राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 03:47 pm
राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी बहीण प्रियांका वाद्रा यांच्यासोबत रोड शो केला. तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

उमेदवारी दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला संबोधित केले. ‘मी पाच वर्षांपूर्वी वायनाडमध्ये आलो. तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिले. तुम्ही लगेच मला तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनवले. वायनाडच्या प्रत्येक व्यक्तीने मला आपुलकी, प्रेम आणि आदर दिला आहे. मला स्वतःचे मानले आहे. तुमचा खासदार होणे, हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी तुम्हाला मतदार म्हणून पाहत नाही. वायनाडच्या घरात मला बहिणी, आई, वडील आणि भाऊ आहेत. यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो, असे राहुल यांनी म्हटले आहे.

केरळमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान

केरळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) नेत्या ॲनी राजा रिंगणात आहेत. राहुल गांधींसाठी ही लढत सोपी जाणार नसल्याचे बोलले जात आहे. इंडी आघाडीच्या स्थापनेपासून केरळमधील सीपीआयने राहुल गांधींच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. युतीचा मुख्य चेहरा डाव्यांशी नाही तर भाजपच्या विरोधात लढला पाहिजे, असा युक्तिवाद सीपीआयने केला होता. मात्र, राहुल गांधी हे विद्यमान खासदार आहेत आणि तेथूनच निवडणूक लढवणार आहेत, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

अशा स्थितीत यावेळी राहुल गांधींना केवळ भाजपशीच नाही तर सीपीआयशीही लढावे लागणार आहे. सुरेंद्रन हा केरळमधील भाजपचा प्रसिद्ध चेहरा आहे. २०१८ मध्ये सबरीमाला आंदोलनादरम्यान ते खूप सक्रिय होते. २०२० मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. २०१९ मध्ये त्यांनी पाथनमथिट्टा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे.

हेही वाचा