मतदारांना आमिष दाखवणार्‍यांवर कठोर कारवाई गरजेची

महाराष्ट्र

Story: राज्यरंग |
28th March, 11:35 pm
मतदारांना आमिष दाखवणार्‍यांवर कठोर कारवाई गरजेची

आगामी लोकसभा निवडणूक देशभरात सात टप्प्यांत, तर राज्यात पाच टप्प्यांत होणार आहे. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवार, १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. तेव्हापासूनच देशभरात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर ११ दिवसांतच निवडणूक आयोगाने राज्यभरात कारवाई करून मोठ्या प्रमाणात रोकड आणि बेकायदेशीर दारू जप्त केली आहे. प्रत्यक्षात किती मोठ्या प्रमाणात निवडणुकीत दारू आणि पैसा यांचा वापर होत असेल, याची सर्वसामान्य लोक कल्पनाही करू शकणार नाहीत. अशाच प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियाच बदनाम होत आहे.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. गेल्या वेळेस राज्यात चार टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात विविध राजकीय पक्षांकडून २७ मार्च रोजी सायंकाळी उशिरापर्यंत १६० जणांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये रामटेक मतदारसंघातून ४१, नागपूर ५७, भंडारा-गोंदिया ९, गडचिरोली १३ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ४० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही नागपूर मतदारसंघातून २७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिल्या टप्प्याचा २७ मार्च हा शेवटचा दिवस होता. २८ मार्च रोजी या अर्जांची पडताळणी करण्यात आली. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी पैसे, वस्तू आणि दारूचे आमिष दाखवले जाते, हे सर्वज्ञात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लागू झालेल्या आचारसंहितेनंतर ११ दिवसांत राज्यात तब्बल २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड राज्य निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. राज्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये दारू, अमलीपदार्थ आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक ३.५९ कोटी रुपये एवढी रक्कम मुंबई उपनगरांतून, मुंबई शहरात २.०८ कोटी रुपयांची रोकड, तर नागपूरमध्ये १.६१ कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. ही सर्व रक्कम सध्या प्राप्तीकर विभागाकडे गोळा करण्यात आली असून याविषयी कायदेशीर तपास सुरू आहे.

राज्यात १४.८४ लाख रुपये किमतीची बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली. पुण्यात १ कोटी रुपये किमतीची सर्वाधिक ३.२४ लाख लिटर बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली. नागपुरातून ६६ हजार ८७८ लिटर, तर मुंबई शहरातून ३४९ लिटर आणि उपनगरांतून २० हजार ६६४ लिटर दारू जप्त करण्यात आली.

निवडणूक आयोगाने राज्यभरात केलेल्या कारवाईत एकूण ६ लाख ९९ हजार ९७९ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले आहेत. सर्वाधिक १ लाख ९ हजार ५८५ ग्रॅम अमलीपदार्थ रायगडमधून जप्त करण्यात आले, त्या खालोखाल मुंबई शहर आणि उपनगरे येथून अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

मतदारांना आमिष दाखवणे वा उमेदवाराकडून मताचा मोबदला घेणे सुदृढ लोकशाहीला मारक आहे. सुशासन देणारे राज्यकर्ते मिळवण्यासाठी सतर्क राहून मतदान करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासह त्याला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे.

प्रदीप जोशी, (लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)