शिगम्याचा उत्सव आला रे...

पेडणेपासून काणकाेणपर्यंत शिगमाेत्सवात खेळल्या जाणाऱ्या खेळातून, लाेकनृत्यामधून, विधी-परंपरेतून या उत्सवावर पुरुषांचे असलेले प्राधान्य दिसून येते. आदिवासी, बहुजनसमाजानेच शिगमाेत्सवासारख्या लाेकोत्सवाची परंपरा जतन करुन ठेवलेली आहे.

Story: शिगमोत्सव विशेष |
23rd March, 11:47 pm
शिगम्याचा उत्सव आला रे...

अंडीत पंडीत बसले हार गावच्या देवा

नमस्कार नमनी गा द्यावा एक चंद्रसूर्या

चंद्रसूर्या नमन आकार धरतरी आकारी

गुरुदेव पितृमय म्हाली असाे माघ म्हायनो

आले रे शिगमा पावलाे हाेळीयेशी खाम

घातला देवानी हाेळीशी हाय कशावर देवानी हाेळीशी

शेकावर देवानाे शकसाे हाय कशावर

देवानो शकसाे हाय विटेवर देवानी

इटा रे इटा अंतराळी खेळे - खेळताे गडाे माजो चाेईकडे

धाेलार बडी पडली की धरित्रीच्या गात्रागात्रात जणूकाही वीज संचारते आणि सारा निसर्गच शिगमाेत्सवाच्या नादात एकरुप हाेऊन अपूर्व आनंदात लाेकमानस न्हाऊन उठते. जती, सकारतीचा ढाेल ताशांवरील नाद आसमंतात निनादताे. येणारा ग्रीष्म आनंददायी, उल्हासित व्हावा या हेतूने ‘सुगीम्हा’ ची परंपरा कधीकाळी या भूतलावर निर्माण झाली. सत् आणि असत् प्रवृत्तीने मानवी जीवनाची वीण विणलेली आहे. सत् प्रवृत्तीच्या माणसांना छळणारी अपप्रवृत्ती ठायीठायी दिसते. शिष्ट समाजात शिवीगाळ करणे, असभ्य बाेलणे हे वर्ज्य मानले गेले आहे. ते संकेताला धरुन नसते. गाेमंतकाचा प्राचीन इतिहास अनुभवता पाषाण शिल्पात मृंदग, झांज, तुतारी यासारखी वाद्ये, खांद्यावर कलश घेऊन मिरवणूकीत सहभागी झालेले लाेकमानस, मिरणुकीतील चित्रे यासारख्या ऐतिहासिक खजान्याचा पगडा लाेकमानसावर जबरदस्त हाेता. आजही ताे दिसताे. गाेमंत काेकणाची ही परंपरा अपूर्व लाेकनृत्यांच्या सादरीकरणातून जाणवते. ‘धालाे’ सारख्या लाेकाेत्सवातून स्त्रियांच्या उपजतच असलेल्या कलागुणांचा परिचय समाजमनाला झाला तशाच पद्धतीने पुरुषांचे रांगडेपण, त्याच्या मर्दपणाचा आविष्कार  शिगमाेत्सवा सारख्या लाेकाेत्सवातून दिसून येताे. पेडणेपासून काणकाेणपर्यंत शिगमाेत्सवात खेळल्या जाणाऱ्या या खेळातून, लाेकनृत्यामधून, विधी परंपरेतून या उत्सवावर पुरुषांचे असलेले प्राधान्य दिसून येते. आदिवासी, बहुजनसमाजानेच शिगमाेत्सवासारख्या लाेकउत्सवाची परंपरा अबाधित ठेवलेली आहे. हा कष्टकरी समाज निसर्गाशी तन्मय हाेऊन बेधुंद नृत्य करताे. खेळात सामील हाेताे व माेठ्या आत्मीयतेने विधी परंपराचे पालन करतानाही दिसताे. 

सांगे तालुक्यातील नेत्रावळी ‘नुदे’ गावात शिगमाेत्सवाचा अविभाज्य घटक असणारे ‘हाणपेट’ हे तर निसर्गाचेच प्रतीक. धरित्री मानवी अस्तित्वासाठी सृजनाचे काेंब अंकुरते, जाेजवते. तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या अंगाखांद्यावर तलवारीचे वार नृत्याविष्कारात करुन घेत तिला रक्ताचा अभिषेक करण्यासाठी ‘हाणपेट’ केली जाते. पूर्वी जरी खराेखरीचा रक्ताचा अभिषेक हाेत असला तरी आज प्रतिकात्मकतेने लाेकमानसाने हाेणपेटीचे जतन केलेले दिसते. नुदे गावाच्या चव्हाट्यावर आजही ‘हाणपेट’ चाैरंग, ताेणयामेळ, गोफ, तालगडी व इतरही अनेक खेळांनी उत्स्फूर्त सजलेली रात्र अनुभवता येते. दुसऱ्या दिवशी मात्र ‘रणानाल’ घेऊन सर्व खेळगडी वेगवेगळ्या गावात खेळण्यासाठी म्हणून मेळ घेऊन बाहेर पडतात ते हाेळीच्या दिवशी आपापल्या मांडावर परत फिरतात. शिगमाेत्सव हा मर्दानी गड्यांचा उत्सव असा मानला जात असल्यानेच की काय काहीतरी भव्यदिव्य, अचाट, अचंबित करणाऱ्या लाेकविधी परंपरा नृत्यांनी ताे भरलेला दिसताे. आज जरी सतीची परंपरा नष्ट झालेली असली तरी एकेकाळी या भूमीत सतीची प्रथा हाेती हे शिगमाेत्सवातील सती उत्सवातून दिसून येते. हे एक अग्निदिव्यच. त्याची प्रचिती प्रतिकात्मकतेने निखाऱ्याची आंघाेळ करुन घेतली जाते. 

ओम नमाे गणपती

नमिल्या सरास्मती - अशी सुरुवात करुन सत्तरीतील केरी गावात शिगमाेत्सवातील सती उत्सवाची सुरुवात व्हायची. पची हाच परमेश्वर मानल्या गेलेल्या या समाजात पतीच्या निधनानंतर पत्नीने त्याच्या चितेत स्वत:ला झाेकून द्यावे हेच समाजमनाला मान्य हाेते. सती ही मग देवत्व पदवीला, पाेहाेचणारी ठरली. देवतत्वाच्या एका विशिष्ट उंचीवर ठेवूनच ‘कराेल्याे’च्या रुपात तिला पुजली जाते. आबाेलेच्या फुलांनी सजवून खणानारळाने ओटी भरुन तिची पूजा केली जाते. सत्तरीत, डिचाेलीच्या काही गावात कराेल्याे-करवालींचा उत्सव साजरा केला जाताे. स्वत:चे अचाट कर्तृत्व अधाेरेखित करण्याचा हा उत्सव शिशिरान्नी, शेणीऊजाे या सारख्या अग्निदिव्यातून पार पाडला जाताे. काणकाेण तालुक्यातील श्रीस्थळाचा ‘मल्लिकार्जुन’ व गावडाेंगरीचा मलकाजाण, मळकर्णेचा शेणी ऊजाे. काणकाेणसारख्या ठिकाणी तर आदिवासी वेळीप देवा दांडाे, पायका दांडाे, येथे जाऊन शिगमाेत्सव साजरा करतात. 

आदिवासीच्या सांगेत तालुक्यात महाशिवरात्रीपासूनच शिगमाेत्सवाची सुरुवात हाेते. काणकाेण व सांगे तालुक्यातील शिगमाेत्सवातील वेगळेपण डाेळे दिपवणारे असेच आहे. पाैष पाैर्णिमा ते फाल्गुन पाैर्णिमा पर्यंतचा दसर समाराेपाला जत्राेत्सव व शेवटी भाेवरी हाेते.  

उड रे भवरा काळा निळा

उडून जा भवरा शेवते झाडा 

या गीतांतून तालगडी ठेक्याची मस्ती अंगात रसरसून भरते. शुक्ल पक्षातील दशमीचा दिवस त्या समाजासाठी महत्त्वाचा. गावागावातील सुगीचे दिवस सुरु झाल्यानंतर गावागावांतील पडीक शेतजमिनीत नव तरुण गाेल खुंट मारुन सुटाना धरुनच प्रतिस्पर्धी समजून खेळाचे धडे गिरवतात. शिमगाेत्सवासाठीची ही तयारी अभूतपूर्वच अशी. सत्तरीतील आदिवासी येथे आणि घाटमाथ्यावर आलेले तलवार बहाद्दर हा घाेडेस्वार मराठ्यांचा संघर्ष यांची आठवण देणाऱ्या बऱ्याच विधी परंपरा आजही पाहायला मिळतात. तलवार घाेडे मराठ्यांच्या जीवनात महत्त्वाचे. दसऱ्याच्या सीमाेल्लंघनानंतर युद्धाच्या माेहिमेवर गेलेले मराठे पाऊस येण्यापूर्वी घरी परतायचे. कालांतराने लढाया इतिहासजमा झाल्या. परंतु गतवैभव जागृत करणारी घाेडेमाेडणी मात्र या इतिहासाची आजही आठवण करुन देेत. ठाण्याच्या मंडळगीऱ्याच्या मळावर सह्याद्रीच्या कुशीत संपन्न हाेणारी चाैदा घाेड्यांची अद्वितीय अशी घाेडेमाेडणी व इतर दाेन चार घाेड्यांच्या घाेडेमाेडणी इतिहासाची परंपरा जागृत करते. रणमाले, चाेराेत्सव, कुळेचा दुरीग उत्सव, कुंकळ्ळीचा ‘शिडीयाेत्सव’, डाेंगरीचा इंत्रुज, म्हार्दाेळचे मेळ, सावईवेऱ्याचे खेळ, पेडणेचे राेमटामेळ हे सारेच अभूतपूर्व असेच. 

चाेर सो चाेरुक गेलाे आंबियाच्या बनी

आंबियाच्या बनी त्याचा साधाना जाला

घाटमार्गाने जाणाऱ्या निष्पाप तरुणाना चाेर समजून सुळावर दिल्याने हातून महापाप घडल्याची जाणीव झर्मेवासियांना झाली. त्यामुळे आपल्या चुकीचे प्रायश्चित गावात चाेराेत्सव साजरा करुन करण्याची परंपरा रुढ झाली असावी. चरवणे व झर्मे या चाेर्लेच्या परिसरात आढळते. अशीच परंपरा सातव्या दिवशी केळघाट मार्गात असणाऱ्या करंझाेळ ला अनुभवता येते. शिगम्याचा उत्सव हा भगवान शिवाशी निगडित असलेला मानला जाताे. दक्षिणेकडच्या चाेल राजांनी त्याची उपासना नटराजाच्या रुपात केली. तांडव नृत्यासाठी प्रसिद्ध, स्मशानाचा देव, संहार कर्ता, प्रेत, भूत, देवचार यांच्याशी त्याचा संबंध मानला जाताे. 

मानवी मनाला या साऱ्याचेच भय असते त्याची माेठ्या श्रद्धेने थारावणी या शिगम्यामांडावरच केली जाते हा लाेकसमज. पिळगाव, कारापूर, बार्डे, साळ, कुडणे या गावात शिगमाेत्सवात हाेणारे ‘गडेत्सव’ याचेच तर प्रतीक आहे. नमन घालणे, नारळ फाेडणे यातून परमेश्वराप्रतीचा आदर व्यक्त होतोच. परंतु त्याबराेबरीनेच त्या अज्ञात शक्तीचा काेप दूर करण्याचा प्रयत्न ही हाेत असताे. आदिवासी समाज साेडला तर इतर समाजाचा शिगमाेत्सव हाेळीपासूनच सुरु हाेताे. अशा या हाेळीची आठवण करणारी सकारत मग समूर्त हाेत जाते. 

धया गे भाताची , बान माते शिदाेरी

चाल केली नगरी भयणी घरा... हाे रामा।

हळदीच्या आंगाचाे, तेलाच्या रंगाचाे

नकाे जांऊक पितरा, गाेऱ्याला आंगाचाे तुझ्या दिष्ट जाता

विडे माते पिशे तसा म्हना नये

भयनी वाचून येवक गे घडा नये

तानलाडू भूकलाडू बानले शेल्यापदरी

चाल केली नगरी भयणी घरा

भयणी घरा जाताना दिस माऊळला

तेनी जाे पाऊलाे भयणी घरा

भयणीन दुरसून देखिलाे, उजवे हाती पानी 

दाये हाती म्हणी लाेणीचा भाण भयणीन नाकारीला

रुपयाची वर्गडी, मेरु मटनाचाे, पाट चंदनाचाे बसलियाे

विचार म्हणाना, दुरबळाचे घरी, सम्रताचा येणा

आसा काम काज ह्याच जलमाचा

येतय जाल्यार ये गे माजे भयणी

आसा माजी हाेळी करु घरी

रंगगंधाने परिपूर्ण असलेल्या हाेेळी-शिगम्यातील सकारतीमधून वेदनेची किनार लाभते आणि करुन काहाणींचा सुद्धा लाेकमानसाने कसा उत्सव साजरा केला याचे माेठेच आश्चर्य वाटते. लाेकसमूहाच्या भावभावनांच्या त्यांच्या अंगी असलेल्या कलाविष्कारांचा, विधी, रुढी, परंपरेच्या पगड्याचा उत्स्फूर्त आविष्कार शिगमाेत्सवात दृष्टीस पडताे. शिगमाेत्सव तर खऱ्या अर्थाने लाेकाेत्सव आहे. अबाेली, हुस्की सारख्या फुलांचा बहर आणि याच फुलांना प्रामुख्याने जवळ घेणारा हा उत्सव कष्टकरी समाजाचा, या मातीचे संचित आणि संस्कृती जतन करणाऱ्या भूमीपुत्रांचा आहे.


पाैर्णिमा केरकर