‘आरजीपी’मुळे यावेळच्या लढती रंगतदार !

स्वतःचे आमदार आणि सरकारमध्ये सहभागी असलेले मगो, अपक्ष यांचे संख्याबळ धरून भाजपकडे दक्षिणेत १६ आमदार आहेत. काँग्रेसच्या बाजूने चार आमदार आहेत. गोवा फॉरवर्डने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एकूणच काँग्रेसजवळ फक्त चार आमदार आहेत. असे असतानाही भाजपने आपल्या ज्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली होती, त्यात का बदल केला हा मोठा प्रश्न आहे.

Story: उतारा |
23rd March, 11:52 pm
‘आरजीपी’मुळे यावेळच्या लढती रंगतदार !


गोव्यात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर करण्यासही विलंब केला. कारण आता कधीही उमेदवार जाहीर केला तरीही प्रचारासाठी ४० दिवस मिळतात. त्यामुळेच दोन्ही पक्षांत गेले काही दिवस उमेदवारांच्या नावावरूनच खलबते सुरू आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवाराला प्रत्येक मतदारसंघात फिरण्यासाठी सुमारे ४० दिवस मिळतात. प्रचारासाठी इतके दिवस पुरेसे आहेत.

काँग्रेस पक्ष प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर उमेदवार ठरवण्याच्या कामात उशीर झाल्याचे कारण देत पुढच्या वेळी लवकर उमेदवार जाहीर केले जातील असे सांगत असतो. त्यासाठी नावे मागवणे, छाननी समितीकडून ती नावे निश्चित करून दिल्लीत पाठवणे ही कामेही लवकर केली गेली. जानेवारीदरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी चांगल्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आणि त्यानंतर नावेही ठरली. पण दोन्ही मतदारसंघांसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण ते अद्यापही स्पष्ट होत नाही. काँग्रेसने लोकसभेच्या तयारीने तसा प्रचारही अद्याप केलेला नाही. भाजपने मात्र सगळे मतदारसंघ पिंजून काढले आहेत. त्याच धामधुमीत गेल्या दहा-पंधरा दिवसांत सरकारच्या कामाची माहिती देणारे वेगवेगळे उपक्रम राबवले. प्रचाराचे मुख्य काम भाजपने जवळपास पूर्ण केले आहे. शिवाय उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांची उमेदवारी जाहीर केली. दक्षिण गोव्याचा उमेदवार जाहीर होणार आहे. कदाचित हा लेख छापून येईपर्यंत दक्षिण गोव्याचाही उमेदवार ठरेल. दक्षिण गोव्यात जिंकण्याबाबत वातावरण नसल्याचा सर्वे पुढे आल्यानंतर भाजपने पुरुष उमेदवाराच्या बदल्यात महिला उमेदवाराचा शोध सुरू केला. भाजपने महिला उमेदवाराचा शोध सुरू करून काँग्रेसची गोची केली. कारण भाजप कोणाला उमेदवारी देणार ते पाहूनच फासे टाकायचे, असे काँग्रेसने ठरवले होते. यात नुकसान काँग्रेसचेच होऊ शकते, कारण काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केलेली नाही. जो उमेदवार जाहीर होईल त्याला घेऊन पुढील चाळीस दिवस काँग्रेसला लोकांसमोर जावे लागेल.

भाजपला दक्षिण गोव्यात पुरुष उमेदवार जिंकण्याची शक्यता कमी दिसल्यानंतर काँग्रेसला दक्षिण गोव्यात पुन्हा संधी आहे असे संकेत तर मिळाले. पण त्या संकेतांचे संधीमध्ये रुपांतर करून तिथे काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काँग्रेसकडे आज मनुष्यबळ आहे का, हा प्रश्न आहे. दक्षिणेत काँग्रेसकडे फक्त दोन आमदार आहेत. ‘इंडिया’चा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाचे दोन आमदार आहेत. या चार आमदारांच्या बळावर काँग्रेसला दक्षिणेतील उमेदवारासाठी काम करावे लागेल. त्यातही काँग्रेसने बाजी मारली तर मात्र भाजपच्या संपूर्ण यंत्रणेचा बोजवारा उडणार आहे. स्वतःचे आमदार आणि सरकारमध्ये सहभागी असलेले मगो, अपक्ष यांचे संख्याबळ धरून भाजपकडे दक्षिणेत १६ आमदार आहेत. काँग्रेसच्या बाजूने चार आमदार आहेत. गोवा फॉरवर्डने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एकूणच काँग्रेसजवळ फक्त चार आमदार आहेत. असे असतानाही भाजपने आपल्या ज्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली होती, त्यात का बदल केला हा मोठा प्रश्न आहे. पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे की, दिल्लीतील वरिष्ठांनी महिला उमेदवार देण्याच्या सूचना गोवा भाजपला केल्या. यामागे दोनवेळा केलेला सर्वेही तेवढाच कारणीभूत आहे. त्या सर्वेमुळेच कदाचित बदल करावा लागलेला असू शकतो. त्यामुळे जर जोखीम घ्यायची असेल तर महिला उमेदवार देऊन जोखीम घेणे अधिक फायद्याचे ठरू शकते असे भाजपला वाटले. त्यानंतरच भाजपने आपल्या प्रचाराचा रोख काही दिवस बदलला. कमळावर मतदान करण्यासाठी प्रचार सुरू केला. उमेदवार कोणीही असो भाजपसाठी मतदारांनी व्यक्ती नव्हे तर कमळ या चिन्हावर मतदान करावे, असा प्रचार सुरू केला. भाजपकडे बूथ स्तरावर असलेली कार्यकर्त्यांची मोठी फळी, भाजपशी संलग्न असलेल्या इतर संस्थांचे कार्य आणि भाजपसोबत असलेल्या सोळा आमदारांचे संख्याबळ यावरून भाजपला आपला उमेदवार जिंकेल अशी आता खात्री झाली आहे. पण उमेदवार कोण त्यावर पुढचे गणित अवलंबून आहे. कारण काँग्रेसने तगडा उमेदवार दिला तर भाजप कात्रीत सापडू शकतो. शेवटी मुख्यमंत्र्यांपासून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच गेल्या काही दिवसांत गोवा पिंजून काढला आहे त्याचा प्रभावही निवडणुकीवर राहणार आहे. काँग्रेसने आधीच उमेदवार जाहीर करून प्रचार जोरात सुरू केला असता तर दक्षिण गोव्यातील निवडणुकीत अजून रंगत आली असती. मतदानाला अजून पंचेचाळीस दिवस शिल्लक आहेत. इतक्या काळात राजकारणात अनेक आश्चर्ये पहायला मिळू शकतात. पुढील काही दिवसांमध्ये भाजपमधून गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बाहेर पडलेल्या काही नेत्यांचा पक्ष प्रवेशही होणार आहे. काँग्रेस दक्षिणेतील आव्हान कसे पेलते ते पहावे लागेल. उमेदवार बदलाच्या निर्णयामुळे काँग्रेसची धास्ती भाजपने घेतली आहे हेही स्पष्ट दिसते.

उत्तर गोव्यात भाजपने श्रीपाद नाईक यांना उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर केली. भाजपमधूनच नाईक यांना विरोध झाला होता. आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी अन्य तीन नेत्यांनी केली होती. कोणी पाचवा व्यक्ती दावेदार होऊ नये यासाठी ही खेळी होती की खरोखरच अन्य तिघेजणही उमेदवारीसाठी इच्छूक होते हे कळण्यास मार्ग नाही. जर खरोखरच हे दावेदार होते तर नाईक यांच्या नावाला भाजपच्याच नेत्यांचा विरोध होता हे स्पष्टच आहे. नव्या व्यक्तीला संधी द्यावी असे काहीजणांनी बोलूनही दाखवले होते. आता श्रीपाद नाईक यांना विरोध करणारी पत्रकेही सोशल मीडियावर फिरत आहेत. श्रीपाद नाईक यांचे भाजपसाठी असलेले योगदान, स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून असलेली ओळख ही त्यांना किती फायद्याची ठरते ते निकालातून दिसेल. ‘आरजीपी’ने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले. उत्तर गोव्यात मनोज परब स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत यंदा तिरंगी लढत होईल. वीस पंचवीस वर्षांपूर्वी मगो, काँग्रेस, भाजप, युगोडेपा अशा पक्षांमध्ये लोकसभेच्या निवडणुका रंगत होत्या. गेल्या वीसेक वर्षांत काँग्रेस विरुद्ध भाजप अशाच लढती झाल्या. यंदा प्रथमच आरजीपी हा प्रादेशिक पक्ष निवडणुकीत आहे. तो किती प्रभाव पाडतो तेही पहावे लागेल. २०१९ मध्ये श्रीपाद नाईक विरूद्ध गिरीश चोडणकर अशी लढत झाली होती त्यावेळी श्रीपाद नाईक यांना २,४४,८४४ तर काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांना १,६४,५९७ मते मिळाली होती. सुमारे ८० हजार मतांचा हा फरक होता. यावेळी ‘आरजीपी’चे आव्हान आहे. उत्तर गोव्यातील निवडणूक भाजपला तेवढी सोपी जाणार नाही असे दिसत आहे. २०१९ मध्ये दक्षिण गोव्यात भाजपचा सुमारे ९,७०० मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेससोबत काही आमदारही होते. यावेळी स्थिती थोडी वेगळी आहे. त्यातच ‘आरजीपी’चा उमेदवार आहे. त्यामुळेच गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील लढती यावेळी फार रंगतदार होतील. जिंकणारा उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने जिंकणार नाही हे नक्की आहे.


पांडुरंग गांवकर, दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.