नाकावरच्या रागाला....

Story: पालकत्व |
05th April, 10:05 pm
नाकावरच्या रागाला....

काही पालक हे त्यांच्या मनात सुरू असलेला विचार, ऑफिसमधील सहकार्यांशी झालेले मतभेद आणि कामाचा ताण कॅरी करतात. घरी आल्यावर मुले जर मनाविरूद्ध वागली किंवा त्यांचे ऐकले नाही, तर पालक मुलांवर आपल्या राग काढतात. पण पालकांना हे कळत नाही की, याचे मुलांवर दीर्घकालीन हानिकारक परिणाम होऊ शकतात. पालकांकडून नेहमी रागराग व्यक्त केल्यास, कुटुंबात तणावाचे वातावरण राहते. याचा परिणाम मुलांची कार्यक्षमता, त्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.


पालकांच्या ओरडून रागवण्याचा मुलांवर परिणाम होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पालकांच्या रागवण्याने मुले स्वतःला दोषी ठरवतात. या विचारामुळे मुलांवर ताण निर्माण होतो. याचा परिणाम मुलांच्या मेंदू विकासावर होतो. त्यामुळे मुलांना भविष्यात मानसिक आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो.

पालकांनी सातत्याने आपल्या मुलांवर राग व्यक्त केल्याने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. पालक सतत रागवत असल्याने मुले अबोल बनतात. कोणाशीही मनमोकळेपणाने बोलत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या भावनेवर होतो. पालकांच्या भीतीने मुले आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. मनात दाबून ठेवतात, यामुळे मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो.

राग सहन न  झाल्याने अनेक पालक आपल्या मुलांवर ओरडतात किंवा मारहाण करतात. एका संशोधनात म्हटले आहे की, बालपणात जर मुलांना शाब्दिक आणि शारीरिक ताणतणावाचा सामना करायला लागला तर, प्रौढ वयात त्याला डोकेदुखी, संधिवात आणि तीव्र वेदनेचा सामना करावा लागू शकतो. घरात येताच मनातले विचार, ऑफिसचे काम, जीवनातील ताणतणाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलांसोबत फ्रेश मुडने संवाद साधा. पालकांनी मुलांसोबत संवाद साधताना आपला राग, चिडचिड, विचार बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

मुले चुकल्यानंतर, त्यावर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजून घ्या. संवाद साधताना त्यांच्या वयाच्या पातळीला जा. आणि त्यांच्यासारखाच संवाद साधा, म्हणजे ते लवकर संवादी बनतील.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली गोवा.