मासिक पाळी दरम्यान मूड स्विंग्स ?

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक मुलीला, महिलेला आयुष्यात त्याचा सामना करावा लागतोच. महिन्यातील ‘ते’ चार दिवस सर्व महिलांसाठी सारखेच नसतात. कोणाला कमी त्रास होतो, तर कोणाला जास्त. या काळात पोटदुखी, पाठदुखी, ओटीपोटात दुखणे, जास्त स्त्राव होणे अशा अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. याचसोबत कधीकधी मासिक पाळी दरम्यान अनेकदा अचानक आपला मूड बदलतो.

Story: आरोग्य |
15th March, 10:59 pm
मासिक पाळी दरम्यान मूड स्विंग्स ?

या मूड बदलण्यामुळे विनाकारण चिडचिड होते, रडू येते, कामात मन लागत नाही. दुसऱ्यांवर चिडून झाल्यावर मग वाटते, अरेरे मी उगाच गोष्टीचा बाऊ केला. प्रत्यक्षात एवढे काही नव्हतेच. पाळी चालू असताना महिलांना तीन ते चार दिवस कमी जास्त त्रास हा होतोच. पोटदुखी, वेदना घरगुती उपायांनी कशातरी शमतात, पण मूड स्विंग्स टाळण्यासाठी काय करावे हे मात्र समजत नाही हे सारे नक्की कशामुळे होते?

मूड स्विंग म्हणजे अल्पावधीत मूडमध्ये अचानक बदल होणे. मासिक पाळीदरम्यान मेंदूतील पिट्यूटरी ग्लँड आणि अंडाशय यांच्यातील संबंध बिघडल्याने मूड स्विंग्स दिसून येतात. मूड नियंत्रित करणाऱ्या सेरोटोनिन या हार्मोनची पातळी शरीरात वाढल्याने लहान लहान गोष्टीवरून रडू येणे, संवेदनशीलता वाढणे हे होऊ शकते. तसेच अस्वस्थ वाटणे व दु:ख भावनाही वाढू शकते. ही लक्षणे जेवढ्या पटकन दिसून येतात तेवढ्याच क्षणार्धात गेलेल्याही असतात. हे कोणाच्या बाबतीतही होऊ शकते. अगदी पौगंडावस्थेत मासिक पाळी सुरू झाल्यापासून ते अगदी रजोनिवृत्ती येईपर्यंत त्या दरम्यान होणाऱ्या हार्मोनल चढउतारांमुळे महिलांमध्ये मूड स्विंग्स होऊ शकतात.

९०% पेक्षा जास्त स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी प्रिमेन्स्ट्रअल सिंड्रोमची लक्षणे दिसतात. यामध्ये मूड बदलण्याचे लक्षण प्रामुख्याने दिसून येते. अनेक स्त्रियांमध्ये या काळात मुड कालांतराने अचानक बदलताना दिसतो. इच्छा नसतानाही त्या चिडखोर, अबोल, उदास राहतात. यामुळे दैनंदिन जीवनावर, कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मूड स्विंग्सच्या लक्षणांमध्ये वाढ होत असल्यास किंवा खूप काळापर्यंत असल्यास त्याचा परिणाम स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर होतो व अशा स्थितीत वैद्यकीय मदत लागू शकते. 


मुड स्विंग्सची लक्षणे कमी करण्यासाठी काय करावे? 

आहारात कॅफिन टाळावे : कॅफिन, साखरयुक्त पेये आणि मद्यपान आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर परिणाम होतो. मासिक पाळी दरम्यान, तहान लागल्यास साधे पाणी किंवा नारळाचे पाणी प्यावे. कॅफिनयुक्त पेय टाळावी.

धूम्रपान करू नये : सिगारेट-तंबाखूच्या सेवनाने हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. तंबाखूच्या वापरामुळे थायरॉईडची पातळी बिघडते, पिट्यूटरी संप्रेरक उत्तेजित होते आणि कोर्टिसोल वाढते, ज्यामुळे स्त्रियांमध्ये अचानकपणे मूड बदलण्याची लक्षणे दिसतात.

तणाव घेणे टाळावे : अनेकदा आपण तणावात असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करत जातो. बाहेरील प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, पुरेशी झोप न घेणे या गोष्टींनी तणाव वाढतो. यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तसेच शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. विचारशक्ती कमी होते व चिडचिड होऊ लागते.

मन आवडीच्या कामात गुंतवावे : मासिक पाळीदरम्यान शरीरावर ताण पडणार्‍या गोष्टी टाळाव्यात. आवडीच्या कामात स्वतःला वेळ द्यावा, छंदाला वेळ द्यावा. विश्रांतीच्या मूडवर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आनंद आणि समाधान मिळते व मूड चांगला राहतो. 

हलके व्यायाम करावे : मासिक पाळीमध्ये अवघड व्यायाम किंवा शारीरिक श्रमाचे व्यायाम टाळावे. पण वॉकींग, एरोबिक्स, श्वासाचे व्यायाम, योगासने किंवा मेडिटेशन करावे. हलक्या व्यायामाने मेंदूमध्ये अॉक्सिजन पुरवठा व्यवस्थित होतो, शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्राव वाढतो व तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते.

निरोगी आहार अवलंबावा : आहारात तळलेले-भाजलेले पदार्थ टाळावेत. कधीतरी चुकून खाल्ले तर चालेल पण रोज चमचमीत खाण्याची सवय होऊ देऊ नये. फळे, नारळ-पाणी, ज्यूस घ्यावा. आहारात साखर व कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी ठेवावे. भरपूर पाणी प्यावे. फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी, लोह असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हिरव्या भाज्या, डाळी, फायबर युक्त पदार्थ आहारात असावे. 


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर