स्वकियांना डावलल्यामुळे ‘सपा’त नाराजीनाट्य

Story: राज्यरंग |
26th March, 12:31 am
स्वकियांना डावलल्यामुळे ‘सपा’त नाराजीनाट्य

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी राजकीय पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. अनेक पक्ष काँग्रेस किंवा भाजप यांच्या आघाडीत सहभागी झालेले दिसतात. मात्र, जागा वाटपावेळी हे मतभेद दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे पक्षाबाहेरून उमेदवारांची आयात झाल्याने पक्षातील जुने नेते नाराज बनले आहेत. इतर पक्षांबरोबरच याचा फटका उत्तर प्रदेशमध्ये सपाला बसला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, बिजनौरमधून यशवीर सिंग, नगीनामधून मनोज कुमार, मेरठमधून भानू प्रताप सिंग, अलिगढमधून बिजेंद्र सिंग, हाथरसमधून जसवीर वाल्मिकी आणि लालगंजमधून दरोगा सरोज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय समाजवादी पक्षाने भदोही लोकसभेची जागा तृणमूल काँग्रेसला दिली आहे. तृणमूल काँग्रेसकडून या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार ललीतेशपती त्रिपाठी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्षाने जाहीर केलेल्या सहा उमेदवारांच्या यादीत दोन जागा समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांना दिल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत जुन्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. पक्षातील नेत्यांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना संधी दिल्याने समाजवादी पक्षात अंतर्गत असंतोष वाढण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम उमेदवाराच्या मताधिक्क्यावर नक्कीच होणार आहे.

नवीन यादीनुसार समाजवादी पक्षाने मेरठमधून भानू प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली. याशिवाय नगीना येथून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश मनोज कुमार यांना उमेदवारी दिली. मनोज कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. भदोही मतदारसंघाची जागा तृणमूल काँग्रेसला दिली आहे. तृणमूल काँग्रेसकडून या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार ललीतेशपती त्रिपाठी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ललीतेशपती त्रिपाठी हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे नातू आहेत.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मेरठमधून भाजपचे उमेदवार राजेंद्र अग्रवाल यांचा विजय झाला होता. त्यांनी बसपाच्या हाजी याकूब कुरेशी यांचा पराभव केला होता. या जागेसाठी समाजवादी पक्षाचे आमदार अतुल प्रधान यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाकडून भानू प्रताप सिंग यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या या निर्णयानंतर अतुल प्रधान यांनी नाराजीही व्यक्त केली. 

सपाने नगीनामधून मनोज कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. नगीनाच्या जागेसाठी आमदार मनोज कुमार पारस यांनी त्यांच्या पत्नी नीलम पारस यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्ष आणि बसपाच्या युतीचे उमेदवार गिरीश चंद्र यांनी लढवली होती. या निवडणुकीत चंद्र यांनी भाजपच्या यशवंत सिंह यांचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. याशिवाय समाजवादी पक्ष आणि अपना दल (कामेरवाडी) यांच्यातही जागावाटपावरून मतभेद असल्याचे पुढे आहे. २०२२ पासून या दोन्ही पक्षांची युती आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

- प्रसन्ना कोचरेकर,  गोवन वार्ता