सहा वर्षांनंतर दोघे संशयित खुनाच्या आरोपातून मुक्त

कळंगुट येथे दारुच्या नशेत केला होता खून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th March, 11:49 pm
सहा वर्षांनंतर दोघे संशयित खुनाच्या आरोपातून मुक्त

पणजी : कळंगुट येथे दारूच्या नशेत सांतानो डिकॉस्टा (साळगाव) याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित जॉन फर्नांडिस आणि संतोष वायधोंडे यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवून उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा वर्षांनंतर त्या दोघांना खुनाच्या आरोपातून मुक्त केले आहे. याबाबतचा निवाडा म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्या. बाॅस्को राॅबर्ट्स यांनी दिला आहे.

कळंगुट पोलिसांनी १३ ऑक्टोबर २०१८ रोजी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, नायकावाडा कळंगुट येथील राखी बार आणि रेस्टॉरंटजवळ सांतानो डिकाॅस्टा बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर जखम होती. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना १६ ऑक्टोबर २०१८ रोजी सांतानो डिकॉस्टा याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळंगुट पोलीस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक जिवबा दळवी यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी डिकाॅस्टा याचे मित्र जॉन फर्नांडिस आणि संतोष वायधोंडे यांची चौकशी करून अटक केली होती. त्यानुसार, घटनेच्या दिवशी संशयितांनी दारूच्या नशेत सांतानो याचे डोके रेस्टॉरंटच्या भिंतीवर व जमिनीवर जोराने आपटले. यात सांतानो गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याचे पाहून त्या दोघांनी तेथून पळ काढल्याची माहिती दिली. पोलिसांनी संशयितांनी त्या दिवशी घातलेले कपडे जप्त केले होते. याच दरम्यान वरील दोघा संशयितांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून दोघा संशयितांविरोधात २१ डिसेंबर २०१८ रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. नंतर हे प्रकरण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यानंतर ११ जुलै २०१९ रोजी त्या दोघांना सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.

या प्रकरणी संशयितांतर्फे अॅड. देवेंद्र भारद्वाज, कमलाकांत पोवळेकर आणि जगदीश तोरसकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.

घटनेवेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, तसेच सीसीटीव्ही चित्रफितीत संशयित स्पष्ट दिसत नसल्याचे सरकारी वकिलाने मान्य केले आहे. याशिवाय संशयिताविरोधात सबळ पुरावे नसल्याचा युक्तिवाद मांडला. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाज एेकून घेतल्यानंतर पुराव्याअभावी दोन्ही संशयितांना आरोपातून मुक्त केले.