ओडिशात आयाराम-गयारामांना सुगीचे दिवस

Story: राज्यरंग |
11th April, 10:57 pm
ओडिशात आयाराम-गयारामांना सुगीचे दिवस

देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरत आहे. ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. येथील मतदान १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून अशा चार टप्प्यांत होत आहेत. विधानसभेत १४७, तर लोकसभेसाठी २१ मतदारसंघ आहेत. भाजप, बिजू जनता दल (बीजेडी) आणि काँग्रेस येथील प्रमुख पक्ष आहेत. भाजप आणि बीजेडीमध्ये आघाडीचे गणित फिसकटल्यानंतर आता तिन्ही पक्ष स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जात आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीने ११२, तर लोकसभा निवडणुकीत १२ जागांवर विजय संपादन केला होता.

यंदाच्या निवडणुकांमध्ये ‘आयाराम गयारामां’साठी सुगीचे दिवस आहेत. निष्ठा बदलणाऱ्या जवळपास सर्वांनाच निवडणुकीची तिकिटे मिळाली आहेत. पक्षनिष्ठा बदलल्यानंतर लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात भाजपचे ओडिशा प्रदेश उपाध्यक्ष भृगू बक्षीपत्रा आघाडीवर आहेत. त्यांनी बीजेडी पक्षात प्रवेश केल्यानंतर काही तासांतच ब्रह्मपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. २९ मार्च रोजी बीजेडीमध्ये सहभागी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेंद्रसिंह भोई यांना बोलनगीर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. यापूर्वी काँग्रेसचे केंद्रपाडा जिल्हाध्यक्ष अंशुमन मोहंती यांनाही बीजेडीने तिकीट दिले आहे. भाजपने यंदा तिकीट नाकारल्याने बक्षीपात्रा नाराज होते. याआधी त्यांनी जेपोर विधानसभा मतदारसंघ आणि ब्रह्मपूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती; पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र बीजेडीच्या झेंड्याखाली पहिला विजय नोंदवण्यास ते उत्सुक आहेत.

पक्षबदलूंना उमेदवारी देण्यात भाजपही पाठीमागे नाही. कटकचे सहा वेळा खासदार असलेले भर्तृहरी महताब यांना त्यांच्या पारंपरिक कटक मतदारसंघातूनच भाजपने रिंगणात उतरवले आहे. ६६ वर्षीय भर्तृहरी बीजेडीच्या उमेदवारीवर १९९८ पासून सलग विजयी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला. माजी मंत्री प्रदीप पाणीग्रही यांना ब्रह्मपूरमधून तिकीट दिले आहे. पाणीग्रही बीजेडीचे गोपालपूरचे सलग तीन वेळा आमदार होते. ब्रह्मपूरमध्ये पाणीग्रही यांचा सामना बक्षीपात्रा यांच्याशी होणार आहे. बीजेडीचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले आता भाजपचे उमेदवार आहेत, तर भाजपचा चेहरा असलेले नेते बीजेडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारांचा गोंधळ दूर करण्याचे आव्हान असणार आहे. राज्यातील आणखी एक लक्षवेधी लढत गंजम जिल्ह्यातील चिकिती विधानसभा मतदारसंघात होत आहे. येथे दोघे सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष चिंतामणी ज्ञान सामंतराय यांचे पुत्र मनोरंजन ज्ञान सामंतराय हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांचे मोठे बंधू रवींद्रनाथ ज्ञान सामंतराय हे काँग्रेसकडून रिंगणात आहेत. चिंतामणी ज्ञान सामंतराय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी तीन वेळा चिकिती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मनोरंजन यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे, तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. रवींद्रनाथ हे प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. बिजू जनता दलाने येथून चिन्मयानंद श्रीरुपदास देव यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, चिंतामणी सामंतराय यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक प्रचारापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली असली तरीही काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. येथील निकालाकडे सर्वांचेच लक्ष आहे.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)