भुतानमधला टाकीन आणि चिझची माळ!

दार्जीलिंगमध्ये ह्याचा अधिक खुलासा झाला की पूर्व हिमालयात आढळणारी टाशिन ही एक मोठी प्रजाती आहे. त्यात चार उपप्रजातींचा समावेश आहे. मिश्मी टाकीन, गोल्डन टाकिन, तिबेटी टाकिन, आणि भूतान टाकीन. टाकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी !


06th April, 11:36 pm
भुतानमधला टाकीन आणि चिझची माळ!

ताशी पुढे आम्हाला टाकीन नावाचा प्राणी बघायला घेऊन गेला. टाकीन, ज्याला कॅटल कॅमोईस किंवा ग्नू बकरी देखील म्हणतात. ताशीचा दावा खरा मानावा तर तो म्हणे फक्त भूतान मध्येच सापडतो. “भूतान सोडून तुम्हाला हा प्राणी कुठेच दिसणार नाही, हा आमचा अनोखा प्राणी दाखवायला आम्ही आमच्या पाहुण्यांना मुद्दाम इथे घेऊन येतो” इत्यादी ताशी सांगत होता. पुढे आम्हाला हा प्राणी नि त्याच्या उपजाती भारतात दार्जीलिंगला पुन्हा बघायला मिळाल्या ही गोष्ट वेगळी. त्या वेळेस ताशीला फोन करून “भारत में भी मिलता है” असं सांगावासं वाटलं. असो. 


दार्जीलिंगमध्ये ह्याचा अधिक खुलासा झाला की पूर्व हिमालयात आढळणारी टाशिन ही एक मोठी प्रजाती आहे. त्यात चार उपप्रजातींचा समावेश आहे. मिश्मी टाकीन, गोल्डन टाकिन, तिबेटी टाकिन, आणि भूतान टाकीन. टाकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी! म्हणून ताशीला ह्याचं एवढं कौतुक. एरव्ही हा दिसायला जेमतेम. शरीराचा मजबूत बांधा, लहान पाय आणि अंगावर जाड, सोनेरी-तपकिरी कोट असा. बघणाऱ्याला ह्याच्या रुपात गाय नि बकरी ह्यांचं कॉम्बिनेशन दिसतं. टाकिन त्यांच्या मोठ्या, कमानदार नाकासाठी आणि गाय meets बकरी अश्या अनोख्या स्वरूपासाठी ओळखले जातात. ते डोंगराळ प्रदेशात राहतात आणि भूतानच्या संस्कृतीत त्यांचा आदर केला जातो. इथे हिंदू जसे गायींना मानतात तसंच तिथे टाकीन पुजला जातो. थिम्पूत टाकीन पाहण्यासाठी आम्ही मोतिथांग टाकीन प्रिझर्व्हला भेट दिली. राजधानी शहरात स्थित हे अभयारण्य, टाकीन्सच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी समर्पित आहे. हे नॅशनल पार्क आम्हाला ह्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात निरखायची संधी देतं. राजधानीत असूनही हे काहीसं दूर, एका सुंदर डोंगरावर वसलेलं आहे, कोणाही निसर्ग प्रेमी ला आवडेल असं. इथली दृश्यं मनमोहक होती. आम्ही बराच वेळ इथे थांबून फोटोग्राफी केली. 

पुढे ताशी आम्हाला घेऊन पारोच्या दिशेने निघाला. वाटेत ठिकठिकाणी थांबून आम्ही भूतानला जवळून पाहिलं. एकीकडे रस्त्याच्या कडेला एक छोटं दुकान होतं. माणसाच्या मणक्याची हाडं जणू गुंफून माळ बनवावी तश्या माळा इथे दर्शनीय ठिकाणी लावल्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्याची नजर सहज इथे पडवी अश्या ह्या दुकाना समोर आम्ही थांबलो. आणि ताशीने आम्हाला त्यातली एक माळ काढून “काय असेल ओळखा बरं” असं म्हटलं. खरंच ती हाडं कशीच वाटत होती. त्यामुळे मला काहीसा कंटाळा आला. पण आदित्यने हातात धरून त्याला निरखून त्याचा वासबिस घेऊन “हे पनीर आहे का” असं विचारलं असता, ताशी खूश होऊन “well not exactly, it is cheese” आदित्यचं हस्तांदोलन करत म्हणाला. हे चीज आणि खायचं? छे बुवा! मी नसते खाऊ शकले. पण आदित्यने एक माळ विकत घेतली. (जी देव पावला नि तो त्यांच्याच गाडीत विसरला!)

क्रमशः


भक्ती सरदेसाई