हवामान बदल प्रत्येकासाठी आव्हान...

हवामान हा पृथ्वीतलासाठी महत्त्वाचा घटक आहे. हवामानावर आज अनेक गोष्टी अवलंबून आहेत हे नाकारून चालणार नाही. हवामानामध्ये सातत्याने होणारे बदल व त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम याचे धक्के आज अनेक स्तरावर आपणाला पहावयास मिळत आहेत. बदलते हवामान हे प्रत्येकासाठी एक प्रकारचे आव्हान निर्माण झाले असून आपल्यापरीने कशाप्रकारे योगदान देता येईल यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

Story: भवताल |
30th March, 11:15 pm
हवामान बदल प्रत्येकासाठी आव्हान...

जागतिक हवामान दिवस नुकताच साजरा करण्यात आला. पृथ्वीतलावर सातत्याने हवामानामध्ये होणारे बदल यामुळे होणारे नुकसान यावर कशाप्रकारे नियंत्रण आणता येईल यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येत असतो. ज्या दिवशी ही समिती स्थापन झाली त्या दिवसापासून हवामान दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाच्या माध्यमातून कशाप्रकारे हवामानात बदल होत असतात, त्याचे दुष्परिणाम कोणते, कशाप्रकारे त्यावर नियंत्रण आणणे शक्य आहे या संदर्भातही चर्चा होत असते. यामुळे हवामान हा विषय तसा लहान नसून तो व्यापक स्वरूपाचा आहे. मात्र यासाठी प्रत्येकाचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे.


आज मानवरुपी होणाऱ्या अनेक घटना अनेक प्रकारचे उपक्रम यावर हवामान अवलंबून आहे. आज परिस्थिती सातत्याने बदलताना दिसत आहे. पृथ्वीतलावर हवामानात होणारे बदल व त्याचे जैवविविधतेवर होणारे प्रतिकूल परिणाम याचा अभ्यास केल्यास येणाऱ्या काळात आपल्याला हवामानामध्ये नियंत्रण व समतोल राखायचे असेल तर अनेक गोष्टी मानवाने करणे गरजेचे आहे हे नाकारून चालणार नाही. आधुनिकता व बदलती जीवनशैली यामुळे जगामध्ये काँक्रीटची जंगले वाढून वनस्पती नष्ट होऊ लागलेली आहे. 

गावाचा विस्तार शहराप्रमाणे होऊन गाव व शहर याच्यामध्ये असलेल्या आधुनिक सोयीसुविधांमधील अंतर कमी होऊ लागले आहे. पूर्वजांनी राखून ठेवलेल्या अनेक प्रकारच्या प्रथा अबाधित करणारी ही संस्कृती आज हळूहळू आपला आकार बदलू लागलेली आहे. ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा आपण शहराप्रमाणेच वागावे, राहावे, आपल्याला त्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे वाटू लागल्यामुळे गावाचे रूपांतर हळूहळू शहरात होऊ लागले आहे. अशातच आपण आपले कुटुंब व आपला मोठा बंगला हेच आपले खरे जग आहे. अशा प्रकारचा विचार करताना घराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जागेमध्ये वनसंपदा नष्ट करून त्या जागी आपले घर बांधावे अशी प्रत्येकाची इच्छा निर्माण होऊ लागलेली आहे. दुसऱ्याने अशा प्रकारची घरे बांधली की आपल्यालाही तशाच प्रकारचे घर असावे. अशा प्रकारची विचारधारा विकसित होऊ लागल्यामुळे आज गावातील जंगल संपती नष्ट होऊन त्या जागी काँक्रीटची जंगले उभी राहू लागलेली आहेत. यामुळे गावांमध्ये असलेली शुद्ध हवा, नैसर्गिक वातावरण, शुद्ध प्राणवायू यापासून आपण दुरावत चाललेलो आहोत. याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. 

ठराविक टक्क्याची वनसंपदा असणे ही काळाची गरज आहे. अन्यथा त्याचे कशाप्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात हे अनेक भागांमध्ये, अनेक देशांनी चांगल्या प्रकारे अनुभवलेले आहे. ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा, जंगल संपत्ती होती ती नष्ट करून त्या ठिकाणी मोठमोठ्या आकाशाला गवसणी घालणाऱ्या बिल्डिंग उभ्या राहू लागल्यामुळे त्या ठिकाणी आज शुद्ध प्राणवायूची कमतरता निर्माण होऊ लागलेली आहे. शुद्ध प्राणवायूची निर्मिती करणारी वनसंपदा नष्ट होऊ लागल्यामुळे हवेत अनेक प्रकारचे घटक अपेक्षेपेक्षा जास्त होऊ लागलेले आहेत. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम जैवविविधता त्याचप्रमाणे जैविक संपत्तीवर होऊ लागलेली आहेत. याचा पहिला फटका हवामानावर होऊ लागलेला आहे. 

जंगल संपत्तीमुळे हवामानामध्ये समतोलपणा निर्माण होत असतो. मात्र जंगलेच नाहीत तर त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल हे अपेक्षित आहेत. मात्र हे बदल होत असताना मानवाला निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. एकेकाळी आपले ऋतू हे ठराविक काळासाठी सीमित होते. जून आला की पाऊस लागणार असा आपला समज होता. ठराविक महिन्यामध्ये वसंत, पावसाळा येणार हे अनेक वर्षापासून चालत आलेल्या रितीरिवाजाचाच भाग होता. आज परिस्थिती बदललेली आहे. कोणत्याही महिन्यामध्ये पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत. एक दिवस उष्णता, दुसऱ्या दिवशी थंडीची चाहूल. अचानकपणे पावसाचे कोसळणे असे हवामानात सातत्याने होणारे बदल सजीव जीवनाला समस्या निर्माण करणारे आहेत हे नाकारून चालणार नाही. यामुळे येणाऱ्या काळात हवामान समपातळीवर ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्यापरीने योगदान देणे गरजेचे आहे. आज पाण्याची महत्त्व विसरणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे याचे परिणामही आपल्याला भोगावे लागत आहेत. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर बारकाईने विचार केल्यास हवामानातील बदल नियंत्रण प्रक्रिया ही आपल्याच हाती आहे हे लक्षात येईल. यामुळे सर्वप्रथम जंगल संपत्ती व वनराईचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी बनली पाहिजे किंबहुना तो जीवनाचा एक महत्त्वाचा भागच आहे ही विचारधारा प्रत्येकात निर्माण होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. विकासाच्या नावाखाली आपण अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहोत. मात्र याचे गंभीर परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ लागलेले आहेत. पाण्याचे अस्तित्व टिकणे गरजेचे आहे. नद्या सातत्याने प्रभावित राहणार. याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. एकेकाळी आज अनेक भागांमध्ये असलेल्या नद्या ह्या बारमाही प्रवाहीत होत्या मात्र आता डिसेंबर-जानेवारीमध्ये या नद्यांचे प्रवाह सुकू लागतात. 

विकासाच्या नावाखाली निर्माण होणार्‍या मोठमोठ्या प्रकल्पांतून निघणारा धूर हा अनेकदृष्ट्या हवामानासाठी बाधक ठरू लागलेला आहे. यामुळे हवामानामध्ये सातत्याने होणार्‍या बदलांचा विचार आज गांभीर्याने होणे गरजेचे आहे. हवामान म्हणजे नक्की काय? याची माहिती आज तरुण पिढीसमोर निर्माण झाल्यास येणाऱ्या काळात हवामानात होणारे बदल व त्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम याचाही बारकाईने अभ्यास करून त्याची अंमलबजावणी केल्यास येणाऱ्या काळात आपल्याला काही प्रमाणात दिलासा मिळणे शक्य होईल.


उदय सावंत, वाळपई