भान राहिले नाही.Goan Varta: कथा देवी केळबाय आणि भावंडांची

इकडे मयेत सातही बहिणी चिंतातुर झाल्या. थोरली बहीण केळबाईने लईराईला त्याच्या शोधात पाठवले. वायंगण येथे पोहोचताच त्यांना खेतोबा खेळ पहाण्यात रमल्याचे दिसले. ते पाहून लइराईला क्रोध आला. क्रोधामध्ये तिने भावावर लाथ उगारली. क्रोधात लईराईने उगारलेली लाथ चुकवण्यासाठी भाऊ खेतोबा कमरेत वाकला, तेव्हापासून त्याची कंबर वाकडीच राहिली. क्रोध शांत झाल्यावर लईराईला स्वतःची चूक कळून आली. तिने खेतोबाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आपल्याबरोबर येण्यास सांगितले. पण घडलेल्या प्रकारामुळे खेतोबाने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार देऊन तिथेच राहणे पसंत केले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आजही वायंगणमधील मंदिरातील खेतोबाची मूर्ती अशाच तोल गेलेल्या तिरक्या स्थितीत दिसते.

खेतोबाला फटकारल्याबद्दल सर्व बहिणींनी लईराईला सूनावले. यामुळे क्षुब्ध झालेल्या लईराईने, तिच्या पाचशे भक्तांसह अग्नीतून चालत अग्निदिव्य करेल आणि आपले निर्दोषत्त्व सिद्ध करेल असे सांगितले. तिच्या अनुयायांना धोंड म्हणतात. तेव्हापासून शिरगाव येथील वार्षिक जत्रेत होमकुंडातून चालत जात अग्निदिव्य करण्याची प्रथा रूढ झाली. दरवर्षी पंचांगानुसार, वैशाख शु. पंचमीला शिरगांवात सुप्रसिद्ध होमखंडाची जत्रा भरते. या होमखंडातून हजारोंच्या संख्येत देवीचे धोंडगण व श्री लईराई मातेचा कळस घेऊन अग्निदिव्य पार करतात. होमखंडातील जळत्या निखाऱ्यांवरून धोंड धावत जातात.शेकडो वर्षांची धोंड परंपरा जतन; आगरवाडा येथील लईराई देवीचे व्रत सुरू -  Marathi News | preserve hundreds of years of dhond tradition vrat of lairai  devi in agarwada begins | Latest goa

लईराईच्या अग्निदिव्याने केळबाईला वाईट वाटले, आपल्या अज्ञानामुळे आणि निष्काळजीपणामुळे हे घडले म्हणून डोक्यावर अग्नी घेऊन चालण्याचे प्रायश्चित्त  घेतले. तेव्हापासून दरवर्षी मयेत चैत्रशुद्ध अष्टमीला महामायासोबत केळबाईची ‘माल्याची जत्रा’ भरते. या दिवशी भक्ताच्या अंगात देवीचा अवसर येतो. हा अवसर पेटलेले माले डोक्यावर घेतो. झाल्याप्रकाराने सर्व बहिणी शांत झाल्या. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थायीक होण्याचा निर्णय घेतला. लईराई शिरगावात, मोरजाई मोरजीत, अंजादीपा कारवार येथे विसावली. त्याकाळी वेताळाने मये गावात धुडगूस घातला होता. तेव्हा मुळगावहून महामायेसह केळबाई मयेत आली. तेव्हापासून मुळगावातील केळबाई दरवर्षी मयेमधील महामायेला भेटायला जाते अशी आख्यायिका आहे. शीतलाई पाताळात गुप्त झाली. माल्याच्या जत्रेतील गीतांशीवाय तिचा अन्यत्र उल्लेख सापडत नाही. मयेत तीची छोटीशी घुमटी आहे.Shirgaon Lairai Devi And The Seven Sisters Of Goa - Inditales

दरम्यान म्हापशात स्थायिक झालेल्या मिराबाईचे पोर्तुगीजांच्या काळात मिलाग्रीस झाले व मंदिराचे चर्चमध्ये रूपांतर करण्यात आले. या मिराई किंवा मिलाग्रीसची हिंदू आणि ख्रिस्ती बांधव भक्तिभावाने पूजा करतात. लईराईच्या जत्रेनिमित्त मिलाग्रीस सायबीण मोगऱ्यांची फुले पाठवते व मिलाग्रीस फेस्ताच्या निमित्ताने लईराई तेल पाठवते. गोव्याच्या लोकसंस्कृतीची जडण घडण ही सामाजिक सलोख्यातून विणली गेली आहे. यंदा म्हापशाच्या मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त १५ एप्रिल रोजी साजरे होणार असून, मे महिन्याच्या १२ तारखेला शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा पार पडणार आहे.

हेही वाचा