तैवानला २५ वर्षांनंतर पुन्हा भूकंपाचा तीव्र धक्का; १ ठार, ५० हून अधिक जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 09:25 am
तैवानला २५ वर्षांनंतर पुन्हा भूकंपाचा तीव्र धक्का; १ ठार, ५० हून अधिक जखमी

तैपेई : तैवानच्या किनारपट्टीवर तेथील वेळेनुसार आज सकाळी ९ वाजता ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. या धक्क्यात एकाचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.


तैवान केंद्रीय हवामान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू तैवान बेटाच्या पूर्वेकडील किनारपट्टीपासून दूर असलेल्या हुआलियनच्या पूर्वेकडील काउन्टीच्या किनाऱ्याजवळ होता. तैवान सरकारला आतापर्यंत नुकसानीचा कोणताही अहवाल मिळालेला नाही.


तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९९९ नंतर बेटावर बसलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. २५ वर्षांपूर्वी झालेल्या त्या भूकंपाची तीव्रता ७.६ इतकी होती. त्यात सुमारे २,४०० लोकांचा मृत्यू झाला होता.

जपानच्या स्थानिक वेळेनुसार, आज सकाळी ९ वाजण्याच्या आधी बेटावर वसलेल्या तैवानला भूकंपाचा जबर धक्का बसला. या भूकंपामुळे दक्षिण जपानी बेटांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या त्सुनामीच्या लाटा मियाकोजिमा बेटावर तीन मीटर किंवा ९.८ फूट उंच जाण्याची शक्यता आहे, असे जपानच्या हवामान विभागाने म्हटले आहे. ओकिनावासाठीही त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीतील रहिवाशांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


तैवाननेही तत्सम त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपामुळे पूर्वेकडील हुआलियन शहरातील इमारती कोलमडल्या आहेत. राजधानी तैपेईमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवानच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी नोंदवली आहे. तर यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने रिश्टर स्केलवर ७.५ इतकी तीव्रता नोंदवली आहे. हा भूकंप शांघायपर्यंत जाणवला. चीनच्या फुझियान प्रांतातील फुझोऊ, झियामेन, क्वानझोउ आणि निंगडे येथील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी सांगितले.

हेही वाचा