गोपकपट्टण : अस्तित्व हरवलेला वैभवशाली गोमंतकीय दुर्ग

Story: इतिहासाची सोनेरी पाने |
30th March, 11:13 pm
गोपकपट्टण : अस्तित्व हरवलेला वैभवशाली गोमंतकीय दुर्ग

गोव्याचा प्राचीन इतिहास फार विस्तृत आहे. अनेक राजघराण्यांनी इथे आपली राजसत्ता स्थापली. गोव्याच्या भूमीसाठी त्यातल्या बऱ्याच सत्ता स्मरणीय आहेत. गोव्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेताना आपणास तत्कालीन राजधानी असलेल्या गोपकपट्टणचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. 'गोवा' किंवा 'गोमंतक' प्रदेशाच्या प्रचीनत्वाची बरीचशी गुपिते गोपकपट्टणच्या अंतरंगात दडलेली आहेत. गोवपुरी अर्थात सध्याचा पिलार टेकडी परिसर, यात करमळीपासून ते पश्चिमेकडे सिंधूसागर आणि रायबंदर ते दक्षिणेकडे आगशी असा विस्तृत प्रदेश येतो. ही गोव्याची प्राचीन राजधानी होती, तर गोपकपट्टण हा या राजधानीचा बांधीव सागरी किल्ला होता. गोपकपट्टण हे एक तत्कालीन नावाजलेले बंदर म्हणून जगभरात ओळखले जात होते. सध्या यातला बराचसा परिसर प्रशासकीय दृष्ट्या तिसवाडी तालुक्यात येतो. 

सांप्रत, तिसवाडी परिसर तसेच गोवापुरीवर सर्वप्रथम कोणाचा अंमल प्रस्थापित झाला हे सांगणे कठीण असले तरीही ते प्राचीन काळापासून समुद्री व्यापाराचे एक समृद्ध व्यापारी ठाणे असल्याचे पुरावे सापडतात. संशोधकांच्या नजरेतून गोवापुरी ही शिलाहारांनी वसवलेली राजधानी असून त्यांचा कार्यकाळ साधारण इ. स. ७६५ ते १०२० इतका गणला जातो. शिलाहारांकडून याचा ताबा कदंबांनी घेतला. कदंब सत्तेचा कार्यकाळ साधारण इ. स. १०५० ते १३५४ असा गृहीत धरला जातो. नाविक दल हे कदंब राजसत्तेचे सामर्थ्य होते. त्यांच्याकडे युद्धनौका होत्या, सुसज्ज आरमार होते, समुद्रावर सत्ता गाजवण्यासाठी पुरेसं सैन्य जवळ असल्याने समुद्री व्यापारावरही त्यांचा वचक होता. गोपकपट्टण हे बौद्ध अनुयायांसाठी धर्मप्रसारार्थ एका ठिकाणाहून इतरत्र जाण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. त्यामुळे इथे सुरुवातीच्या काळात बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार झाल्याचेही आढळते. 

तिसवाडीचा बराचसा भाग झुआरी आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने भरलेला आहे. प्राचीन काळी 'अनगाशिनी' या नावाने सर्वदूर परिचित असलेली झुआरी नदी गोव्यातील एक प्रमुख नदी आहे. या परिसरातील सध्या दिसत असलेली वस्ती ही बऱ्यापैकी नैसर्गिक भराव झालेल्या भागावरच उभी आहे. हे गोमंतकातील एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने इथल्या व्यापाराचे धागेदोरे पूर्व आशियातील बऱ्याच देशांसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे. चिंबल, रायबंदर सारख्या भागात खुसरू द्वितीयच्या काळातील सापडलेली नाणी यासाठी पुरेशी आहेत. गोपकपट्टणचा प्रथम उल्लेख सापडतो तो कदंब राज्यकाळात. अकराव्या शतकातील कदंब राजा दुसरा षष्ठदेव याच्या सन १०२०च्या एका ताम्रपटात षष्ठदेवने दक्षिण आणि उत्तर कोकण जिंकल्याचा उल्लेख आला आहे. यावेळी शिलाहार वंशीय मुम्मुणी हा सत्तेत होता. त्याने शरणागती पत्करत कदंब राजांशी सलोख्याचे संबंध ठेवले. आपले राज्य कदंबाचे मांडलिक राज्य म्हणून स्वीकार केले. इतकेच नव्हे, तर त्याने आपली कन्या कदंब राजा षष्ठदेव यास देऊन नातेसंबंधही बनवले. १०५४च्या ताम्रपटावरून शिलाहारांची राजधानी गोपकपट्टणच होती हे सिद्ध होते. मुम्मुणीच्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे षष्ठदेव याने उत्तर कोकणचा प्रदेश त्यास परत केला. १०५० मध्ये षष्ठदेवचा मृत्यू झाला आणि त्याचा पुत्र जयकेशी पहिला हा कदंब सत्तेच्या प्रमुखपदावर आरूढ़ झाला. याने १०५० ते १०८० इतकी प्रदीर्घ सत्ता गाजवली. 'गोपकपट्टण' म्हणजेच 'थोरले गोवें' चा ठळक उल्लेख येतो तो याच्याच कार्यकाळात. जयकेशीने गोपकपट्टणला आपल्या राजधानीचा दर्जा दिला. गोपकपट्टणला राजधानीचा दर्जा मिळाल्याने या शहराची भरभराट झाली. इथे अरब, युरोपीय राष्ट्रांच्या गलबतांनी, जहाजांनी आपला व्यापार आणखी समृद्ध केला. कदंबांनी गोपकपट्टणला जागतिक नकाशावर आणले. लिस्बनमधील संग्रहालयात कदंब राजा जयकेशी प्रथम यांच्या काळातील एक ताम्रपट उपलब्ध आहे. त्यावरून गोपकपट्टणचा व्यापार संबंध सिंहलद्वीप (श्रीलंका), कुवैत, झंजीबार, क्वेट्टा यांसारख्या देशांसोबतच तत्कालीन भारतीय उपखंडातील बंगाल, गुजरात, केरळ आदी राज्यांसोबत होता. कदंब राजांनी एक सेवा ट्रस्ट (मिजीगीठी) चालवला होता ज्याचा बहुतांश खर्च गोपकपट्टण बंदरातून होणाऱ्या व्यापारातून केला जात असे. एक ठराविक रक्कम यासाठी आकारली जात असे. एक प्रकारे हा 'जनकल्याण कर' असून त्यातून अनाथ, अपंग लोकांसाठी, मुलांसाठी आश्रयघरे चालवली जात असत. गोपकपट्टण ही गोव्याची प्राचीन राजधानी म्हणून जवळपास आठवे शतक ते अगदी चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत (१३८०पर्यंत) ओळखली जात होती असे 'द हेरिटेज ऑफ गोवापुरी'मध्ये संशोधक कॉस्मा कोस्टा म्हणतात. जागतिक नकाशावर व्यापारीदृष्ट्या गाजत असलेल्या गोवापुरीला लागलेली उतरती कळा ही गोपकपट्टणलाही विस्मृतीत घेऊन गेली. तत्कालीन गोव्याच्या इतिहासातील एक दुर्दैवी घटना म्हणून गोपकपट्टण तसेच गोवापुरी शहराची अधोगती म्हणता येईल. शिलाहार सत्तेनंतर कदंब इथले राज्यकर्ते झाले. यादवांनी कदंबांच्या सत्तेवर प्रहार केला तर मुस्लिम आक्रमकांनी यादवांना अंकित केले. पराभवाची अशी मालिकाच उभी राहिल्याने गोपकपट्टणचं सामर्थ्यही लयाला गेले. दिल्ली सुलतान जमालउद्दीन याने १३४२ला ५२ जहाजे घेऊन हल्ला केला आणि गोपकपट्टण तसेच शहराची लूट केली. इब्न बतुता नावाचा प्रवासी याविषयी सविस्तर लिहितो. जुन्या गोव्याच्या संग्रहालयात असलेल्या एक वीरगळवरील आकृत्या पाहता तो शेवटचा कदंब राजा विरवर्मन याचा असावा असे पुरातत्व शास्त्रज्ञ हेरास म्हणतात. हा वीरगळ १३५४ मधील असावा असेही ते नमूद करतात. विरवर्मनचा मृत्यू सागरी युद्धात झाल्याने वीरगळवर नाविक युद्ध दर्शविले आहे. यांच्या मृत्यूनंतर गोव्यातील कदंब सत्तेचा कार्यकाळ संपुष्टात आल्याचे हेरास मानतात. 

गोपकपट्टणचे ऐतिहासिक महत्त्व प्रचंड आहे. एकेकाळी भरभराटीला असलेला हा दुर्ग सध्या मात्र जवळपास संपूर्णतः नामशेष झाला आहे. गोवा वेल्हा ते पिलार असा समुद्रीपट्टीला लागून असलेला हा किल्ला आता त्याची जवळपास पाच किमी लांबीची तटबंदी आणि समुद्राच्या पोटात घुसलेली एक बांधीव भिंत या रुपात अस्तित्व टिकवून आहे. वास्तविक सध्या दिसत असलेल्या समुद्राच्या पाण्याची पातळी हजारभर वर्षापूर्वी अजून आत असावी. यामुळेच किल्ला बांधताना तो समुद्री लाटांपासून सुरक्षित अंतरावर बांधला असावा. भौगोलिक रचनांनी झालेल्या बदलांमुळे प्रत्यक्ष बांधकामे पाण्याखाली गेली असावीत. मात्र तरीही, ओहोटी असेल तेव्हा याची पाण्यात लपलेली भिंत आपण पाहू शकतो. यावेळी आपल्याला तिच्या भव्यतेचा अंदाज येतो. सध्या इथे स्थानिक लोकांकडून किनाऱ्याची धूप वाचावी म्हणून काही ठिकाणी सिमेंटीकरण करून ही ऐतिहासिक भिंत मुजवली गेली आहे. याचे लाल रंगाच्या चिऱ्याचे (लॅटराईट स्टोन) बांधकाम आजही बरेचसे मजबूत वाटते. तीन ते चार फूट लांब अन दोन अडीच फूट रुंद चिऱ्याच्या विटांनी तटबंदी बांधलेली आहे. इतरत्र प्रचंड चिरे विखुरलेले आहेत. झाडाझुडुपांनी हा संपूर्ण परिसर इतका गच्च आहे की समुद्री लाटांच्या आवाजाशिवाय इथे काही जाणवत नाही. बऱ्याच ठिकाणी ही भिंत पाच फुटांपर्यंत उभी आहे. 

गोपकपट्टणच्या परिसरात आजही शास्त्रीयदृष्टीने उत्खनन होणे गरजेचे आहे. अर्थात गोपकपट्टण स्थळी नोव्हेंबर १९९१साली उत्खनन केले गेले होते. एकूण चार टप्प्यात झालेल्या त्या उत्खनन कार्यात ऐतिहासिक दृष्ट्या काही महत्त्वाचे निष्कर्ष पुरातत्वतज्ञांनी काढले होते. तत्कालीन उत्खनन प्रमुख अनिरुद्ध गौर यांनी यावर विशेष प्रबंध लिहिला आहे. इतका महान प्राचीन इतिहास लाभलेला दुर्ग असल्याने इथे बरेचसे ऐतिहासिक अवशेष मिळू शकतात. नाणी, भांडी, शस्त्रे आदी गोष्टींच्या अनुषंगाने उत्खनन झाल्यास गोमंतकाच्या वैभवशाली इतिहासाचे कंगोरे आणखी प्रकर्षाने समोर येतील. गोपकपट्टण, गोवापुरी (गोवा वेल्हा, पिलार परिसर) आणि आजूबाजूच्या इतिहासाला हे पोषक होऊ शकते. 

पिलार मॉनेस्ट्रीच्या इमारतीत असलेले पिलार वस्तुसंग्रहालय हे दर्शनीय आहे. इथे गोपकपट्टण, गोवापुरी संदर्भात असंख्य वस्तू, नाणी, मूर्ती आदी अवशेष प्रदर्शनार्थ ठेवले आहेत. कदंब राजसत्तेचे सुवर्ण नाणे, 'सिंहलांचन', सुंदर विष्णू मूर्ती, अश्मयुगीन अवजारे आदी बाबी या संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. अभ्यासू इतिहासप्रेमींनी याचा जरूर लाभ घ्यावा. बाकी, इतिहासाच्या नक्षीदार पृष्ठावरचं गोपकपट्टणचं अस्तित्व सागरी लाटांच्या तडाख्यांनी संपूर्णतः संपण्यापूर्वी त्याच्या संवर्धनाची बूज सांभाळायला हवी. हे अशक्त कोटीतले काम असले तरीही शक्य ते करायला हवे, कारण हा आपला इतिहास आहे अन् तो सांभाळणं गरजेचं आहे. 

संदर्भ : 

आऊटलाईन ऑफ प्रि-पोर्तुगीज हिस्टरी ऑफ गोवा. (गेराल्ड परेरा) 

द हेरिटेज ऑफ गोवा (कॉस्मे कोस्टा)

गोवन सोसायटी थ्रू द एजेस (बी.एस. शास्त्री) 

एक्सकॅवेशन ऍट अनसियंट पोर्ट ऑफ गोपकपट्टण. (अनिरुद्ध सिंग गौर, मरीन आर्कियोलॉजि सेंटर) 

गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर (संदीप मुळीक) 

वृत्तपत्रीय लेख

स्वानुभावातील स्थलदर्शन.


संतोष काशीद