वाढत्या तापमानामुळे बळावतोय ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका... स्त्रियांपेक्षा पुरुषांना धोका जास्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 11:54 am
वाढत्या तापमानामुळे बळावतोय ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका... स्त्रियांपेक्षा पुरुषांना धोका जास्त

पणजी : जागतिक तापमानवाढीमुळे ऋतुचक्रात बिघाड झाल्याने नैसर्गिक आपत्तींची मालिका जगभर सुरू आहे. आता याच तापमानवाढीचा माणसाच्या आरोग्यावरही भयंकर परिणाम होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. एका नवीन संशोधनानुसार, २०१९ मध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे झालेल्या ५ लाख २१ हजार ३१ जणांच्या मृत्यूला प्रतिकूल तापमान कारणीभूत ठरले आहे. मेंदू आणि मज्जारज्जूंवर परिणाम होऊन अपंगत्वही वाढले आहे.

वरील अभ्यास १९९० ते २०१९ पर्यंतच्या संकलित डेटावर आधारित आहे. यामध्ये २०० हून अधिक देशांमधील आरोग्य आणि तापमानाशी संबंधित डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. ‘जर्नल न्यूरोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालाच्या अभ्यासकांनी अनेक गंभीर गोष्टी जगासमोर आणल्या आहेत. हा अहवाल हवामान बदल आणि ब्रेन स्ट्रोक यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकतो. परंतु हवामान बदलामुळे स्ट्रोक होतोच, हे पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी अद्याप अधिक संशोधन आवश्यक असल्याचेही नूमद केले आहे. त्यानुसार पुढील संशोधन सुरू आहे.

तापमानातील चढउतारांमुळे ९१ टक्के मृत्यू

ब्रेन स्ट्रोकमुळे झालेल्या ५ लाखांहून अधिक मृत्यूंपैकी सुमारे ९१ टक्के मृत्यू  तापमानातील कमालीच्या चढ-उतारामुळे झाले आहेत. स्ट्रोकमुळे यापैकी ४,७४,००० मृत्यूंसाठी सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान जबाबदार होते. यासोबतच अवेळी उष्णता, थंडी, पाऊस अशी कारणेही याला कारणीभूत ठरली. याशिवाय वाढत्या तापमानाचा परिणामही झपाट्याने होत आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वृद्धांना स्ट्रोकचा धोका वाढतो

वाढत्या तापमानामुळे वृद्धांसाठी पक्षाघाताचा धोका वाढला आहे. विशेषत: अशा प्रदेशात जेथे आरोग्य सेवा नीट नाहीत, तेथे हे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मध्य आशियातील वाढत्या तापमानामुळे स्ट्रोकच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.

स्त्रियांपेक्षा पुरुषांना स्ट्रोकचा धोका जास्त

तापमानातील बदलांमुळे, स्ट्रोकचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो. जेथे तापमानातील चढउतारांमुळे पुरुषांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रति दशलक्ष ७.७ होते. तर महिलांमध्ये ही संख्या ५.८९ इतकी नोंदवली गेली. मध्य आणि दक्षिण आशियामध्ये असे आढळून आले आहे की जेथे पुरुष गरम, कडक सूर्यप्रकाश आणि दमट वातावरणात स्त्रियांपेक्षा जास्त काम करतात, तेथे पुरुषांना पक्षाघाताचा धोका जास्त होता.

इस्केमिक स्ट्रोक ५० लाख मृत्यूचे कारण बनू शकते

जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, १९९० च्या दशकात इस्केमिक स्ट्रोकमुळे जगभरात २ दशलक्ष लोक मरण पावले. २०१९ मध्ये मृतांचा हा आकडा ३० लाखांवर पोहोचला आहे. २०३० पर्यंत इस्केमिक स्ट्रोकमुळे ५० लाखांहून अधिक मृत्यू होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. वाढत्या जागतिक तापमानालाही कारणीभूत आहे.

हेही वाचा