विकासाचा काळा चेहरा

आगी लावण्याचे प्रकार शेजारची जमीन विकत घेतलेल्यांपैकीच करत नसावेत, असे म्हणता येणार नाही. पेडणे तालुक्यात जमीन विक्रीच्या व्यवसायातील हेही एक सत्य आहे. काजू बागायतींना मुद्दाम आगी लावायच्या आणि नंतर त्या मध्यस्थांमार्फत विकत घ्यायच्या, हा नवा प्रकार समोर येत आहे. पेडणे तालुक्याच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाचा हा एक काळा चेहरा आहे.

Story: संपादकीय |
26th March, 10:28 pm
विकासाचा काळा चेहरा

गोव्यातील ग्रामीण भागाने व्यापलेल्या तालुक्यांतच नव्हे तर तिसवाडी, बार्देशसारख्या शहरीकरणाच्या वेढ्यात बदलत चाललेल्या तालुक्यांमध्येही काजू बागायतींवर हजारो कुटुंबांचा चरितार्थ चालतो. उपजीविकेचे साधन झालेल्या या बागायतींनी गोव्याच्या ग्रामीण भागाचे अर्थकारण अनेक वर्षांपासून पोसले आहे. अंगणात माड, घरामागच्या परसात पोफळी, काजूची चार झाडे असे चित्र नाही असे गोव्यात गाव नसेल. काजूच्या झाडांची लागवड हेच ग्रामीण भागात कितीतरी कुटुंबांचे पोटापाण्याचे साधन झालेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पेडणेसारख्या तालुक्यात काजू बागायतींना आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. गोव्यात सगळीकडे बागायती आहेत, पण अशा प्रकारच्या आगीच्या घटना पेडणे तालुक्यातच सर्वाधिक घडलेल्या आहेत. या घटनांमागे जमीन विक्रीतले लोक गुंतलेले आहेत, अशी पेडणेत चर्चा असते. या घटनांची चौकशी करणे किंवा आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या जमिनींचे पुढे काय झाले, त्या विकल्या गेल्या की अजून पडीक आहेत, अशा गोष्टींची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल. पेडणे तालुक्यातील मोरजी, आगरवाडा, मांद्रे, धारगळ, कडशी - मोपा, तोरसे, उगवे या भागात गेल्या काही वर्षांत काजू बागायतींना आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. आग मुद्दाम लावली जाते का, त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. या आगीच्या घटनांमागे पेडणेत जे जमीन व्यवहार होत आहेत ते मुख्य कारण आहे, असे स्थानिकांना वाटते. माळरानांसह डोंगरावर आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. अग्निशमन दलाकडे अशा घटनांची मोठी यादीच आहे. गोव्यात काजू बागायतींना आग लागण्याचे प्रकार सर्वांत जास्त कुठे घडले असतील, तर ते पेडणे तालुक्यात असायला हवेत. जमीन विक्रीमध्ये गुंतलेल्यांना कोणाची भीती राहिलेली नाही. त्यामुळेच कदाचित मोठ्या प्रमाणात काजू बागायती नष्ट करण्याचे प्रकार खुलेआम होत असावेत. 

पेडणे तालुक्यात जमिनींचे दर आज प्रती चौरस मीटर लाखांच्या घरात पोहचले आहेत. गोव्याबाहेरील अनेक व्यावसायिक, जमीन व्यवहारातल्या कंपन्या, मध्यस्थ जमिनी विकत घेऊन ठेवत आहेत. यापुढेही तिथल्या जमनींचे दर वाढतील, अशी खात्री जमीन व्यवहारातील लोकांना आहे. त्यामुळेच मिळेल त्या जमिनी कितीही पैसे मोजून विकत घेण्याची काहींची तयारी असते. पेडणेत तेच सुरू आहे. पेडणे तालुक्यातील आमदारांचे एक कायम दुखणे असते, ते म्हणजे पेडणे तालुका दुर्गम, दुर्लक्षित ठेवल्याचा. पण प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. आज बार्देश आणि पेडणेतील जमिनींचे दर हे तिसवाडी, सासष्टी किंवा अन्य कुठल्याही तालुक्यातील जमिनींपेक्षा जास्त आहेत. पेडणेतील जमिनींचे दर आज गगनाला भिडले त्याचे कारणही तसेच आहे. 

गोव्याबाहेरील बांधकाम व्यावसायिकांनी, हॉटेल कंपन्यांनी, जमीन विक्रीत असलेल्या मध्यस्थांनी मोपा विमानतळाची चाहूल लागली तेव्हापासून पेडणेच्या परिसरात जमिनी खरेदी करून ठेवायला सुरुवात केली. कॅसिनो कंपन्याही मागे नाहीत. कॅसिनो आणि बांधकाम कंपन्यांनी काही वर्षांपासून पेडणेत मिळेल तिथे जमीन खरेदी करून ठेवली आहे. ज्या जागेत काजू बागायती होत्या त्यांना आता आगी लावल्या जातात असा संशय जर स्थानिकांना आहे, तर त्यातही तथ्य असू शकेल. कारण आगी लावून बागायती नष्ट करून त्या जमिनी नंतर मोठमोठ्या कंपन्यांना विकल्याची अनेक उदाहरणे पेडणे तालुक्यात आहेत. शेजारील जमीन ताब्यात आहे, पण काजू बागायतीची जमीन हवी असेल तर ती बागायत आग लावून नष्ट करायची आणि नंतर मूळ मालकाकडे वाटाघाटी करायच्या आणि चांगल्या दराने ती जमीन विकत घ्यायची, असे प्रकार पेडणे तालुक्यात सुरू आहेत. जी जमीन सहज हाती लागत नाही ती साम, दाम वापरून बळकावण्यासाठी गुंड, बाऊन्सरचा वापर केला जातो. पेडणे आणि बार्देश या दोन्ही तालुक्यांमध्ये हीच स्थिती आहे. पेडणे तालुक्यात काजू बागायतींना आग लावण्याचे प्रकार आता रोजचेच. त्यामागचा हेतू एकच असतो तो म्हणजे, ती जमीन कशाही पद्धतीने विक्रीस काढायची. आगी लावण्याचे प्रकार शेजारची जमीन विकत घेतलेल्यांपैकीच करत नसावेत, असे म्हणता येणार नाही. पेडणे तालुक्यात जमीन विक्रीच्या व्यवसायातील हेही एक सत्य आहे. काजू बागायतींना मुद्दाम आगी लावायच्या आणि नंतर त्या मध्यस्थांमार्फत विकत घ्यायच्या, हा नवा प्रकार समोर येत आहे. पेडणे तालुक्याच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाचा हा एक काळा चेहरा आहे.