शिमगाच, पण नव्या काळातला

पूर्वी शिमग्याच्या सणाला मनातील सगळा राग बाहेर काढला जायचा. होळी पेटल्यानंतर जोराने बोंब ठोकत एकमेकांना अर्वाच्च भाषेत लाखोली वाहिली जायची. एक प्रकारे तेव्हाच्या समाजव्यवस्थेने माणसांच्या अभिव्यक्तीसाठी तयार केलेले हे व्हेंटिलेटर्स होते. आता वर्षभर शिमगा सुरू असतो. त्यातच निवडणुकांचा काळ म्हणजे एकमेकांच्या नावे बोटे मोडण्याची सुवर्णसंधीच असते. त्यामुळेच यंदा शिमगाकाळ मोठा आहे!

Story: विचारचक्र |
28th March, 11:33 pm
शिमगाच, पण नव्या काळातला

शिमगोत्सव आणि निवडणुकांच्या घोषणा यात फार मोठे साम्य असते. पहिल्यापासूनच शिमगोत्सव म्हणजे जणू अर्वाच्च भाषेत बोलण्याची संधी वा परवानगी अशा अर्थाने साजरा केला जाणारा सण मानला जातो. या अर्थाने विचार करायचा तर यंदा शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. निवडणूक आयोगाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून निवडणुका ही तर अर्वाच्च भाषेत बोलण्याची नामी संधी असतेच! पण आजकालचे सामाजिक आणि राजकीय वातावरण बघता अर्वाच्च बोलण्यासाठी आता आपण निवडणुका वा शिमग्याची वाट बघतो असे नाही. वाढत्या अर्थव्यवस्थेत आणि त्यातही मोदी अर्थकारणाविषयी असे बोलले जाते की, सगळ्या महत्त्वाच्या आर्थिक घोषणा अर्थसंकल्पात न होता त्याबाहेरच होतात. त्या धर्तीवर सांगायचे तर अर्वाच्च बोलणे, एकमेकांच्या नावाने ओरडणे हे आपल्याकडे शिमग्यालाच नव्हे तर आता अव्याहत सुरू असते. त्यामुळे खरे तर शिमग्याचे सार्वत्रिकीकरण हेच अलीकडच्या काळातील ठळक वैशिष्ट्य मानावे लागेल.

शिमगा हा एकमेव सण आहे, ज्यात सामाजिक संकेत बाजूला ठेवले जातात. शिमग्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असला तरी रात्री होळी पेटल्यानंतर सकाळी ज्या घरातील पोळी खाल्ली तिथल्याच लोकांच्या नावे बोंब मारण्याची सवलत वा सोयही संस्कृतीने करून ठेवली आहे. हल्ली घोषणांची पुरणपोळी दिली जाते आणि अंमलबजावणीच्या अभावाचा शिमगा मात्र नेहमीच कानी येतो. अन्यथा, मुंबई - गोवा रस्ता वा गावखेड्यांतील अनेक रस्ते इतकी वर्षे कशाला अडले असते?

होळी आणि धुळवड अगदी तोंडावर असताना देशात आचारसंहिता लागू झाली. मात्र ती थोडी पुढे गेली असती तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. म्हणजेच गेली काही वर्षे गणपती, दहीहंडी, दसरा, दिवाळी आदी सणांसाठी प्रायोजक-आयोजक करणारे गट सक्रिय झाले आहेत. त्याच धर्तीवर कदाचित अनेक राजकीय गटातटांना शिमग्याचे प्रायोजकत्व घेण्याची उत्तम सोय झाली असती. निवडणुकीच्या आदल्या दिवशी लोकांमध्ये काहीबाही वाटण्यापेक्षा शिमग्याच्या निमित्ताने जागरूकतेने आणि अधिकृतपणे बरेच काही वाटता आले असते. अर्थात हे गंमतीचे मुद्दे सोडले तरी या सणावारांमधील अर्थकारण आणि समाजकारण लक्षात घ्यायला हवे. सार्वत्रिकपणे साजरा होणे हे होळीचे एक वैशिष्ट्य आहे. काळाच्या ओघात समाजनेतृत्वाने जाणीवपूर्वक सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याचप्रमाणे तत्कालीन मंडळींनी दूरदर्शीपणा दाखवत शिवजयंती उत्सव सुरू केला. मात्र होळीला सार्वत्रिक स्वरूप कोणा एकाने कोणे एकेकाळी दिल्याची नोंद नाही. म्हणजेच पहिल्यापासूनच ही केवळ सामूहिकच नव्हे तर सामाजिक प्रक्रिया राहिलेली आहे. हे बघता सामाजिकतेचा असा अंगभूत गुण हल्लीच्या सोशल मीडियामध्ये आढळतो का, याचाही विचार करावा लागेल.

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचे निरनिराळे उपयोग आता चलनात आहेत. त्यामुळेच सोशल मीडिया, त्यावरील भाषा आणि प्रकटीकरण हे अलीकडच्या आधुनिक होळीचे वेगळे रूप आहे का, असा प्रश्न पडतो. अलीकडेच अवघ्या काही मिनिटांसाठी फेसबुक अचानक बंद पडले. त्यावेळी बहुसंख्य भारतीयांनी केलेली बोंबाबोंब पाहता त्याला सार्वत्रिक शिमगाच म्हणायला हवे. त्यावरून अनेक विनोद पसरले. उद्योगपती अंबानीच्या मुलाच्या लग्नाला आल्यामुळे फेसबुकच्या मालकाचे धंद्याकडे दुर्लक्ष झाले, या सार्वत्रिक झालेल्या संदेशाला आधुनिक शिमगा म्हणता येईल! पुढे ही गंमत बराच काळ सुरू होती. ‘मस्क महाशय इथे आले तरी त्यांची व्यवसायावर खरी निष्ठा आहे, कारण त्यांचे व्यवसायवृद्धी संदर्भातले मेसेज येत राहिले...’ या आशयाचा मेसेजदेखील प्रचंड व्हायरल झाला. आता हादेखील वेगळ्या अर्थी एक आर्थिक शिमगा होता काय? या उदाहरणांमधून हे स्पष्ट होते की, अलीकडच्या काळात कोणताही सण किंवा कोणताही समारंभ केवळ सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा राहिलेला नाही, कारण मुळातच आपली संस्कृती जास्तीत जास्त अर्थकारणाकडे, राजकारणाकडे वळू लागली आहे. पूर्वी समाजकारण हे अर्थकारण आणि राजकारणातून घडत असे. आता ते तसे घडत नाही.

आपल्या संस्कृतीने नेहमीच मनात असेल ते बोलून टाकण्याचा संदेश दिला आहे. नंतर बोलणाऱ्यानेही ते विसरून जावे आणि ऐकणाऱ्यानेही ते फारसे मनावर घेऊ नये, असे जुने जाणकार सांगतात. त्या अर्थाने ‘शिमग्याच्या बोंबा’ हा शब्द आपल्या भाषेत रूढ झाला असेल. आता शिमग्याच्या बोंबा आणि दारू प्यायलेला माणूस यांच्यातील साम्यही बघा. कारण शिमग्याला दारू प्यायली नाही तर देव रागावेल की काय, अशी परिस्थिती असते! मात्र या दोघांनी काहीही बोलले तरीही कोणीही गांभीर्याने घेत नाही. आज आपण देशाचे समाजकारण आणि राजकारण या पातळीवर आणून ठेवले आहे का, याचाही या निमित्ताने विचार व्हायला हवा. शिमग्याच्या निमित्ताने मन मोकळे करण्याची संधी मिळते. तेव्हाच्या समाजाने लोकांना ती जाणीवपूर्वक दिली होती का, असाही विचार मनात येऊन जातो. असे असेल तर आजच्या प्रचंड मोठ्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये याची नेमकी गरज किती, हेदेखील जाणून घ्यायला हवे. करोना महामारीनंतरचा काळ आता मागे पडला आहे. पण दरम्यानच्या धकाधकीच्या काळाने आपल्याला असे ‘व्हेंटिलेशन’च दिलेले नाही. सध्या आपण सगळेच कार्यक्रम ऑनलाईन करतो. प्रत्यक्ष भेटणे हा प्रकार कमी झाला आहे. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. मुख्य म्हणजे ते वय, स्थळ, लिंग, उत्पन्न निरपेक्ष आहे आणि मानसिक अशांतता हाच त्याचा मूलभूत पाया आहे. पूर्वी आपण दिवसभरात नातलग, घरातील सदस्य, कार्यालयीन सहयोगी, व्यावसायिक, सामाजिक आदी भावबंधांशी संबंधित होतो. अलीकडच्या ऑनलाईनच्या जमान्यात मात्र हे ‘आऊटलेट्स’ राहिलेले नाहीत. सहाजिकच मानसिक दबावाने, हृदयविकाराच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. भावना व्यक्त करण्यासाठी फार कमी हक्काची स्थाने आता उरली आहेत. म्हणूनच व्हेंटिलेशनचे काम करणाऱ्या होळीसारख्या उत्सवांचे महत्त्व नव्याने जाणून घेण्याची गरज आहे. या अर्थाने सामाजिक होळी साजरी केली तर बरेच प्रश्न सुटतील याची खात्री वाटते.

डॉ. चंद्रशेखर टिळक, (लेखक ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)