भाजपच्या काही निर्णयांमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम

गोवा

Story: अंतरंग |
27th March, 11:58 pm
भाजपच्या काही निर्णयांमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम

यावेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार करून भाजपचे स्थानिक नेते मैदानात उतरले आहेत. उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यात उद्योजक पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला आणि बुधवारपासून प्रचारासही सुरुवात केली. पण, उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्याविरोधात तयार होत असलेले वातावरण आणि दक्षिण गोव्यात दिग्गजांना डावलून महिलेला उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय याचे परिणाम भाजपवर होण्याची शक्यता असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत यावेळी सत्ताधारी भाजप, विरोधी काँग्रेस आणि गत विधानसभा निवडणूक काळात उदयास येऊन एक आमदार निवडून आणलेला रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) असे तीन पक्ष उतरले आहेत. यातील भाजप आणि आरजीपी या दोन पक्षांनी दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार घोषित करून प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेसने मात्र अद्याप दोन्हीही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. बुधवारी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता होती. हे ‘अंतरंग’ प्रसिद्ध होईपर्यंत ते जाहीरही होऊ शकतात. यावेळी दोन्हीही मतदारसंघांत तिरंगी लढत होत असल्याने बऱ्याच वर्षांनंतर दोन्ही ठिकाणची निवडणूक रंगतदार होणार आहे. पण, निवडणुकीपूर्वीच भाजपच्या दोन्ही उमेदवारांबाबत मतदारांकडून उलटसुलट चर्चा झडू लागल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांत मात्र संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

भाजपने उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. परंतु, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच भाजपमधून अनेकांनी या उमेदवारीवर दावा केला होता. याची सुरुवात माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी केली होती. यावेळी उत्तर गोव्यातून लढण्यास आपण इच्छुक असल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते. त्यानंतर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्यात रस दाखवला. या दोघांनंतर माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तर थेट श्रीपाद नाईक यांच्यावरच निशाणा साधला. श्रीपाद नाईक यांनी आता विश्रांती घ्यावी असा सल्ला देत, उत्तर गोव्यातून पक्षाने आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावरून वातावरण ढवळल्याने प्रदेश भाजपने श्रीपाद नाईक यांच्यासह परुळेकर, मांद्रेकर आणि सोपटे या सर्वच भंडारी समाजाच्या नेत्यांची नावे संसदीय समितीकडे पाठवली होती. त्यातून संसदीय समितीने श्रीपाद नाईक यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. या सर्व घडामोडींनंतरही यावेळी श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यातून एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आणण्याचा चंग प्रदेश भाजपच्या नेत्यांनी बांधलेला असतानाच, अनेकांकडून सोशल मीडियाद्वारे श्रीपाद नाईक यांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या तीस वर्षांत श्रीपाद नाईक यांनी गोव्याचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत. त्यांनी खासदारकीला न्याय दिला नाही, अशा प्रतिक्रिया त्यांच्याविरोधात उमटत आहेत.

दुसऱ्या बाजूला दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी भाजपने माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी आमदार दामू नाईक यांची नावे पहिल्या टप्प्यात पाठवली​ होती. त्यानंतर केंद्रीय नेत्यांच्या निर्देशानुसार सुलक्षणा सावंत, सुवर्णा तेंडुलकर, विद्या गावडे या इच्छुक आणि भाजपसाठी सक्रियपणे काम करीत असलेल्या महिलांची नावे पाठवली होती. पण, संसदीय समितीने या सर्वांना वगळून उद्योजक पल्लवी धेंपो यांच्या नावावर मोहोर उठवली. त्यामुळे भाजप केडर आणि सक्रिय महिला कार्यकर्त्यांतही कमालीची नाराजी पसरलेली आहे.

उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघांतील काही भाजप कार्यकर्त्यांतच पक्षाच्या काही धोरणांमुळे निराशा आहे. त्याचा परिणाम मतदारांवर होऊ नये, यासाठीचे प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केले आहेत. त्यात त्यांना किती यश मिळणार, हे ४ जून रोजी निकालानंतरच दिसून येणार आहे.


सिद्धार्थ कांबळे