नवा प्रवास : भूतान

भूतान, थंडर ड्रॅगनची भूमी. हिमालयाच्या कुशीत वसलेला एक छोटासा देश. भूतान त्याच्या अजूनही पाळल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पद्धती, नयनरम्य लँडस्केप्स आणि ग्रॉस नॅशनल हॅपीनेसवर आपलं लक्ष केंद्रीत करणारा एकमेव देश म्हणून जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला, आणि त्याच्या पारंपरिक जीवनशैलीला जवळून पाहण्याची इच्छा फार पूर्वीपासूनच होती.

Story: प्रवास |
23rd March, 11:49 pm
नवा प्रवास : भूतान

हल्लीच मला भूतानचं हे एक अतिशय अनोखं राज्य प्रत्यक्ष पाहायला मिळालं. अलीकडेच मी माझ्या कुटुंबासह आणि काही मित्रमंडळींसह भूतानला भेट दिली. इथे जायचं जरी ठरलं असलं तरी आम्हाला फ्लाईट्स मिळता मिळेनात. एकही विमान कसं नाही दिसत, असा प्रश्न पडला असता मी थोडा इंटरनेटवर रिसर्च केला. तर कळलं की विश्वासघातकी पर्वतांमुळे विमानांना या देशात प्रवेश करणं कठीण होतं. आणि इथे सेफ लँडिंग करणं इतकं कठीण की बऱ्याच वैमानिकांना इथे यायची परवानगी मिळत नाही. फक्त सोळा (हे खरं आहे बरं का! संपूर्ण जगात, फक्त सोळा) वैमानिकांना भूतानमध्ये आणि बाहेर उड्डाण करण्याची परवानगी आहे. हे वाचून बागडोग्राहून रस्त्याने जाणं हा अधिक सुरक्षित पर्याय वाटला. पारो इथे विमानतळ असूनही, भूतानमध्ये प्रवेश आम्ही बागडोग्राच्या भारतीय सीमेवर जाऊन पायीच केला. 

भूतानमध्ये जायचं म्हणजे तिथला गाईड घेतलाच पाहिजे असा नियम आहे. त्याशिवाय परमिट मिळत नाही. हा कायदा कोविडनंतरचा. आम्ही बराच अभ्यास करून ‘डिवाईन भूतान’ ह्या संस्थेला निवडलं. त्यांचा वाटाड्या ‘ताशी’ आम्हाला न्यायला बागडोग्राच्या आमच्या हॉटेलपर्यंत आला. भूतान मधली सगळी बुकिंग त्याच्या एजन्सीनेच केली असल्याने आम्हाला कुठेच कसलीच अडचण नाही आली. 

भूतान मधला पहिला स्टॉप फुएन्शोलिंग. म्हणजे पायी सीमा पार करून भूतानमध्ये पाऊल ठेवलं ते ह्या गावात. इथे आम्ही आमची परमिटं बनवली आणि आम्ही पासपोर्टवर शिक्के मिळवले. इथे जास्ती वेळ न घालवता आम्ही गाडीत बसलो आणि थिम्पूकडे स्वारी वळवली. वाटेत जिथे जिथे थांबून ह्या डोंगर दऱ्यांचा आनंद लुटावासा वाटे तिथे तिथे आम्ही गाडी थांबवत होतो. हवेतला फरक जाणवत होता. इतकी स्वच्छ निर्मळ हवा. आमच्या फुफ्फुसांनी देखील काही दिवसांसाठी सुटकेचा निःश्वास टाकला. 

अद्वैतची ही तिसरी ट्रीप. तो प्रत्येक ठिकाणी खूप उत्साहाने सहभागी होत होता. प्रत्येक क्षणाचा पूर्ण आस्वाद घेत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमच्या आनंदात अधिक भर पडत होती हे नक्की. भूतानमध्ये किंवा एकूण ह्या प्रांतात म्हणजे लडाख तिबेट इत्यादी. इथे ‘प्रेयर फ्लॅग्स’ ठिकठिकाणी लावलेले दिसतात. म्हणजे पताका जिच्यावर प्रार्थना लिहिलेली असते. एखादं स्थान पवित्र करावं म्हणून की काय पण ह्या प्रार्थना ठिकठिकाणी लावलेल्या आढळतात. वाऱ्यावर ती पताका फडकताना निसर्गाचा अध्यात्माशी एक दुवा बांधला जातोय ह्याची प्रचिती येते. 

फुएन्शोलिंगहून जवळपास तीन तासांच्या ड्राईव्हनंतर, आम्ही शेवटी भूतानची राजधानी असलेल्या थिम्पूमध्ये पोहोचलो. आम्ही पोहोचताच, तिथल्या स्थानिकांनी आमचं आनंदाने स्वागत केलं, जिथे तिथे आमचं आम्ही भारतीय असल्याने खास स्वागत होत होतं. अगदी आपुलकी वाटावी असे हे लोक आमच्याशी वागत होते. थिम्पूमध्ये आम्ही फक्त एकच दिवस राहिलो. आणि बुद्ध डोरदेन्मा नावाच्या बुद्धाच्या विशाल पुतळ्याला भेट दिली.


भक्ती सरदेसाई