सावर रे

Story: स्वस्थ रहा मस्त रहा |
09th March, 10:57 pm
सावर रे

तुम्हा सर्वांना माहितंच असेल की सध्या वसंत ऋतू सुरू आहे. वसंत ऋतू म्हणजे निसर्गात रंगांची उधळण. रंगीबेरंगी फुलं बागेत तसेच रानावनात सुद्धा बहरलेली दिसतात. या फुलांकडे नुसतं बघितलं तरी किती छान वाटतं ना?

मार्च महिन्यात पाने नसलेला, पण तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला आणि खोडावर जाड काटे असलेला एक वृक्ष पटकन आपल्याला आकर्षित करतो. याला काटेसावर म्हणतात.

या झाडाच्या खोडाला भरपूर मोठे काटे असतात म्हणून याला मराठीत ‘काटेसावर’ म्हणतात. संस्कृत भाषेत 'शाल्मली' असं सुंदर नाव या झाडाला दिलं आहे. 

आपल्या देशात अशी विविध झाडं आणि वनस्पती आहेत ज्यांचा उपयोग आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.

ही सावरीची लाल किंवा गडद गुलाबी फुलं जेवढी सुंदर तेवढीच आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. 

 फुलांचा आहारातसुद्धा वापर केला जातो. उत्तर भारतात या फुलांची भाजी खाल्ली जाते.  ही अशी वेगळी फुलांची रानभाजी कधीतरी आईला बनवून द्यायला सांगा.

 जसा गुलाब पाकळ्यांचा गुलकंद केला जातो तसाच या सावरीच्या फुलांचा देखील गुलकंद तयार केला जातो जो पौष्टिक आहे. जॅमसारखा चपाती बरोबर हा गुलकंद छान चविष्ट लागतो. 

 ही फुलं वाळवून त्यांची पावडर केली जाते आणि विविध औषधं त्यापासून बनवली जातात. 

 या झाडाच्या लाकडाचा वापर फर्निचर बनवण्यासाठीही केला जातो.

 काटेसावरच्या लाकडापासून होडी देखील तयार केली जाते. कारण या झाडाचे लाकूड हलके असते. 

या झाडाचे काटे सुद्धा उपयोगी आहेत बरं का... हे काटे उगाळून त्यातून तयार होणारे गंध पिंपल्स कमी करण्यासाठी चेहऱ्याला लावले जाते. या झाडावर पुढे काही दिवसांनी बोंडे तयार होतात. या बोंडांमधून कापूस निघतो. या कापसाचा उश्या, गाद्या इत्यादि बनवण्यासाठी उपयोग केला जात असे. 

असा हा सुंदर फुलं असलेला सावरीचा वृक्ष आजूबाजूला कुठे दिसलाच तर त्याची फुलं गोळा करायला विसरू नका. झाड खूप उंच असतं बरं का! त्यामुळे जमिनीवर पडलेली फुलं गोळा करावी लागतात. फुलांना पाकळ्या किती असतात, आकार केवढा असतो, चव कशी आहे??? ते स्वत: प्रत्यक्ष बघा आणि ही माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींनाही सांगा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य