मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी शंखवाळकर यांची द.गोवा जि.पंचायतीच्या सीईओपदी बदली

समाज कल्याण खात्याचे संचालक अजीत पंचवाडकर यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त ताबा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27th July, 11:20 am
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी शंखवाळकर यांची द.गोवा जि.पंचायतीच्या सीईओपदी बदली

मडगाव : मडगाव पालिकेतील मुख्याधिकारीपदाचा खुर्चीचा खेळ संपत नसल्याचे दिसते. गेल्यावर्षी मॅन्युएल बार्रेटो यांची बदली झाली व मुख्याधिकारीपदी आलेल्या गौरीश शंखवाळकर य‍ांचीही १३ महिन्यांच्या कालावधीत बदली करण्यात आली. समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१७ पासून आतापर्यंत आठ मुख्याधिकारी बदलले आहेत.

मडगावचे तत्कालीन मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांची २०२० मध्ये बदली झाली. त्यानंतर दोन वर्षे आग्नेलो फर्नांडिस मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. २० मे २०२२ मध्ये आग्नेलो फर्नांडिस यांची मडगाव मुख्याधिकारी पदावरून बदली झाली. त्यांनी १९ महिने मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. रोहित कदम यांची मुख्याधिकारीपदावर नेमणूक २०२२ मध्ये मे महिन्यात करण्यात आली होती. केवळ पाच महिने त्यांनी या पदावर काम केले आहे. 

त्यानंतर मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली, तर त्या पदावर कार्यरत असलेले मान्युएल बार्रेटो यांना मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावर पाठविण्यात आले. कदम यांच्यापूर्वी असलेले आग्नेल फर्नांडिस यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावर १९ महिने काम केले. त्यानंतर त्यांचीही बदली करण्यात आली होती.

 मागील काही वर्षांपासून मडगाव नगरपालिकेत स्थिर मुख्याधिकारी प्राप्त झालाच नाही. रोहित कदम यांच्यानंतर मडगावात मुख्याधिकारीपदी रुजू झालेल्या मॅन्युएल बार्रेटो यांचीही बदली झाली व  राज्यपाल कार्यालयात कार्यरत गौरीश शंखवाळकर यांची नियुक्ती मडगाव मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली. आता १३ महिन्यांच्या कालावधीने शंखवाळकर यांची बदली झालेली आहे. सध्या समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांच्याकडे मुख्याधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे.

अपहारप्रकरणी चौकशी व विकासकामांवर परिणाम

मडगाव पालिकेतील महसूल वाढीचा प्रश्न अजूनही कायम आहे. सोनसडोतील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्प उभारणी बाकी आहे. फेस्ताचे लिपिकाकडून १७ लाखांचा झालेल्या अपहाराची चौकशी व वसुली बाकी आहे. केवळ १३ महिन्यांच्या कालावधीत मुख्याधिकारी बदलीमुळे मडगावातील विकासकामांवर परिणाम होणार हे निश्चित आहे.

याआधीचे मुख्याधिकारी व त्यांचा कार्यकाळ

*वाय. बी. तावडे : ९ मे २०१६ ते ३० मे २०१७

*आग्नेलो फर्नांडिस : १४ जुलै २०१७ ते २३ नोव्हेंबर २०१७

*जॉन्सन फर्नांडिस : २४ नोव्हेंबर २०१७ ते १९ जुलै २०१८

*सिद्धीविनायक नाईक : १९ जुलै २०१८ ते ६ डिसेंबर २०१९

*अजित पंचवाडकर : ९ डिसेंबर २०१९ ते ४ ऑक्टोबर २०२०

*आग्नेलो ए. फर्नांडिस : ५ ऑक्टोबर २०२० ते २० मे २०२२

*रोहित कदम : २० मे २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२२

*मॅन्युएल बर्रेटो : ४ ऑक्टोबर २०२२ ते १५ जून २०२३

*गौरीश शंखवाळकर : जून २०२३ ते २७ जुलै २०२४

हेही वाचा