स्वकर्तृत्ववान मधुरा वैकुंठ बुर्ये

परमेश्वराने स्त्रीला शरीराने आणि मनाने जरी कोमल आणि नाजूक बनवले असले तरी जीवनात आलेल्या कठीण प्रसंगात वज्राहून कठीण बनण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी आहे. याची प्रचिती आपल्याला कित्येक स्त्रियांची यशोगाथा पाहताना अनुभवायास मिळते. शिवोली बार्देश येथील 'बुर्ये एम्पोरियम'च्या संस्थापिका मधुरा वैकुंठ बुर्ये या अशाच एक नावारूपाला आलेल्या एक प्रामाणिक व्यावसायिक.

Story: तू चाल पुढं |
15th March, 11:03 pm
स्वकर्तृत्ववान मधुरा वैकुंठ बुर्ये

त्यांनी या व्यवसायाला १९९७ मध्ये अगदी छोट्या दुकानापासून सुरुवात केली. या दुकानात आइस्क्रीम, बिस्किटे, शेव, चिवडा असे पदार्थ मिळायचे. तीन वर्षे हे दुकान चालवल्यावर काही अडचणी आल्या आणि हे दुकान बंद पडले. दुकान बंद पडल्यावर कमाईचा काहीच स्तोत्र नव्हता. पैशांची चणचण होतीच, पण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कोणापुढे हात पसरणे हे मधुरा यांच्या रक्तात नव्हते. कोणाकडून साधी मदत तर सोडाच पण त्यांनी सुरू केलेल्या कामात आडकाठी घालणारेही भरपूर होते. एखादा व्यवसाय सुरू करावा म्हटला तर हातात हवा तेवढा पैसाही नव्हता. मुलांच्या कक्षा आणि दिशा बदलत होत्या. घरात राहून एकटेपणा वाढत होता. त्यामुळे घरात कोंडून घेतल्यागत त्यांची स्थिती झाली होती. तरी जिद्द न हारता मधुरा यांनी पुढे जाण्याचे मनोमन ठरवले आणि काटकसरीने सर्व डोलारा सांभाळला.

त्यांच्या घरासमोर गाडीसाठी पोर्च होता. त्याला काचा लावून त्यात त्यांनी छोटेसे दुकान बनवलं. आणि या छोट्या व्यवसायाला एकटीने सुरुवात केली. खडतर मेहनत करत असताना नशिबाची साथ आणि देवाची कृपा लाभली. या दुकानासाठी लागणार्‍या सर्व मालाची खरेदी-विक्रीची किंमत ठरवणे आणि इतर सर्व कामे त्या एकट्याच करायच्या. असल्या कामांची सवय नसल्याने दुकानात राहून हे सर्व सांभाळताना त्यांची खूप धावपळ आणि भंबेरी उडायची. तरी मनाचा दृढ निश्चय करून त्यांनी कष्टाला कधीच नाकारले नाही. जर व्यवसायात फसलो गेलो तर आपलेच काही लोक नाव ठेवायला टपून बसले आहेत हे त्यांना समजून आल्यामुळे त्यांना जास्त प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी अधिक उमेदीने काम करण्यास सुरुवात केली.

२००५ साली त्यांनी दुमजली इमारत बांधली. तिथे आता 'अमूल पार्लर' सुरू आहे. मग अजून पुढे २४० स्क्वेअर मीटरची मोठी इमारत आली. 'बुर्ये एम्पोरियम'चे दुमजली मोठ्ठं दुकान आणि वर चार फ्लॅट अशी इमारत सजली. या दुकानात कपडे, सर्व प्रकारची भांडी, स्टेशनरी आदी सर्व उपलब्ध आहे. त्यामुळे दुरून दुरूनही लोक येतात. मधुरा यांनी हा व्यवसाय सांभाळताना वस्तूंचा दर्जा सांभाळला. किंमती सांभाळल्या आणि ग्राहकही सांभाळले. त्यामुळे एकदा या दुकानाला भेट देणारा ग्राहक अगदी कायमचाच त्यांचा ग्राहक बनून जातो. अगदी फोरेनर्स सुद्धा!

मधुरा यांनी जेव्हा त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा धाकटा मुलगा साईश हा अगदी लहान म्हणजे सात वर्षाचा होता. त्याने लहानपणापासून आपल्या आईचे कष्ट व तिची काम करण्याची पद्धत पाहिली होती त्यामुळे त्याला या व्यवसायाची चांगलीच जाण होती. आईला प्रोत्साहन देताना खरेदीत काय चालेल हे तो सहज सांगायचा. आज तोच व्यवसायाचे सर्व अकाउंट्स सांभाळत आहे.


हा व्यवसाय सांभाळताना मधुरा यांना गीता नावाची सहकारी भेटली. तिचे सहकार्य मिळाल्यामुळे त्यांच्या कामाचा भार जरा हलका झाला. सध्या त्यांच्या दुकानात चार मदतनीस असून हे सर्व प्रामाणिक आहेत. त्यामुळे त्यांचा व्यवसायही भरभराटीस आला.

आयुष्यात समोर आलेल्या अनेक खाचखळग्यांना पार करत मधुरा यांनी आपल्या यशाची घोडदौड आपल्या हिंमतीवर आणि कर्तृत्वावर कायम ठेवली आणि यशाची मधुर चव घेतली. व्यवसायात चांगला जम बसल्यावर वाचन आणि प्रवास हे आपले छंद जोपासताना त्यांनी कुठेच कमी ठेवली नाही. एकटीने प्रवास करतानाही त्यांनी त्याचा आनंद लुटला.

कोणत्याही परिस्थितीत स्त्रीने घाबरून न जाता स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवावा. लोकांच्या निंदेतून स्वत:ला कधीच कमी लेखू नये. प्रत्येक स्त्रीमध्ये उपजत कलागुण, क्षमता असतात. या कलागुणांचे चीज करताना, स्वत:च्या अंगातील क्षमता सिद्ध करताना पूर्ण ताकदिनीशी लढावे. हा अनमोल सल्ला मधुरा समस्त स्त्रीला देतात.


कविता प्रणीत आमोणकर