सकारात्मकतेची गुढी उभारु...

Story: भवताल |
06th April, 11:41 pm
सकारात्मकतेची गुढी उभारु...

हिंदू धर्मातील पवित्र सण गुढीपाडवा ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक घरावर आनंदाची व मागंल्याची  गुढी उभारण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक मनोरंजन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्माच्या वेगवेगळ्या जातीपंथांमध्ये गुढीपाडवा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्याची प्रथा रूढ झालेली आहे. तरीसुद्धा हा दिवस पवित्र व आनंदाचा असल्याने एक वेगळ्या प्रकारचे चैतन्य निर्माण होत असते. हिंदू धर्माची निर्मिती व रचना झाल्यानंतर गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. त्याची वेगळ्या प्रकारची आख्यायिका आहे. तरीसुद्धा आजची प्रत्येकाची मानसिकता याचा सारासार विचार केल्यास आपण या दिवशी एक वेगळ्या प्रकारचा संकल्प करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगावेसे वाटते. आज प्रत्येकाच्या मनामध्ये नकारात्मक विचारांची भावना निर्माण होऊ लागलेली आहे. प्रत्येकामध्ये आपमतलबीपणा व स्वार्थी विचार यामुळे प्रत्येकाबद्दल असलेला आधार कमी होऊन सर्वस्व मीच आहे अशा प्रकारची विचारधारा निर्माण होऊ लागलेली आहे. यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होताना दिसत आहे. प्रत्येक जण ईश्वराकडे प्रार्थना करीत असतो की माझे व माझ्या कुटुंबाचे कल्याण होवो. मला धनसंपत्ती प्राप्त होवो. मात्र मला या शब्दाऐवजी आम्हा सर्वांना अशा प्रकारचे शब्द आपल्या मुखात आल्यास त्याच्या मनामध्ये असलेली पवित्रता सद्भावना व पारदर्शकता सिद्ध होऊ शकते.

ईश्वराने प्रत्येकाला सर्व प्रकारचे अवयव दिलेले आहेत. पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत. ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत. बोलण्यासाठी तोंड दिलेले आहे. विचार करण्यासाठी डोके दिलेले आहे. अशा प्रकारे आपली शारीरिक रचना करण्यात आलेली आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की आपल्याला एक गोष्ट पहायची असेल तर आपल्या डोळ्यांनी ती आपण पाहू शकतो. मात्र ज्यावेळी आपण अमुक गोष्ट पाहतो त्यामागे विचार करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी आहे. जर आपल्याला ईश्वराने पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत तर प्रत्येक गोष्ट पाहताना सर्वांना एकच विचार येणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही अशीच परिस्थिती आपल्या कानांची आहे. ज्यावेळी आपण कोणाचेही बोलणे, गायन, वादन ऐकतो त्यावेळी तशाच प्रकारचे ऐकणे प्रत्येकाला एकच असणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. जर आपल्याला ईश्वराने सर्व प्रकारचे अवयव दिलेले आहेत. तर प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने का वागतो? अशा प्रकारचा सवाल येणे सहाजिकच आहे. मानसशास्त्रानुसार आपला मेंदू आपल्या मनावर अवलंबून आहे. 

जशा पद्धतीने आपले मन विचार करते म्हणून आपण निर्णय घेतो. तशाच प्रकारची कृती मेंदूच्या माध्यमातून आपल्याला करावीशी वाटते किंवा आपण ती करतो. यामुळे मन हा आपल्या अवयवाचा महत्त्वाचा घटक आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. यामुळे मन शांत व शुद्ध असणे ही काळाची गरज आहे. यामुळे आजच्या या पवित्र दिनी मन शांत व पारदर्शी करण्याचा प्रयत्न करू. शुद्ध मनाच्या माध्यमातून अनेकांची मने जोडू या पवित्र मनातून पवित्र विचारांचे गुढी उभारू. पवित्र विचारांचे अमृत शिंपडू. समाजामध्ये शांतता व आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी दुःख असते. मात्र हे दुःख हलके करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असते. आपल्या प्रत्येकाला मित्रमंडळी आहे. मात्र ही मित्रमंडळी फक्त स्वार्थापुरतीच शिल्लक न ठेवता त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आपण त्यांच्या मनामध्ये व त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची गुढी उभारणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास प्रत्येकाचे जीवन आनंदी व सुखमय होऊ शकते. 

आजच्या या पवित्र दिनी अशा प्रकारच्या विचारांची शृंखला निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेकवेळा प्रत्येकाला आपले दुःख डोंगराएवढे आहे. दुसऱ्याचे दुःख मात्र शुल्लक आहे असे वाटते. पण परिस्थिती तशी नसते. प्रत्येकाने दुःखा संदर्भात सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले दुःख दुसऱ्याला सांगितल्यानंतर ते हलके होते अशी सर्वसामान्य म्हण आहे. त्याचा सारासार विचार केल्यास आपण आपल्या दुःखा  संदर्भात आपल्या मित्रमंडळी समोर वाच्यता करणे ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आज संवाद कमी होऊ लागलेला आहे. संवादाच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहजपणे सुटणे किंवा सोडवणे शक्य आहे. मात्र आपल्याकडे असलेल्या संवादाची पवित्रता नष्ट होऊ लागलेली आहे. प्रत्येकामध्ये असलेला मीपणा यामुळे आपण सहसा कुणाकडे मदत मागत नाही. किंवा आपल्याला हवी असलेली मदत दुसऱ्याला सांगत नाही. ही आपली खऱ्यार्थाने कमजोरी आहे. जोपर्यंत आपल्यातील मीपणा दूर होऊन आपलेपणाचा धागा निर्माण होत नाही. तोपर्यंत अनेक गोष्टी सहजपणे शक्य होणार नाही. यासाठी आजच्या दिनी गुढीपाडव्याच्या या गुढी उभारण्याच्या नवीन संकल्पनातून नवीन माणसे जोडू प्रत्येकाला आनंदी करण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्यामध्ये असलेली सकारात्मकता बाजूला सारून सकारात्मकतेचा नवा अध्याय निर्माण करूया. यातून अनेकांचे जीवन आनंदी होईल. दुसऱ्या बाबतीत असलेली नकारात्मकतेची भावना नष्ट करून सकारात्मकतेची गुढी उभारूया यातून समाजामध्ये चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.


उदय सावंत, वाळपई