आजी, मला चांदुकल्या हव्या!

Story: छान छान गोष्ट |
16th March, 11:09 pm
आजी, मला चांदुकल्या हव्या!

आभाळाच्या कुशीत, ढगांच्या सावलीत चमचम चंदेरी केसांची, सुरकुतल्या देहाची, बोळक्या तोंडाची एक आजी रहायची. आजी म्हणजे नातवंडांसाठी एक जिव्हाळ्याचं स्थान असतं, आपलं हक्काचं असं आवडतं माणूस असतं. तशीच होती ही आजी. 

या आभाळातल्या आजीची छोटीसी नात होती. आजीचं शेपूटच जणू. दिसायची तर किती गोड! आपला अभ्यास झाला की शेजारच्या परीआळीत जाऊन त्या पऱ्यांसोबंत खेळायची, मग दमूनभागून घरी आली की आजीच्या हातचा गरमागरम वरणभात खाताखाता आजीला कितीक प्रश्न विचारायची. आजीही नातीच्या प्रश्नांची जमतील तशी उत्तरं द्यायची. अशी होती ही आजी नातीची गट्टी.

आजी नं नात एके दिवशी झोपडीबाहेरच्या अंगणात बसल्या होत्या. रात्रीची वेळ होती. आकाशाच्या अंगणात चांदण्या चमचमत होत्या. आजीची नात त्या प्रत्येक चांदणीजवळ जाऊन तिचं चमचमणं हरखून पहात होती.

 ती छोटुली, गोबऱ्या गालांची निळ्या डोळ्यांची मुलगी जवळ आली की चांदण्या अधिकच चमकू लागत. नात मग खूश होऊन आपले हात फैलावून गोल गोल गिरक्या घेई. बराच वेळ झाला तसं आजीने नातीला झोपायला बोलावलं. झोपडीत चांदण्या नव्हत्या. नातीला वाटलं या चमचम चांदण्या सदा आपल्याकडेच रहाव्यात. तिने आजीपाशी हट्ट धरला.

''आजी गं आजी"

"काय गं नाती?"

"मला नं आकाशाच्या अंगणातल्या साऱ्या चांदुकल्या हव्या"

"खेळलीस नं तासभर चांदुकल्यांशी. आता नीज बरं. मी तुला छानशी गोष्ट सांगते पिटुकल्या उंदराची, सांगू! का बुडबुड घागरीची सांगू?"

नातीने पाय झडकवले. फुरंगटली.,"मला पिटुकला उंदीर नको नं बुडबुड घागरी नको. मला हव्यात खूप साऱ्या चांदुकल्या. ए आजी, त्या चमचम चांदुकल्यांचा फ्रॉक कित्ती छान दिसेल! मी तो घालून गोल गिरक्या घेईन. परींच्या आळीत जाऊन पऱ्यांना दाखवेन."

नात काही हट्ट सोडीना. 

एक दिवस गेला. दोन दिवस गेले...चांगले चार दिवस गेले. पऱ्यांसोबत खेळायला जाणं नाही की आजीकडून गोष्टी ऐकणं नाही. सारखं आपलं एकच टुमणं..खूप साऱ्या चांदुकल्या हव्या. हव्या म्हणजे हव्या.

रात्र झाली तशी आकाशाच्या अंगणात चांदोबा आला. त्याच्या दुधीप्रकाशाने आकाशाचं अंगण उठून दिसत होतं. आजी काठी टेकत टेकत चांदोबाजवळ गेली.

"नातीला सोडून आजीबाई इकडे कशी? गोष्ट सांगायची वेळ ना ही तुझी. तुझ्या गोष्टी मी नि माझ्या चांदुकल्याही ऐकतात बरं." चांदोबा म्हणाला.

"अरे चांदोबा, गोष्टी काय हव्या तितक्या सांगेन, पण माझ्या वेड्या नातीने  एक अजबच हट्ट धरलाय बघ."

"छोटुलीचा एवढा हट्ट तरी कोणता?"चांदोबाने विचारलं.

आजीने चांदोबाला नातीचा हट्ट सांगितला. 

चांदोबा म्हणाला,"हात्तिच्या, एवढंच ना. राहुदेत काही दिवस चांदुकल्या तुझ्या नातीपाशी. तिचं मन भरलं की  देईल आणून परत.

या चांदुकल्या म्हणजे चांदोबाच्या पोरीसोरी. त्यांनी आजीच्या नातीसाठी आजीच्या सुपलीत येण्याची आज्ञा मानली.

आजीने नातीला झाडू न सुपली दिली. 

नातीने आजीची पप्पी घेतली. आजी तू किनई मला खूप आवडतेस म्हणत सुपली नं झाडू घेऊन बाहेर पडली.

आकाशाच्या मैदानात कितीक चांदण्या लुकलुकत होत्या. नात झाडू घेऊन चांदुकल्या गोळा करू लागली. तिची इवलीशी कंबर त्या कामाने अगदी भरून आली, तरी ती चांदुकल्या गोळा करतच होती..करतच होती.

नातीनं साऱ्या चांदुकल्या गोळ्या केल्या.

सुपलीभर चांदण्या

नुसता झमझमाट, लखलखाट न् चमचमाट

नातीचे डोळे दिपले खरे..

पण एकच चांदुकली चमचमताना पाहून मिळतो न्

तसा शीतल प्रकाश, ते गारेगार सुख काही मिळेना.

नात परत हिरमुसली. गाल फुगवून बसली. आजीने तिला जवळ घेतली.

तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली,

"नाती गं नाती

माझं आपलं जुनं खोड.

पण मर्म सांगते तुस थोर.

सुखाचंही असंच असतं बघ. एकत्र मिळालं, सतत मिळालं तर त्याची मजा नाही, पण नित्याच्या रहाटगाडग्यात, दु:खाच्या अंधारात सुखाची एखादी तिरीप गवसली नं, की तनमन कसं सुखावतं! जगण्याची उमेद मिळते. आयुष्याला कोवळे धुमारे फुटतात नि ईश्वराच्या अस्तित्वाची पुन्हा एकदा भोळ्या जीवाला खात्री पटते." आजी बराच वेळ नातीच्या पाठीवरनं हात फिरवत राहिली.

आजीची शिकवण नातीच्या अंतरात पाझरत गेली. नातीनं काय केलं!

तिनं सुपलीतल्या चांदण्या आभाळभर विखुरल्या.

चांदुकल्या आपापल्या जागेवर जाऊन स्थिरावल्या. त्यांना पुन्हा आपलंआपलं स्थान मिळाल्याने त्या खूश झाल्या..लुकलुकु लागल्या, चमचमू लागल्या.

आभाळातला चांदोमामा आजीच्या नातीच्या समंजसपणाकडे पाहून मंद हसला.


गीता गरुड