डेडलाईनबरोबर कामाचा दर्जा राखण्याची गरज

Story: राज्यरंग |
25th April, 12:42 am
डेडलाईनबरोबर कामाचा दर्जा राखण्याची गरज

'नेमिची येतो मग पावसाळा...' या उक्तीचा प्रत्यय नेहमीच येत असतो. रस्त्यांच्या बाबतीत तर दरवर्षी नेमेची येतो... अशीच गत असते. वर्षाच्या सुरवातीला रस्ते हॉटमिक्स करून गुळगुळीत केले जातात. खड्डे बुजवण्यासह काही ठिकाणी कॉंक्रिटचाही वापर केला जातो. पावसाळा आला की दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडतात. खड्डे पडले की वाहन चालकांना वाहने चालविताना अडचण होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बरेच अपघात झालेले आहेत. विशेष करून दुचाकी चालकांसाठी रस्त्यावरील खड्डे बरेच धोकादायक ठरतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बऱ्याच दुचाकी चालकांना जीव गमवावा लागलेला आहे. रस्त्यांचे हॉटमिक्सिंग किंवा रस्ते करताना कामाच्या दर्जाकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे. वेळेत काम पूर्ण करण्याच्या गडबडीत बऱ्याच वेळा कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होते. तरीही दर्जाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. 

पणजीत सध्या स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे केवळ पणजीकरांचाच नव्हे तर पणजीत येणाऱ्या सर्वांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. पणजीतील रस्ते धुळीने माखलेले आहेत. दुचाकी सोडाच रस्त्याच्या बाजूने चालणेही धोकादायक ठरत आहे. सकाळी व सायंकाळी पणजीतील सर्व रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झालेली आहे. रस्ते दुरुस्त करण्याबरोबर मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याची कामेही सुरू आहेत. केवळ पणजीतच नाही, तर आता रायबंदर येथेही स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे रायबंदरचा रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद आहे. याचा परिणाम म्हणून जुने गोवा बगल महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढलेला आहे. यामुळे चिंबल सिग्नलपाशी वाहतुकीची कायम कोंडी होत असते.

या महिन्याभरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. दरदिवशी दोन, तीन अपघात होत आहेत. यात एका, दोघांचा हकनाक बळी जातो. अपघाती बळी ही चिंतेची बाब झालेली आहे. पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामाबद्दलही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धूळ प्रदूषणाच्या मुद्यावर जागरूक नागरिकानी खंडपीठाचे दरवाजेही ठोठावले होते. यामुळे खंडपीठाच्या न्यायाधीशांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी  केली. हे सगळे रामायण सांगायचे कारण म्हणजे, परवाच्या अवकाळी पावसामुळे स्मार्ट सिटीतील रस्त्यांवर झालेला चिखल. दोन तासांच्या पावसानंतर रस्त्यांची पूर्ण दैना झाली. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे ही डेडलाईन आहे. ३१ मेपर्यंत कामे पूर्ण होतील, अशी ग्वाही स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. 

जूनमध्ये पाऊस सुरू होणार असल्याने ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करावीच लागणार आहेत. ही कामे पूर्ण करीत असताना दर्जाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. गेल्या वर्षी सुद्धा पणजीत रस्त्यांची दुरुस्ती झाली होती. जूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यावरील खडी वाहून गेली होती. यंदा तसे होता कामा नये. नपेक्षा 'नेमिची येतो मग पावसाळा...' असे चालू राहता कामा नये.


- गणेश जावडेकर