आवडणारा तो उन्हाळा...

Story: सय अंगणाची |
05th April, 10:06 pm
आवडणारा तो उन्हाळा...

मार्च-एप्रिल महिना म्हटला की काजू, फणस, कच्च्या कैऱ्या, कोकम यावर‌ फडशा‌ पाडणारे १५-१६ वर्षांपूर्वीचे आमचे बालपण‌ आठवू लागते. सकाळी शाळेत जाताना‌ एक वेगळीच मजा यायची. आईने वाळत घातलेली कच्च्या कैऱ्यांची सोलं हळूच खिशात घालून‌ शाळेकडे पावलं वळायची. आता सारखं चॉकलेट्स, सामोसा शाळेत जाताना‌ चुकूनही आमच्या नशिबी आले नाहीत. म्हणून कदाचित त्या रम्य आठवणी आजही तशाच नजरेसमोर तरळू लागतात. 


दुपारपर्यंतची शाळा. मधल्या सुट्टी दरम्यान शाळा सुटल्यावर नेमकं काय करायचं याचं आयोजन. शाळा सुटल्यावर गुरुजी कधी एकदा घरी जातात याची वाट पाहता उगाच आपापसात गोष्टी रंगवत गुरुजी गेल्यानंतर मंदिराच्या आवारात बॅगा ठेवत त्या नजरेला न भिडणाऱ्या आंब्याखाली आम्ही एकमेकांना मागे-पुढे टाकत धावायचो. असंख्य वेड्या-वाकड्या फांद्यांनी भरलेला, जणू स्वतःचा तोल न सांभाळल्यासारख्या त्याच्या त्या फांद्या दिसायच्या. वार्षिक पद्धतीप्रमाणे भरगच्च कैऱ्यांनी भरलेली फांदी तुटून हाती पडावी अशी विनवणी देवाजवळ करत माझे हात जोडले जायचे. शेवटपर्यंत एकाही दगडाने कैरी मला पाडता आली नाही; परंतु असंख्य दगडांच्या वेदना नकळतपणे खूप झेलल्या. मित्रांना छोटे टोकदार दगड, सुकलेली लाकडं आणून देण्याचं काम मी झक्कासपणे करायचे. कुठे उभे राहून नेम मारायचा, त्याप्रमाणे कैरी पडली तर ती माझ्यासाठी हे ठरलेलंच. अशाप्रकारे माझ्या वाट्याला अपेक्षेपेक्षा जास्त कैऱ्यांची भर व्हायची. 

कधी कधी मित्रांमध्ये मारामारी व्हायची. नंतर रागात पुन्हा दगड फेक झाली की भांडणाला सुरुवात करणाऱ्या मित्राला एकापेक्षा दोन कैऱ्या भेटायच्या. जणू मैत्रीतला वाद तिथेच मिटवण्याचे कार्य तो अथांग वृक्ष करायचा. एखाद्या शुभकार्याचा प्रारंभ नारळ फोडून केला जातो त्याप्रमाणे मिळालेल्या पहिल्या कैरीला दगडाने फोडून‌ तिचे तुकडे करून आपापसात वाटले जायचे. जर कैरीत पारंबी झाली असेल तर तिच्यावर हक्क  माझाच असायचा. जमा केलेले दगड मारून संपेपर्यंत ती पारंबी फुटेपर्यंत दाताने खरडून काढण्यात आनंद‌ मिळायचा... आहाहा!. ती फेकली की कैरीची फोड, तिला लागलेली दगडाची माती हातानेच पुसत ती तोंडांत चॉकलेटसारखी चघळण्यातील मजा आताच्या पिढीला काय माहीत!? युध्दात लढल्यासारखे घामाने चिंभ भिजलेले शरीर पुन्हा घरची वाट धरायचे. 

गावातून धनगरवाड्यावर जाताना माझा दररोजचा एकटीचा प्रवास. त्याच्यामुळे आजही एकटीचा प्रवास आनंददायी वाटतो. मातीचा रस्ता दगडांनी भरलेला, कधी सरळ चालता न येणारा. वाटेतून जाताना दोन्ही बाजूला कोकमाची, आंब्यांची झाडे. रखरखत्या उन्हातून जाताना कधी पाठीवर बॅग, तर कधी मॉकेब्मोवाली ती पिवळ्या रंगाची पिशवी पाठीवर मारत माझा प्रवास सुरु व्हायचा. उन्हाळा म्हटला की माझं माझ्या चपलांशी कधी पटत नसायचं. आजही उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर निघताना पायावर नजर मारणं न आवडण्यासारखंच. घामाने पायाचा तळभाग ओला चिंब, त्यातच त्यावेळी पॅरागॉन चप्पलामधील धूळ या दोहोंच्या मिश्रणाने एकप्रकारचा चिखल तयार व्हायचा अन् मी पुढे आणि नकळत चप्पल मागे राहायचं. एखाद्यावेळी कंटाळा आला की चपला हातात धरून मी एक चढती उन्हाचे चटके सहन करत पार करायचे. आज हॉटमिक्सच्या रस्त्याने त्या आठवणी गुदमरून गेल्या. हातातील चपला खाली ठेवल्या की कोकमाच्या झाडाची कोवळी तांबूस रंगाची पाने काढून तोंडात, तर काही खिशात घालत वाट एकटीची पुन्हा सुरु व्हायची. 


कधी सर्दी नाही, कधी घसा दुखणं नाही. कधी ऊनही जाणवलं नाही. पावसात भिजांव‌, तर उन्हात भाजावं! असचं भाजण्याचे चटके कधी नकोसे वाटलेच नाहीत. कैऱ्या, कोकमं, पिकलेल्या फणसाच्या उकडलेल्या आठळ्यांनी आमची जिंदगी आंनदमय केली. तो उन्हाळा कधी नकोसा वाटलाच नाही. कोकम फोडून आताल्या बिया चोखून झाल्यावर मिळेल त्या जागी पक्षांसारखे फेकण्याचे कार्य आमच्याही हातून‌ नकळत्या वयात होऊन गेले असावे याची जाणीव आज होते. 


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌ सत्तरी गोवा.