'तो सबंध आशियाशी युद्ध करीत आहे...'

Story: साेनेरी पाने |
09th March, 11:00 pm
'तो सबंध आशियाशी युद्ध करीत आहे...'

पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजनैतिक, सामरिक संबंधाची एक वेगळीच चढाओढ इतिहासाने नोंदवली आहे. इवल्याशा गोमंतकात पाय रोवून बसलेल्या पोर्तुगीजांनी जवळपासच्या सगळ्या सत्तांना थेट आव्हान दिले होते. अगदी मोघलांनाही त्यांनी एकवेळ जुमानले नाही. लेखाचे शीर्षक वाचून वाचकांनाही अशाच एखाद्या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या बहादुरीचा नमुना वाटला असेल मात्र असे नसून हे शीर्षक थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी त्याच पोर्तुगीज सत्तेच्या गव्हर्नरने उल्लेखलेले शब्द आहेत. मिर्जाराजे जयसिंग यांच्या स्वारीने शिवाजी महाराजांना आपला बराचसा प्रदेश दिल्लीपतीला द्यावा लागला. दिल्ली दरबारी अपमान, कैद झाली ते वेगळेच. या घटनेची चर्चा त्यावेळी अगदी युरोपियन लोकांपर्यंत पोहोचली होती यावरून या घटनेचं तत्कालीन काळातील महत्त्व लक्षात येते. महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले हा रोमहर्षक, अंगावर काटा आणणारा इतिहास सर्वदूर आहे. 

१९ ऑगस्ट १६६६ रोजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले. यासंबंधाने पोर्तुगीज गव्हर्नरने आपल्या पोर्तुगालमधील राजाला एक पत्र लिहिले त्या पत्रात शिवाजी महाराजांची पोर्तुगीजांनी किती धास्ती घेतली होती ते दिसते. पोर्तुगीज व्हॉईसरॉय अंटॉनियो मेलू द कास्चु हा शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून पलायनाच्या धाडसी मोहिमे संदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हणतो की 'तो (शिवाजी) फळांच्या पेटाऱ्यात बसून तुरुंगातून मोठ्या शिताफीने बाहेर पडला. तो छत्तीस तास पेटाऱ्यात होता. तो एखाद्या विजेप्रमाणे कोकणात शिरला व आदिलशहाच्या सेनापतीला नजराणा म्हणून पाठवलेल्या द्रव्याच्या तिप्पट द्रव्य वसूल केले. आता त्याने अनेक देसायांना आपल्या अंकित केले असून आमच्या हद्दीपासून जवळ येऊन ठेपला आहे.' 

शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्यामूळे आदिलशहा धास्तावला. त्याने घाबरून आपल्या सैन्याची जुळवाजुळव करून चाळीस हजार सैन्य एकत्रित केले आणि शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी कोकणात उतरला. कोकण आदिलशहाच्या अधिपत्याखाली असल्याने या प्रदेशाचे रक्षण करणे त्याला भाग होते. महाराजांनी आदिलशहाच्या सेनापतीला लाच म्हणून काही नजराणे पाठवले. सेनापती यामुळे काहीसा गाफील राहिला अन् याचीच संधी साधून महाराजांनी त्यांच्या प्रदेशावर हल्ला केला आणि लूट केली.

पोर्तुगीज व्हॉईसरॉय आपल्या पत्रात पुढे लिहितो की, 'धुर्तपणा, चातुर्य, चपळता, पराक्रम आणि लष्करी बुद्धी या बाबतीत शिवाजीची तुलना करायची झाल्यास ती ज्युलियस सीझर आणि सिकंदर (अलेक्झांडर) यांच्याशी करावी लागेल...' छत्रपती शिवाजी महाराज आग्रा कैदेतून सुखरूप मायदेशी परतल्याचा जबरदस्त परिणाम पोर्तुगीजांवर झाल्याचे दिसून येते. महाराजांचा हा एक दिव्य चमत्कार असल्याची त्यांची धारणा झाली होती. शिवाजी महाराजांची वक्रदृष्टी आपल्या राज्यावर पडू नये म्हणून त्यांनी नरमाईचे धोरण अवलंबले होते. महाराजांची अशीच तुलना ब्रिटिशांनीही अलेक्झांडर आणि ज्युलियस सिझरशी केली होती मात्र ती पोर्तुगीजांपेक्षा जवळपास दहा वर्षांनी उशिरा असे इतिहास संशोधक पी. एस. पिसूर्लेकर म्हणतात. याच पत्रात व्हॉईसरॉय पुढे म्हणतो की, 'तो (म्हणजे शिवाजी महाराज) नाही अशी एकही जागा नाही. तो सबंध आशियाशी युद्ध करीत आहे.' तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता, मोघल बादशहा हाच भारतीय उपखंडातील बलाढ्य बादशाह होता. आशियातील एका मोठ्या प्रदेशावर त्याचं राज्य होतं. लाखोंचा फौजफाटा असल्यामुळे त्याची ताकद अवघ्या आशियाभर पसरली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा लढा हा दिल्लीच्या बादशहाशी पर्यायाने अवघ्या आशियाशी चालू असल्याचे तो म्हणतो. पत्रातला हा मजकूर महाराजांच्या पराक्रमाचा आवाका दर्शवण्यास पुरेसा आहे. 

पोर्तुगीज सत्तेने शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेनंतर एक पत्र लिहिले होते. १५ जुलै १६६७ रोजीच्या आपल्या पत्रात गव्हर्नर कौंट म्हणतो, 'आपण संकटमुक्त होऊन आपल्या राज्यात आलात ही आनंदाची गोष्ट आहे.... ' अर्थात, पोर्तुगीजांना नेहमीच शिवाजी महाराजांच्या राज्याचा शेजार पोर्तुगीज राज्यासाठी फायद्याचा ठरला आहे. एका पत्रात यासंदर्भात पोर्तुगीज उल्लेख करतात. खांदेरी उंदेरी जलदुर्गाची तटबंदी महाराजांनी केली त्यावेळी ब्रिटिशांनी ही तटबंदी उद्ध्वस्त करण्यासाठी पोर्तुगीज व्हॉईसरॉयकडे मदत मागितली. व्हॉईसरॉयलाही आपल्या सल्लागार मंडळाकडून तशी परवानगी मिळाली. मात्र त्याने ब्रिटिशांना मदत केली नाही. महाराजांच्या जलदुर्गाची एक इंचभरही ते तोडफोड करू शकले नाहीत. २५ जुलै १६७६ (पिसुर्लेकर १६७९ चे पत्र म्हणतात) च्या एका पत्रात ब्रिटिशांनी पोर्तुगीजांच्या या भ्याडपणाचा उल्लेख केला आहे. यावर गोव्याच्या व्हॉईसरॉयने आपल्या या भ्याडपणावर स्पष्टीकरण देताना पोर्तुगालच्या राजाला पत्र लिहिले त्यात तो म्हणतो की, 'इंग्रजांनी त्याला (शिवाजी राजास) विरोध करण्याचे ठरवले असले तरी आम्ही याकामी त्यांना मदत न करण्याचे ठरवले आहे कारण, इंग्रजांपेक्षा आम्हाला शिवाजीचा शेजार बरा वाटतो.'

सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला सुप्त लढा बराच काळ चालू होता. यासंदर्भात अनेक पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. महाराजांच्या राज्यविस्तारापुढे त्यावेळच्या शेजारी सत्ताधिशांनीही धास्ती घेतली होती. आदिलशहासारखा कसबी शेजारीही हतबल झाला होता. महाराजांचे वाढते लष्करी सामर्थ्य पाहून १६६३मध्ये पोर्तुगीजांनी पत्र पाठवून महाराजांकडे तहाच्या वाटाघाटी केलेल्या आढळतात. प्रत्यक्षात हा तह मात्र १६६७मध्ये झाला. तहामुळे शिवाजी महाराजांच्या राजकीय सामर्थ्याची दिल्लीच्या बादशहाला, आदिलशहा सारख्या सत्तांनाही दखल घ्यावी लागली. 

पोर्तुगीजांनी गोव्यात चालवलेली अनिर्बंध सत्ता, दडपशाहीचं धोरण, हिंदूंचा छळ अन अमानुष अत्याचार या सर्वांचा परिपाक म्हणून शिवाजी महाराजांच्या गोव्यातील हालचालींचा मागोवा घ्यावा लागेल. जे पोर्तुगीज अगदी दिल्लीच्या बादशहालाही जुमानत नसत, आदिलशहाला जुमानत नसत तेच पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने असे काही दिपून गेले होते की त्यांना महाराज आशियातील बलाढ्य राजे वाटू लागले होते. जग पादाक्रांत करण्याची मनीषा बाळगून निघालेल्या सिझर अन अलेक्झांडर यांच्याशी तुलना ते करू लागले. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांची तुलना केवळ त्यांच्यांशीच होऊ शकते. त्यांच्या कर्तृत्वाचा धसका पोर्तुगीजांनी घेतल्यास नवल ते कसले...


संतोष काशीद