ऑपरेशन संकल्प : नौदलसामर्थ्याची नवी ओळख

मागील तीन महिन्यांत भारतीय नौसेनेने; हौथी बंडखोर आणि सोमाली चाच्यांविरुद्ध भक्कम आघाडी उघडली आहे. सोमाली चाच्यांनी विविध राष्ट्रांच्या मालवाहू जहाजांवर केलेल्या १३ समुद्री हल्ल्यांमध्ये नौदलाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. या जहाजांना चाच्यांच्या तावडीतून सोडवत, ११० जीव वाचवले आहेत. अलीकडेच भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन संकल्प’ या धाडसी समुद्री अभियानांतर्गत जहाजात ओलीस असलेल्या १७ नाविकांची (होस्टेज क्रू मेंबर्स) सुटका केली आणि ३५ सोमाली समुद्री चाच्यांना बंदी बनवले. विशेष म्हणजे हे मिशन एक छदामही खंडणी न देता आणि कोणत्याही जीवितहानीशिवाय पार पाडल्याने जगभरातून भारतीय नौदलाची प्रशंसा होत आहे.

Story: वेध |
06th April, 11:44 pm
ऑपरेशन संकल्प : नौदलसामर्थ्याची नवी ओळख

भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी शुक्रवार, १५ मार्च, २०२४ ला आपल्या धाडसी कारवाईने एका मालवाहू जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडवले. वैश्विक सागरी पटलावर समुद्री चाचेगिरीचा सामना करण्याच्या प्रक्रियेतील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जात आहे. या कारवाईदरम्यान चाच्यांनी भारतीय युद्धनौका-इंडियन नेव्हल शिप (आयएनएस) कोलकातावर जबरदस्त गोळीबार केला. पण नौदलाच्या युद्धनौकेने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. डिसेंबर, २०२३ मध्ये सोमालीयन समुद्री चाच्यांनी अवैधरित्या हस्तगत केलेले हे बल्गेरियन जहाज या कारवाईच्या वेळी हिंद महासागरात कार्यरत होेते आणि ते सतत भारतीय नौदलाच्या, सूक्ष्म निगराणीखाली होते. हस्तगत केल्यानंतर चाच्यांनी, सोमाली समुद्रहद्दीत नेलेले हे जहाज खुल्या समुद्रात आल्यावर भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन संकल्प’ या धाडसी समुद्री अभियानांतर्गत जहाजात ओलीस असलेल्या १७ नाविकांची (होस्टेज क्रू मेंबर्स) सुटका केली आणि ३५ सोमाली समुद्री चाच्यांना बंदी बनवले. वैशिष्ट्यपूर्ण भारतीय कमांडोंची (इंडियन स्पेशल फोर्सेस) युद्धक्षमता व कौशल्य जगातील सर्वोत्कृष्ट कमांडोंच्या तोडीस तोड आहे हे भारताने या कारवाईच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले. जगभरातील संरक्षणतज्ञ, भारतीय कमांडोंच्या या  धाडसी समुद्री कारवाईची आणि युद्धकौशल्याची प्रशंसा करताहेत.

माल्टा ध्वजांकित मोटर व्हेसेल (एमव्ही) रुएन डिसेंबर, २०२३ च्या पहिल्या आठवड्यात एक दशलक्ष डॉलर्सचा अंदाजे ३७, ५०० टन धातू घेऊन दक्षिण कोरियातील ग्वांगयांग बंदरातून बाहेर पडले. हिंद महासागराच्या पश्चिमेला हे जहाज आले असताना छोट्या स्वयंचलित बोटींमधून आलेल्या सोमाली चाच्यांनी या जहाजावर गनिमी हल्ला केला. चाच्यांचे रौद्र रूप पाहून त्यातील नाविक गण (क्रू मेंबर्स) हवालदील झाले आणि त्यांने इमर्जंसी हॉट लाईनवर डिस्ट्रेस सिग्नल पाठवला. पण, दुर्दैवाने त्यावेळी कोणीही मदतीला येऊ शकले नाही. परिणामी चाच्यांनी जहाजावर लीलया कब्जा केला. एक आठवड्याच्या आत एमव्ही रूएनला, सोमालीयाच्या उत्तर पूर्वेकडील पांटलॅण्ड प्रांतातील एका बंदरात नेण्यात येऊन नांगर टाकण्यात आला. एमव्ही रूएन जवळपास तीन महिने तेथेच होते. सोमाली चाच्यांचा हा गनिमी हल्ला आणि जहाजावरील कब्ज्यामुळे खुल्या समुद्रातील चाचेगिरीचे नव्याने झालेले पुनरुत्थान चर्चेत आले आहे. सोमाली समुद्र किनार्‍यापासून दूर, सागरी वाटमारी करण्यासाठी एक अँकर म्हणून त्याचा वापर करण्यासाठी सोमाली चाचे एमव्ही रूएनला खुल्या समुद्रात घेऊन गेले आणि हे जहाज भारतीय नौदलाच्या हाती लागले. एमव्ही रूएनला सोडण्यासाठी कोणीही, कुठल्याही प्रकारची खंडणी दिल्याचे ऐकिवात नाही. तथापि, जहाजाला सुखरूप परत करण्यासाठी सोमाली चाचे आणि शिपिंग कंपनीमध्ये लाखो डॉलर्सच्या गुप्त वाटाघाटी सुरू होत्या ही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव आणि कंपनीच्या संचालक मंडळानी खंडणीच्या वाटाघाटींवर भाष्य केले नसले तरी दोघांनीही भारत आणि त्याच्या नौदलाप्रती आभार व्यक्त केले आहेत.

   सोमालियाजवळील सागरी मार्गांमध्ये जगातील बर्‍याच अतिव्यस्त शिपिंग मार्गांचा समावेश आहे. दरवर्षी फर्निचर व पोशाखांपासून धान्य आणि इंधनापर्यंत सर्व काही घेऊन जाणारी अंदाजे २०,००० मालवाहू जहाजे एडनच्या आखातातून लाल समुद्र आणि सुएझ कालव्याकडे जातात. हा युरोप आणि आशियाला जोडणारा सर्वात लहान समुद्री मार्ग आहे. याच समुद्री मार्गावर चांचेगिरी करताना सोमाली चाच्यांनी एकेकाळी २३७ व्यापारी जहाज लुटून शेकडो लोकांना ओलीस बनवले होते. २०१०-११ मध्ये या चाच्यांकडून हस्तगत केलेला माल व पकडलेल्या ओलिसांना मुक्त करण्यासाठी जवळपास ८ आठ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खंडणी द्यावी लागली होती. आजमितीला लाल समुद्र आणि जवळच्या क्षेत्रात येमेनमधील हौथी मिलिशियाच्या बंडखोरांकडून मालवाहू जहाजांवर रॉकेटस्, ड्रोन्स आणि मिसाईलद्वारे होणाऱ्या अविरत व अचूक माऱ्यामुळे त्रस्त झालेल्या शिपिंग कंपन्यांना या खंडणीबहाद्दर चाच्यांच्या छापेमारी कारवायांमुळे खूप  धोका निर्माण झाला आहे. या कंपन्यांची जोखीम आणि खर्च दिवसांगणिक वाढत आहे. विमा व्यवस्थापनाची रकमही आकाशाला भिडू लागली आहे. सुमारे दशकभर सुप्त पडून राहिल्यानंतर चाचेगिरीत परत येण्यासाठी सोमाली समुद्री चांचे उत्तरेला अनेकशे नॉटिकल मैल अंतरावर हौथी स्ट्राईसद्वारे प्रदान केलेल्या विचलिततेचा फायदा घेत आहेत. सुमारे ११ वर्षे निष्क्रिय असलेल्या सोमाली चांच्यांचे पुनरागमन हा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

इन्फर्मेशन फ्युजन सेंटर फॉर इंडियन ओशन रिजन, (आयएफसीआयओआर) हे भारतीय नौसेनेचे भारताच्या क्षेत्रीय समुद्री सार्वभौमत्वाची अंमलबजावणी करणारे महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र आहे. अपहरण झाल्यापासून  एमव्ही रूएनच्या सर्व बारीकसारिक हालचाली/बातम्यांवर त्याचे बारीक लक्ष होते. त्यासाठी ते केंद्र, सर्व भागधारकांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात होते. कारण, आयएफसीआयओआरच्या या क्षेत्रातील भूमिकेनुसार भारतीय नौसेना सागरी सुरक्षा स्वारस्य असलेल्या  त्यांच्या जबाबदारीच्या समुद्री भागातील सागरी वाहतुकीवर देखरेख आणि व्यापक पाळत ठेवते. त्यामुळे चाचे एमव्ही रूएनला खुल्या समुद्रात नेण्याची तयारी करताहेत ही शंका येताच भारतीय नौदलाने आपल्या स्टेल्थ डिस्ट्रॉयर, आयएस कोलकाताला एमव्ही रुएनला रोखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आयएनएस कोलकाताने भारतीय किनारपट्टीपासून १४०० नॉटिकल मैल दूर अंतरावर चाच्यांच्या ताब्यात असलेल्या एमव्ही रूएनला रोखले. थोड्याच वेळात त्यांच्या मदतीला पेट्रोल सक्षम, आएनएस सुभद्रा, नौदल ड्रोन हेल, पी ८१ मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट आणि मार्कोस, भारतीय नौसेनेचे जांबज कमांडो आले. एमव्ही रूएनबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी आयएनएस कोलकातानी तिचे स्पॉटर मल्टीकॉप्टर ड्रोन पाठवले होते. हे ड्रोन्स स्वदेशात निर्माण होणारे टेहाळणी ड्रोन्स आहेत. भारतीय नौसेनेकडे असे ३० ड्रोन्स आहेत आणि येत्या काळात आणखी ६० ड्रोन्स आपल्या ताफ्यात सामील होण्याची अपेक्षा आहे.

एमव्ही रुएनवर सशस्त्र चांचे असल्याची पुष्टी या ड्रोनमुळेच झाली. आयएनएस कोलकाताने जहाज व ओलिसांना सोडवण्याच्या हेतूने सोमाली चाच्यांना वाटाघाटी करायला उद्युक्त करण्यासाठी अचूक मोजक्या कृतींद्वारे दबाव टाकला. 

सुरुवातीला चाच्यांनी नकार दिला. मशिनगन फायर करून स्पॉटर ड्रोन खाली पाडले. एवढेच नाही तर रॉकेट आणि मशीन गनद्वारे आयएनएस  कोलकातावर गोळीबारही केला. त्याच वेळी भारतीय नौसेनेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. ते उचलताना जहाजावरील नाविकांची जीवहानी होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली होती. कारण नौसेनेचे मुख्य उद्दिष्ट एमव्ही रुएनची सुरक्षित सुटका करणे हे होते. या चकमकी दरम्यान चाच्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी क्रू सदस्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला. त्याच दिवशी दुपारी भारतीय वायूसेनेलाही या ऑपरेशनमध्ये भाग घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. वायूसेनेने सी १७ हरयूलिस ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टद्वारे समुद्री कमांडों मार्कोजना समुद्रात उतरवले. मार्कोज  विशेष प्रशिक्षण आणि सामरिक कौशल्याद्वारे  भारतीय सागरी हितसंबंधांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जटिल सागरी ऑपरेशन्समधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या मार्कोजनी शांतपणे बोटी चाच्यांच्या जहाजाकडे नेल्या आणि चाच्यांना पूर्णपणे आश्चर्यचकित करत ते जांबाज कमांडो एमव्ही रूएनवर चढले. त्यांचे खुंखार स्वरूप, मोठी संख्या आणि आधुनिक शस्त्रसज्जता पाहून चांचे इतके गर्भगळीत झाले की आत्मसमर्पणासाठी त्यांना बाध्य करण्यासाठी थोडेसेच फायरिंग करावे लागले. ऑपरेशन संकल्प केवळ ४० तासांत संपन्न झाले. 

  युद्ध नौकांचा गोळीबार आणि कमांडो ऑपरेशन्स इतके जलद आणि अचूक होते की जहाजावरील ओलितांचे किंवा त्यामधील संसाधनांचे कोणतेही प्रासंगिक नुकसान झाले नाही किंवा एकही जीवितहानी झाली नाही. एमव्ही रुएनला खेचून (टोइंग) मुंबई बंदरात आणल्यानंतर २४ मार्च रोजी चांच्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तिला समुद्री योग्यतेच (सी वर्दीनेस) मूल्यांकन करण्यासाठी पाठवण्यात आले. आयएनएस कोलकाताचा स्किपर, कॅप्टन शरद सिनसुइवाल यांचे एक छदाम खंडणी दिल्याविना ही कारवाई केल्याबद्दल जगभर वाखाणणी होत आहे. त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना नौसेना प्रमुखांतर्फे, ऑन द स्पॉट सीएनएस सायटेशन प्रदान करण्यात आले आहे.

भारतीय नौसेनेद्वारे चाच्यांच्या ताब्यातून करण्यात आलेली यशस्वी सुटका हा, पश्चिम अरबी समुद्र, पश्चिम हिंद महासागर क्षेत्रात चाच्यांनी निर्माण केलेल्या व्यापारी, आर्थिक व काही अंशी सामरिक अराजकी परिस्थितीला आळा घालण्याच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे. २०१० मध्ये याच चाच्यांमुळे हिंदी महासागराला उच्च जोखीम क्षेत्र हा दर्जा देण्यात आला होता. पण २०२३ मध्ये तो काढून घेण्यात आला.  यानंतर चाच्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत.  २०१० मध्ये सोमाली समुद्री चाच्यांनी सागरी मार्गावर ४१८ हल्ले केले होते आणि ८४ जहाजांचे यशस्वी अपहरण केले होते. 

आजमितीला सोमाली समुद्री चाच्यांचे, प्रत्येकी १५० सदस्य असणारे तीन गट या सागरी क्षेत्राच्या सोमाली किनार्‍यालगत कार्यरत आहेत. सोमाली समुद्री किनार्‍यापासून १००० नॉटिकल मैल ऑपरेशनल त्रिज्येत कार्यरत असणारे हे चांचे पकडलेल्या जहाजांना लाँच पॅड म्हणून वापरतात. येमेनमधील हौथी बंडखोरांकडून होणार्‍या व्यापारी हल्ल्यांमुळे सोमाली चाच्यांना जागतिक अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचा धोका संभवणारी संधी मिळते आहे.

काही दिवसांपूर्वी मोझांबिकहून संयुत अरब आमिरातीला जात असतांना बांगलादेश फ्लॅग्ड एम.व्ही. अब्दुल्लाला सोमाली चाच्यांनी त्याच सागरी क्षेत्रात पकडले आहे आणि ते जहाज सोमालीयात नेण्यात आले. भारतीय नौसेनेनी बांगलादेश सरकारकडे त्या जहाजाला चाच्यांच्या तावडीतून सोडवण्याची तयारी दर्शवली. पण बांगलादेश सरकार आणि शिपिंग कंपनीनी नौसेनेचा प्रस्ताव, काहीही कारण न देता सपशेल फेटाळला. त्या जहाजवरील २४ नाविक आणि जहाजाला सुखरूप सोडण्यासाठी चाच्यांनी ५० लक्ष डॉलर्स खंडणीची मागणी केली आहे. एम व्ही अब्दुल्ला अजूनही सोमाली चाच्यांच्या तावडीत आहे.

  मागील तीन महिन्यांत भारतीय नौसेनेने  हौथी बंडखोर आणि सोमाली चाच्यांविरुध्द भक्कम आघाडी उघडली आहे.  विविध राष्ट्रांच्या मालवाहू जहाजांवर केलेल्या १३ समुद्री हल्यांमध्ये नौदलाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. या जहाजांना चाच्यांच्या तावडीतून सोडवत,११० जीव वाचवले आहेत.  मालवाहू जहाजांवर होणार्‍या वाढत्या हल्ल्यांनंतर सामरिक जलमार्ग सुरक्षित करण्यासाठी भारतीय नौदलाने ३५ युद्धनौका व आठ पाणबुड्या हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या क्षेत्रात तैनात केल्या आहेत. येमेनमधील हौथी बंडखोरांचे सागरी मार्गांवरील हल्ले आणि सोमाली चांचेगिरीच्या धोयांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि महत्त्वाच्या सागरी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने जागतिक सागरी सुरक्षा नियमांतर्गत अंगिकारलेली भूमिका एकदम स्पष्ट आहे. यशस्वीरित्या साकारलेल भारतीय नौदलाच्या ‘ऑपरेशन संकल्प’ने ही बाब ठळकपणाने समोर आणली आहे. भारतातच सागरी भवितव्य आपल्या नौसेनेच्या बलदंड हातात सुरक्षित आहे आणि याचा आम्हा निवृत्त सैनिकांना अभिमान आहे. नौदलाची प्रशंसा होत आहे. 


कर्नल अभय पटवर्धन, निवृत्त