कायद्याला धरुन न्याय न दिल्यास न्यायालयात जाणार : पाटकर

आमदार अपात्रता; अंतिम बाजू सभापतींनी घेतली जाणून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th March, 11:36 pm
कायद्याला धरुन न्याय न दिल्यास न्यायालयात जाणार : पाटकर

पणजी : आमदार अपात्रता प्रकरणी सभापती रमेश तवडकर यांनी कायद्याला धरून न्याय न दिल्यास काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरोधात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सभापतींनी पाटकर यांची अंतिम बाजू ऐकून घेतली. कामत आणि लोबो या दोघांना बुधवारी पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे सभापती या प्रकरणावर पुढील काहीच दिवसांत अंतिम निवाडा देऊ शकतात.

आपली बाजू सभापतींसमोर मांडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर म्हणाले, आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सभापतींनी कायद्याला धरूनच निवाडा देणे गरजेचे आहे. फुटीर आमदारांनी राज्यातील मतदारांचा विश्वासघात केलेला आहे. त्याची शिक्षा त्यांना मिळणे गरजेचे आहे. सभापतींनी अंतिम निवाडा देताना पक्षपातीपणा केल्यास काँग्रेस अजिबात गप्प बसणार नाही. आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन भाजपात गेलेल्या फुटीर आमदारांना आपण अजिबात सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, आमदार अपात्रता याचिका प्रकरणांत सभापतींनी तीन महिन्यांत निर्णय देणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कामत आणि लोबो यांच्याविरोधात १० जुलै रोजी सभापतींसमोर याचिका दाखल केली. त्यानंतर कामत, लोबो यांच्यासह आठ आमदारांनी १४ सप्टेंबरला भाजपात प्रवेश केला. पण, अजून या याचिकेवर सभापतींनी निर्णय दिलेला नाही, असे पाटकर यांचे वकील अभिजीत गोसावी यांनी सांगितले. 

हेही वाचा