उशिराचे शहाणपण

गोव्यात भाजप विरोधातील नेत्यांनी आरजीपीला थोडे जरी महत्त्व देऊन जागा वाटपासाठी चर्चा केली असती आणि इंडि आघाडीत आरजीपीला घेऊन जर एक जागा आरजीपीला आणि एक जागा काँग्रेसला मिळवली असती तर भाजपला ही निवडणूक जड गेली असती. काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड या पक्षांनी आरजीपीला महत्त्वच द्यायचे नाही असे ठरवल्यामुळे आरजीपीने स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले. आता दोन्ही ठिकाणी तिरंगी लढती होतील. कारण काँग्रेसकडून दुरावलेला मतदार आणि जो गेल्या चार-पाच वर्षांतील नव मतदार आरजीपीकडे आकर्षित होत आहे.

Story: उतारा |
06th April, 11:47 pm
उशिराचे शहाणपण

शेवटी काँग्रेसने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले. माजी नौदल अधिकारी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना दक्षिण गोव्यातून, तर माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांना उत्तर गोव्यातून निवडणुकीत उतरवले आहे. हीच नावे यापूर्वी जाहीर केली असती तर प्रचारासाठी काँग्रेस आणि इंडि आघाडीतील अन्य पक्षांना वेळ मिळाला असता. आजपासून एका महिन्याने मतदान होणार आहे. या एका महिन्यात काँग्रेसला संबंध गोवा पिंजून काढावा लागेल. भाजपने आपले उमेदवार जाहीर करून प्रचाराची दुसरी फेरी सुरू केली आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) आपले दोन्ही उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केला आहे. फक्त काँग्रेसच्याच उमेदवारांचा पत्ता नव्हता. अॅड. खलप आणि कॅ. विरियातो यांच्या नावांची घोषणा करून उशिरा का होईना काँग्रेसने भाजपसमोर निश्चितच आव्हान उभे केले आहे. भाजप, आरजीपीनंतर काँग्रेसने आपले प्रभावशाली उमेदवार दिल्यामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही लढती यावेळी चुरशीच्या होणार आहेत.

भाजपची जमेची बाजू म्हणजे भाजपकडे संघटना आहे. तळागाळात बुथ कार्यकर्ते आहेत. राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. पुन्हा मोदीच सत्तेवर येतील त्यामुळे कमळ चिन्हावर मतदान करा असे आवाहन भाजप सुरुवातीपासून करत आहे. उत्तरेत श्रीपाद नाईक आणि दक्षिणेत पल्लवी धेंपो यांना उमेदवारी देऊन भाजपने दोघांच्याही प्रचारात आघाडी घेतली. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर गावोगावी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. संघटनेच्या तुलनेत आरजीपी नवा आहे. काँग्रेसची संघटना त्यांच्या उमेदवारीवर जिंकून आलेल्या आमदारांनी संपवली. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा प्रचार किती प्रभावी ठरतो ते पहावे लागेल. पण गोव्यात भाजप विरोधातील नेत्यांनी आरजीपीला थोडे जरी महत्त्व देऊन जागा वाटपासाठी चर्चा केली असती आणि इंडि आघाडीत आरजीपीला घेऊन जर एक जागा आरजीपीला आणि एक जागा काँग्रेसला मिळवली असती तर भाजपला ही निवडणूक जड गेली असती. काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड या पक्षांनी आरजीपीला महत्त्वच द्यायचे नाही असे ठरवल्यामुळे आरजीपीने स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले. आता दोन्ही ठिकाणी तिरंगी लढती होतील. कारण काँग्रेसकडून दुरावलेला मतदार आणि जो गेल्या चार-पाच वर्षांतील नव मतदार आरजीपीकडे आकर्षित होत आहे. त्यांच्याच जोरावर आरजीपी विधानसभा निवडणुकीतही आप, मगो, गोवा फॉरवर्ड यांच्या तुलनेत पुढे होता. उमेदवार जरी एक निवडून आला तरी आरजीपीने मतांची मोठी टक्केवारी मिळवली. इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा आरजीपीने जास्त मते मिळवल्यामुळे भाजप विरोधातील इंडि आघाडीने आरजीपीशी चर्चा करण्याची खरी आवश्यकता होती. ज्या पद्धतीने आरजीपीने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांच्या तोंडातील घास काढून घेतला त्याचीच पुनरावृत्ती झाली तर पश्चात्ताप करण्याची वेळ इंडि आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांवर येऊ शकते.

आरजीपीकडे दुर्लक्ष

सत्ताधारी गट म्हणून भाजपने आरजीपीला महत्त्व दिले नाही. पण आरजीपीला काँग्रेस, मगो, आप, गोवा फॉरवर्ड हेही महत्त्व देत नाहीत. मगो भाजपसोबत आहे. त्यामुळे जवळजवळ दहा टक्के मते मिळवणाऱ्या आरजीपीची गरज काँग्रेसला किंवा इंडि आघाडीला होती. पण भाजपची ‘बी’ टीम म्हणून ठपका ठेवून सर्वच विरोधी पक्षांनी आरजीपीची मदत मागायची नाही असेच ठरवले. थिवी, शिवोली, वाळपई, साळगाव, मये, नुवे, वेळ्ळी, बाणावली, शिरोडा अशा अनेक मतदारसंघांमध्ये आरजीपीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती. त्यामुळे आरजीपीशी चर्चा करून विरोधक एकत्र आले असते तर गोव्यातील लढती त्यांच्यासाठी सोप्या झाल्या असत्या.

उमेदवार जाहीर करण्यास उशीर, पण...

इंडि आघाडीचे उमेदवार म्हणून गोव्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसच उमेदवार देईल असे निश्चित झाल्यानंतर आम आदमी पक्षाने विचार बदलला. काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यासाठी फार वेळ लावल्यामुळे उमेदवाराला प्रचारासाठी एक महिना मिळतो. यात एक फेरी पूर्ण होऊ शकेल. भाजपने आपली दुसरी फेरी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तर काँग्रेसची पहिली प्रचारफेरी पूर्ण होईपर्यंत निवडणूक पूर्ण होईल असे म्हटले आहे. आरजीपीने काँग्रेसचे उमेदवार भाजपनेच ठरवल्याचा आरोप केला आहे. हे राजकीय आरोप होत राहतील. पण काँग्रेसने गांभीर्याने प्रचारात आघाडी घेतली तर निवडणूक फार रंगतदार होणार आहे. उत्तर गोव्यात अॅड. रमाकांत खलप यांचा चाहता वर्ग मोठा आहे. शिवाय काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहेच. त्यांनी गावोगावी भेटी देण्यास सुरुवात केल्यास प्रचारात ते आघाडी घेऊ शकतात. काँग्रेसजवळ उत्तर गोव्यात फक्त एक आमदार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा फिरताना प्रचारासाठी काँग्रेसला कार्यकर्त्यांची कमतरता भासू शकते. दक्षिणेत काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड असे एकूण पाच आमदार आहेत. कॅप्टन विरियातो यांना तिथे त्यांची मदत मिळू शकेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते हे दोघेही दक्षिणेतील आहेत. त्यामुळे कॅप्टन विरियातो यांना निश्चितच त्यांचा फायदा होऊ शकतो. उमेदवारी जरी उशीरा जाहीर झाली असली तरी काँग्रेसला जाहीर प्रचारासाठी सुमारे सत्तावीस दिवस मिळतात.

भाजपचा संघटनेवर भर

भाजपने महिला उमेदवार देण्याचा प्रयोग करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण गोव्यात महिला मतदारांचा आकडा पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. भाजपकडे गाव पातळीवर बुथ कार्यकर्त्यांची फळी आहे. पल्लवी धेंपो यांचे पती उद्योजक श्रीनिवास धेंपो यांचे राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी असलेले चांगले संबंध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारांवरील प्रभाव, भाजपकडून प्रत्येक ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घेण्याचे सुरू असलेले सत्र, अर्थात हिंदुत्ववादाला दिले जात असलेले महत्त्व यातून भाजपला दक्षिणेत यावेळी आपला उमेदवार निवडून येईल अशी खात्री आहे. उत्तरेत श्रीपाद नाईक हे स्थानिक आमदारांना घेऊन फिरत आहेत. त्यांच्या प्रचाराकडे अद्याप पक्षानेही फार लक्ष दिलेले नाही. दक्षिणेत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदार असे सगळेच प्रचारासाठी मेहनत घेत आहेत. राज्यभर असलेली कार्यकर्त्यांची फळी भाजपला मदतीची ठरू शकते असे भाजपला वाटते.


पांडुरंग गांवकर, ९७६३१०६३००