अपूर्णतेत असते गोडी

Story: मनातलं |
22nd March, 10:29 pm
अपूर्णतेत असते गोडी

प्रत्येक माणसाची मनाशी काही स्वप्ने असतात. काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी त्याची खटपट चालू असते. पण आपल्याला जे जे हवं ते सगळं झालं असतं किंवा घडलं असतं तर जगण्याची गंमत कळली असती का आपल्याला. आपल्या सगळ्या इच्छा सगळी स्वप्ने आयुष्यात पूर्ण होत नाहीत ना, काहीतरी बाकी उरतंच, अपूर्ण रहातं, हातातून कधी कधी निसटून जातं पण त्यातही एक प्रकारची गोडी असते. त्या अपूर्ण राहिल्याने त्यात एक रुखरुख लागून रहाते मनाला. आणि जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत मनाने त्याचा ध्यासच घेतलेला असतो. ती गोष्ट न मिळाल्याने त्याचे महत्त्व वाढताना दिसते. इथे कोणाचेही आयुष्य हे परिपूर्ण आहे असे दिसत नाही. अगदी गरीबातला गरीब असो की श्रीमंतातला श्रीमंत; त्याच्या आयुष्यातही कसली तरी उणीव, अपूर्णता व्यापून राहिलेली असते. आणि ती अपूर्णता त्याला स्वस्थ बसू देत नाही. सतत त्याचा पाठपुरावा करायला भाग पाडत असते. त्या अपूर्णतेत एक आशा दडलेली असते. त्या आशेच्या जोरावरच माणूस तग धरून रहातो. 

मध्यंतरी प्रवासात भेटलेली एक व्यक्ती. ओळख वाढली, गप्पा टप्पा होऊन आमचा एक ग्रुप तयार झाला. पण जेव्हा ती व्यक्ती काही बोलायची, तेव्हा तिच्या बोलण्यातून त्याच्या जीवनात अधुऱ्या राहिलेल्या प्रेम कहाणीचा सतत उल्लेख असायचा. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हे त्याचे आवडते गीत तो अंताक्षरीत म्हणताना त्याचे डोळे पाणावले होते. तो त्याचा भूतकाळ होता. आणि अपुरे राहिलेले स्वप्न तो उराशी बाळगून होता. खरं तर आता तो एक जबाबदार पती, बाबा होता. घरात, कामावर यशस्वी झाला होता पण तरीही न मिळालेल्या गोष्टीने मनातून दु:खी होता. कधी कधी बरीकसा काटा बोटात घुसतो तो काढता येत नाही पण आतल्या आत सलत रहातो तसं त्याचं दु:ख होतं. आणि ते दु:ख कुरवळत राहण्याने त्याच्या मनाला विरंगुळा मिळत असावा. आयुष्यात केलेलं पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही म्हणतात तसं त्याचं झालं होतं. पण आजच्या सुखाच्या क्षणी ते दु:ख का आठवावे? याचा उलगडा होत नव्हता. कदाचित ‘स्वप्नातल्या कळयांनो उमलू नकात केव्हा, गोडी अपूर्णतेची लाविल वेड जिवा’ अशी ती अपूर्णतेची गोडी त्याला गोड वाटत असावी. फूल उमलण्या आधीची अवस्था म्हणजे कळी. ती पूर्ण उमललेल्या फुलापेक्षा अधिक मोहक दिसते. तिच्या रूपात उद्याचं रूपांतरीत होणारं फूल असतं. म्हणून कदाचित ते जास्त भावतं मनाला. अपूर्णतेचा आनंद हा पूर्णतेपेक्षा जास्त वाटतो कुणाकुणाला.  

एखादी अर्धवट गोष्ट ऐकली असेल तर ती पूर्ण होई पर्यन्त मनाला चैन पडत नाही. ‘अरेबियन नाइट’मधल्या राजाच्या मनस्थितीसारखी बेचैनी मनाला लागून रहाते. तसंच एखादं झोपेत पाहिलेलं अर्धवट स्वप्नही मनाला चटका लाऊन जातं आणि ‘अपुरे माझे स्वप्न राहिले, का नयनांनो जागे केले?’ असे आपल्याच नयनांना विचारवेसे वाटते. स्वप्ने ही अनघड असतात. मनातल्या सुख चित्राचं त्यात रेखाटन असतं. त्या स्वप्नाचा अर्थ लावायचा मनाला चाळा लागतो. त्या अपूर्णतेत पूर्ण होण्याची अपेक्षा असते. भविष्य असतं. पण पूर्णत्व लाभल्यावर मात्र ती गोडी संपून जाते. वास्तवात आलो की अपूर्णत्व मनाला त्रास देत रहातं.   

मनासारखं घडावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण तसं घडत नाही. नोकरी, करियर, घर, व्यवसाय, कुटुंब, मित्रमैत्रिणी याबाबत आपण काहीतरी घडावे अशी अपेक्षा ठेऊन असतो. ते तसे घडेलच असे सांगता येत नाही. पण स्वप्न बघणं आणि ती प्रत्यक्षात येणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. मग अशी पूरी न झालेली इच्छा आपण मनाशी धरून ठेवतो. तर कधी कधी नव्हतं असं घडायचं हे सत्य स्वीकारून दुसरा मार्ग निवडतो. पण ती अपूर्णता मनात कायम टिकून रहाते. कधी कधी वाटतं आपल्याला जे हवे ते पूर्णपणे कधी मिळूच नये कारण एकदा ती गोष्ट पूर्णपणे आपल्याला मिळाली की आपल्या मनातली अपूर्णता रहात नाही. ती नाहीशी झाली की ओढ नाहीशी होते. एखाद्या गोष्टीत यश मिळालं की तेव्हा आपण सुखावतो मनाला शिथिलता येते आणि शरीराला जडता येते. त्यामुळे कार्य करण्याची गती मंदावते. जो पर्यन्त भावना अतृप्त असतात, तोपर्यंत आपण कार्यशील असतो.  

एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात खूप शिकण्याची इच्छा असेल पण त्याला ते शक्य झाले नसेल तर ती व्यक्ती आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न आपली मुले पूर्ण करतील अशी अपेक्षा धरून राहते. आपली अपूर्णता पूर्णत्वाला येई पर्यन्त त्याचे समाधान होत नाही. मुळात माणसाचे मन हे नेहमीच कसल्या ना कसल्या अपेक्षा मनाशी धरून राहते. ती मिळेपर्यन्त तो त्या अपेक्षेत जीवन कंठत असतो. त्यात त्याचे मन रमते. कुणाला मातृत्वाचे, कुणाला बढतीचे, कुणाला डॉक्टर, इंजिनियर होण्याचे, कुणाला पायलट होण्याचे असे वेध लागलेले असतात. काही कारण वश त्यात खंड पडला किंवा काही अडचणी उद्भवल्या त्या अपेक्षा  पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर त्यासारखे मोठे दुख नाही आणि त्या अपूर्णतेच्या दुखातून  बाहेर येण्यासाठी  खूप धडपड करावी लागते. म्हणून येईल त्या प्रसंगाला तोंड देत त्या परिस्थितीवर मात करत पुढचं पाऊल टाकलं तर मागचे अपयश धुवून काढता येते. आणि काळ हे त्यावर औषध ठरते. येणाऱ्या भविष्याला मागच्या अपूर्णतेची झळ लागू न देणं हे प्रत्येकाच्या हाती आणि मनात असतं. म्हणूनच अपूर्णतेची गोडी मनात साठवत जीवन पूर्णत्वाला नेण्याचे ध्येय मनाशी ठरवलं पाहिजे.


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.