कृषीप्रधान भारतातील आधुनिक शेती

भारतीय संस्कृती ही सृजनशीलता, स्वदेशी व पारंपरिक पद्धतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कृषीप्रधान संस्कृती ही आपल्या देशाला लाभलेली अशीच एक अतुलनीय संस्कृती. कमीत कमी प्रदूषणकारी साधनांचा वापर करुन आपण ही संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Story: साद निसर्गाची |
06th April, 11:26 pm
कृषीप्रधान भारतातील आधुनिक शेती

भारतीयांचे जीवनमान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे कदाचित भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जात असावे. मानवी वापरासाठी वनस्पती व प्राण्यांचे संवर्धन करण्याचा उद्योग म्हणजे शेती. शेतीमध्ये पिकांच्या लागवडीसाठी सुपीक माती तयार करणे, पिकांची कापणी, प्रजनन आणि पशुधन वाढवणे, दुग्धव्यवसाय आणि वनीकरण यांचा समावेश होतो. 

भारतातील शेतीला १० हजार वर्षाचा इतिहास आहे. इथे शेतीची सुरुवात पहिल्यांदा वायव्य भारतात झाल्याचे वाचनात आढळते. शेतीचे दोन मुख्य प्रकार आहेत, पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती.

 पारंपरिक शेती ही स्वदेशी ज्ञान व कुदळ, नांगर, फावडे यासारखी देशी हत्यारे वापरुन करत असत. गुरे आणि शेणखताच्या मदतीने पडीक जमिनीचे सुपीक जमिनीत रुपांतर केले जात असे. काळांतराने देशाची प्रगती होत गेली आणि पारंपरिक शेतीची जागा आधुनिक शेतीने घेतली. आधुनिक शेतीमध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपकरणे, खते, किटकनाशके, एकाच पिकाच्या विविध प्रकारची संकरीत बियाणे आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला. आज भारतातील बहुतांश ठिकाणी आधुनिक पद्धतीने शेती केली जाते तर क्वचितच ठिकाणी हे पीक पारंपरिक पद्धतीने  घेतले जाते. आधुनिक पद्धतींमुळे मानवाला खालील समस्यांना तोंड द्यावे लागते. 

१. सूक्ष्म पोषक असंतुलन : आधुनिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मॅक्रोन्युट्रिएंट्स असतात. शेतात खतांचा जास्त वापर केल्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते.

२. नायट्रेट प्रदूषण : शेतीसाठी वापरलेली अतिरिक्त नायट्रोजनयुक्त खते जमिनीत खोलवर गेल्यामुळे भूजल प्रदूषित होते.

३. युट्रोफिकेशन : शेतात अतिरिक्त खतांचा वापर केल्याने पोषक तत्वांनी भरलेले पाणी जवळच्या तलावांमध्ये मिश्रित होते. ह्यामुळे तलावांमध्ये अति-पोषक घटकांचे मिश्रण होते. याला 'युट्रोफिकेशन' असे म्हणतात. अचानक प्रचंड प्रमाणात पोषक तत्वे मिळाल्याने तलावांतील शेवाळाच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होते. शेवाळाचे आयुष्य कमी असल्याने ते लगेच मरते आणि पाणी प्रदूषित करते. त्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांवर वाईट परिणाम होतो.

पीक उत्पादनात सुधारणा करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतींत बिनदिक्कतपणे कीटकनाशकांचा वापर केला जातो. ही कीटकनाशके जरी किटकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून पिकाचे रक्षण करत असली, तरी त्यांचे अनेक दुष्परिणाम असतात. 

१. अलक्ष्यित प्रजातींचा मृत्यू : अनेक कीटकनाशके केवळ लक्ष्यित प्रजातीच नव्हे तर पिकाला फायदेशीर असलेल्या अनेक अलक्ष्यित प्रजातींचा देखील बळी घेतात.

२. कीटकनाशक प्रतिरोधकता : कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही जिवंत राहणारे कीटक अत्यंत प्रतिरोधक अशा पिढ्या निर्माण करतात ज्या नंतर सर्व प्रकारच्या कीटकनाशकांपासून प्रतिकारक्षम होतात.

३. जैव-विवर्धक : बहुतेक कीटकनाशकांचे जैविकरीत्या विघटन होऊ न शकल्यामुळे (नॉन-बायोडिग्रेडेबल) ही कीटकनाशके अन्न साखळीत जमा होतात. याला जैव-संचय किंवा जैव-विवर्धन असे म्हणतात. जैव- विवर्धित स्वरूपात असलेली ही कीटकनाशके मानवाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

४. कर्करोगाचा धोका : कीटकनाशके कार्सिनोजेन म्हणून कार्य करुन अप्रत्यक्षपणे रोगप्रतिकारक शक्तीला दडपून टाकतात. 

आधुनिक शेतीचे जसे काहीप्रमाणात फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. 

आधुनिक शेतीचे फायदे:

१. आधुनिक यंत्रांमुळे शेतकऱ्यांना कठीण परिश्रम घ्यावे लागत नाहीत. बी पेरणीसाठी ही यंत्रे उपयुक्त मानली जातात.

२. आधुनिक यंत्रे उत्पादन-वेळ कमी करू शकतात.

३. प्रजनन क्रियेमुळे पिकांची उत्पादकता वाढते. 

४. आधुनिक शेती पद्धतीमुळे कोरडवाहू भागात जलस्रोत शोधणे देखील शक्य होते.

५. शेततळे तयार करणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे पाणी साठवून ठेवले जाऊ शकते.

६. ठिबक सिंचन आणि पाणी फवारण्यांद्वारे शेतीच्या संपूर्ण भागाला एकसमान पाणी मिळू शकते. 

आधुनिक शेतीचे तोटे: 

१. माणूस आणि प्राण्यांचे श्रम यंत्रामध्ये स्थलांतरित केल्याने जीवाश्म इंधनाच्या ज्वलनात वाढ होते. ज्यामुळे वायू प्रदूषणाला वाव मिळतो. 

२. वनक्षेत्राचे रूपांतर शेतजमिनीत झाल्यामुळे जैवविविधता तसेच प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो. 

३. पूर सिंचनामुळे पाणी साचते आणि जमिनीतील क्षारतेचे प्रमाण वाढते. 

४. कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता नष्ट होऊन जमिनीचा ऱ्हास होतो. 

५. आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी खते व कीटकनाशकांमुळे पोषक तत्वांनी भरलेले रसायनयुक्त पाणी जवळच्या जलकुंभांत मिसळले जाते. ही सर्व अतिरिक्त रसायने भूगर्भातील पाण्यात जमा झाल्याने भूपृष्ठ आणि भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण होते. 

६. जैविकरीत्या विघटन होऊ न शकणारी कीटकनाशके अन्नसाखळीत जमा होऊन कर्करोगाचा धोका वाढवतात.


स्त्रिग्धरा नाईक