काँग्रेस उमेदवारांबाबत अद्याप ‘सस्पेन्स’

११व्या यादीतही नावांचा समावेश नाही : भाजप प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April 2024, 12:41 am
काँग्रेस उमेदवारांबाबत अद्याप ‘सस्पेन्स’

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसने पुन्हा एकदा उमेदवार जाहीर करण्यास विलंब केला आहे. काँग्रेसने मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची ११वी यादी जाहीर केली, ज्यात १७ उमेदवारांच्या नावांची घाेषणा केली आहे. परंतु, यामध्ये गोव्यातील उमेदवारांचा समावेश केलेला नाही. दुसरीकडे भाजपने प्रचाराचा वेग वाढवला असून, उत्तरेत प्रचाराचा दुसरा टप्पा गाठला आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या उमेदवारांची नावे मंगळवारी किंवा बुधवारीही जाहीर होण्याची शक्यता नाही. दरम्यान, उमेदवारांची १२वी यादी ५ एप्रिल रोजी जाहीर होणार असून त्यात गोव्यातील उमेदवारांचा समावेश असू शकतो.
गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांना विलंबाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्या बाजूने आम्ही उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाल्याचे मान्य करतो आणि या विलंबामुळे लोकांच्या भावनांचा आदर करतो. उमेदवार कधी जाहीर होतील याबद्दल आम्ही सर्व उत्सुक आहोत. मात्र, कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असेही ते म्हणाले.
गोव्यातील काँग्रेसच्या दोन्ही जागांसाठी उमेदवार कोण असेल आणि तो कधी जाहीर होईल, याबाबतचे सर्व निर्णय विरोधी पक्षनेते, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक समिती ठरवणार आहेत. मला याची कल्पना नाही आणि मला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करून उत्तर गोव्यातील उमेदवारीसाठी आपले नाव चर्चेत आहे, हेही आपल्याला माहीत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
भाजपचा दक्षिणेत १२ मतदारसंघांत प्रचार
भाजपने दक्षिणेचा उमेदवार जाहीर करण्यास उशीर केला असला तरी त्यांच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांनी १२ मतदारसंघांत आपला प्रचार संपवला आहे. या प्रचारादरम्यान, काही भागात मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचीही उपस्थिती राहिली आहे. दरम्यान, दक्षिणेत भाजपच्या पल्लवी धेंपो यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा ५ एप्रिलला संपणार असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.

उत्तर गोव्यात भाजपचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे, तर दक्षिणेत दुसरा टप्पा ५ एप्रिलनंतर सुरू होणार आहे. काँग्रेसकडे उमेदवार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने आमच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या घरात काय चालले आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दोन्ही मतदारसंघात आमच्या उमेदवारांचा बहुमताने विजय होईल. - सदानंद शेट तानावडे, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष



उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला हे खरे असले तरी काँग्रेस राज्याच्या हिताचा निर्णय घेईल. कार्यकर्त्यांना चिंता वाटणे साहजिक आहे. पण, पक्ष योग्य तो निर्णय घेईल हे कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. - सुनील कवठणकर, गोवा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष