हडफडेतील भीषण अपघातप्रकरणी संशयितांविरोधात १८६ पानी आरोपपत्र दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 04:17 pm
हडफडेतील भीषण अपघातप्रकरणी संशयितांविरोधात १८६ पानी आरोपपत्र दाखल

म्हापसा : हडफडे येथे झालेल्या भीषण अपघातातील संशयित आरोपी आंतोन बिचकोव या रशियन नागरिकासह कार मालक सुजय ताम्हणकर (ओशेल-शिवोली) यांच्याविरोधात हणजूण पोलिसांनी म्हापसा न्यायालयात १८६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या अपघातात तिघा पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

मायणा-भाटी, हडफडे येथील रशियन क्लबसमोर २ डिसेंबर २०२३ रोजी भल्या पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. संशयित कार चालक आंतोन बिचकोव याने निष्काळजीपणे व बेदरकारपणे कार चालवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या कारला भरधाव वेगाने ठोकर दिली होती. त्यामुळे झालेल्या अपघातात महेश शर्मा (४८, रा. नाशिक, महाराष्ट्र), दिलीपकुमार बांग (४६, रा. हैदराबाद, तेलंगणा) आणि मनोजकुमार सोनी (४६, रा. हैदराबाद, तेलंगणा) हे तिघे ठार झाले. तर संशयित आंतोन बिचकोव्ह (२७, रा. शिवोली) हा रशियन पर्यटकही गंभीर जखमी झाला होता. मयतांचा मित्र सुरेश शर्मा (४८, हैदराबाद) व कार चालक रामकुमार हल्लाले (४३, रा. हैदराबाद) हे दोघेही या अपघातातून बचावले होते.  

हैदराबाद आणि नाशिक येथील चार मित्र गोव्यात १ डिसेंबर रोजी पर्यटनासाठी आले होता. त्यांनी आपल्यासोबत कार चालकाला आणले होते. हे पाचही पर्यटक रात्री हडफडे येथील रशियन क्लबमध्ये गेले होते. त्यांनी टीएस-०६ईझेड-१८६१ ही आलिशान कार क्लबच्या समोर रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. काही वेळाने कार चालक बाहेर आला व गाडीत बसला. तर चौघेही पर्यटक पहाटे ३.३० वा. क्लबमधून बाहेर आले. एकटा समोरच्या शीटवर बसला तर तिघेजण मागच्या शीटवर बसण्यासाठी दरवाजा उघडत होते. त्याचवेळी जीए-०३झेड-८००१ या क्रमांकाच्या पोलो कारने भरधाव वेगाने या कार आणि दरवाजा उघडत असलेल्या पर्यटकांना धडक दिली. त्यात वरील तिघाही पर्यटकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता.  

त्यानंतर संशयित रशियन पर्यटकाची कार सुमारे ५० मीटर अंतरावर जाऊन बाजूच्या नाल्यात पलटी होऊन तोही गंभीर जखमी झाला होता. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित आरोपी आंतोन बिचकोव व कार मालक सुजय ताम्हणकर यांच्या विरोधात भा.दं.सं.चे कलम २७९, ३०४ व ३३६ आणि मोटार वाहन कायदा कलम १९२ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या प्रकरणी संशयित आंतोन यास अटक केली होती.

सध्या संशयित आरोपी आंतोन हा न्यायालयीन कोठडीत आहे. वरील गुन्ह्याखाली पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग यांनी दोन्ही संशयितांविरुद्ध १६ साक्षिदारांच्या साक्षीनुसार १८६ पानी आरोपपत्र म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात दाखल केले आहे.

हेही वाचा