ही दोस्ती तुटायची नाय!

Story: छान छान गोष्ट |
09th March, 10:55 pm
ही दोस्ती तुटायची नाय!

संजू प्रथमच आजीकडे रहायला आला होता. आजीचं घर एका डोंगरीवर होतं. आजूबाजूला फणस, पोफळी, आंब्याची झाडं होती. इकडे आल्यापासनं तो आईच्या आठवणीने व्याकूळ झाला होता. आजीकडे जायचंय म्हणून हट्ट करणारा संजू, आता आजी मला आईकडे सोड म्हणून मागे लागला होता. संजूच्या या वागण्याने बिचारी आजी अस्वस्थ झाली होती.

आजीच्या घरापासनं काही अंतरावर रस्त्याचं काम सुरू होतं. रस्त्याच्या कामाला येणाऱ्या बाया आजीकडे पाणी मागायला येत. आजी त्यांना कळशी भरून पाणी देई. गुळाचा खडा देई. त्यांतली एखादी पोरकरीन आपल्या लेकराला दुधाशी घेऊन तिथेच लवंडे. आजी त्यांना केळीच्या घडावरली पिक्की केळी, अढीतले आंबे खायला देई.

संजू आजीला म्हणाला, "आजी, हे आंबे, केळी तू त्यांना विकू शकली असतीस. तुला पैसे मिळाले असते." आजी म्हणाली, "संजूबाळा, सगळ्या गोष्टींत नफ्यातोट्याचं गणित मांडायचं नसतं. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं ज्यांच्याकडे नाही त्यांना जरूर द्यावं."

दुपारची उन्हं निवळली होती. मांडवावरच्या माडाच्या झावळ्यांची छान नक्षी खळ्यात पडली होती. संजू आपल्या नव्याकोऱ्या गाड्या घेऊन तिथे खेळत होता. रस्तेकामगारांची दोन संजूएवढाली मुलं संजूकडे आशाळभूत नजरेने बघू लागली. आजीने त्या मुलांना खाण्यासाठी चुरमुऱ्याचे लाडू दिले पण ते त्यांनी असेच हातात धरून ठेवले. संजूच्या गाड्या खळ्यात दिमाखात फिरत होत्या. संजू भूमsssभूमss असा आवाज काढत होता. ती पोरं नाकातनं गळणारा शेंबूड वर ओढीत संजूच्या लाल, पिवळ्या, काळ्या गाड्यांकडे एकटक पहात होती.

आजी म्हणाली,"संजू, या मुलांनाही खेळूदे तुझ्या गाड्यांनी." संजूला नाही आवडलं आजीचं बोलणं. त्याने नाईलाजानेच दोन गाड्या त्या मुलांच्या दिशेने केल्या. मुलांचे डोळे लुकलुकले. त्यांनी गाड्यांना स्पर्श केला. गाड्या मागे ओढून सोडू लागले. पळणाऱ्या गाड्यांसोबत आपणही पळू लागले. संजूही त्यांच्या सहवासात रमला.

तिघांनी गाड्यांची शर्यत लावली. पाचेक वाजता ती मुलं गेली. आता संजू रोजच त्या मुलांची वाट पाहू लागला.ती मुलं त्याला विटीदांडू, खांब खांब खांबोडी असे विविध खेळ शिकवू लागली. संजू त्यांच्यासोबत गोलांट्या उड्या मारायला शिकला. थोड्याच दिवसांत संजूची त्या मुलांशी छान दोस्ती झाली.

एकदा आजीच्या सांगण्यावरून गड्याला घेऊन संजू आपल्या दोस्तांसोबत शेतावरल्या लहानग्या डोहावर गेला. संजूच्या दोस्तांनी डोहाच्या पाण्यात उड्या मारल्या व मस्त डुंबू लागली. संजूला गड्याने मागून ढकललं. संजू पाण्यात बुडू लागला तसं गड्याने त्याच्या पोटाखाली हात धरला व हातपाय मारायला सांगितलं. दोस्तांच्या आवाजाने संजूला धीर आला. तो हातपाय मारू लागला. चारेक दिवसांत तो आपल्या या दोस्तांसोबत पोहू लागला. पोहून झालं की दोस्त एखाद्या आंबुलीवर चढायचे. पिकलेले आंबे काढून तिघं मिळून ओरपू लागायची. आजूबाजूच्या घरांतली मुलंही त्यांच्यासोबत येऊ लागली. 

संध्याकाळी माळावर क्रिकेटचा डाव रंगू लागला नि खेळून दमलेला संजू भाकरी खाताखाताच निद्रादेवीच्या अधीन होऊ लागला. या दोस्तांमुळेच ब्लॉकमध्ये रहाणाऱ्या संजूला आबाधुबी, खांब खांब खांबोडी, लपाछपी, रंग रंग कोणता, डोंगराला आग लागली पळा पळा, डब्बा ऐसपेस, साखळी साखळी असे कितीक खेळ खेळता येऊ लागले. प्लास्टिकच्या गाड्या नि टिव्हीवरील कार्टूनपेक्षा कितीतरी पटीने त्याला हे मोकळ्या हवेतले, मातीतले खेळ आवडू लागले.

आईच्या आठवणीने व्याकूळ झालेला संजू आई आली तर होता कुठे! जांभळीवर चढून जांभळं झोडत होता. गड्याने  बोलवून आणलं.

"संजू, किती रे डाग या शर्टावर!" आई कौतुकाने रागे भरली तसा संजू आईला बिलगला. त्याची दोस्तमंडळी दुरूनच संजूच्या आईला बघत होती. संजूच्या आईने त्यांना जवळ बोलावलं. आणलेल्या मिठाईतला एकेक तुकडा त्यांच्या हातावर ठेवला. त्यांच्या शाळेची, निवासाची चौकशी केली.

दुसऱ्या दिवशी संजू जाणार म्हणून दोस्त हिरमुसले. सकाळी एसटीस्टँडवर त्याला निरोप द्यायला आले. एकाने संजूला मोरपीस दिलं तर दुसऱ्यानं काजूबिया दिल्या. रस्तेकामगारांच्या मुलांकडं देण्यासारखं काहीच नव्हतं, ती मान खाली घालत म्हणाली,"आमी संजूसाठी कायबी आनलं न्हाई."

संजूने त्या दोघांच्या  खांद्यांवर हात ठेवला व म्हणाला, "तुम्ही दोघांनी तर मला खूप भारी आठवणी दिल्यात. तुमच्यामुळे मी पोहायला शिकलो, विटीदांडू, लगोरी, खांबखांब खेळायला शिकलो. मी पुढच्या सुट्टीत नक्की येणार आजीकडे. तुम्ही मग आमच्याकडे रहायलाच या काही दिवस. चालेल ना आजी!"

"हो रे माझ्या राजा, मी तुम्हा सर्वांना गोडधोड करून खायला घालीन. तुमची दोस्ती अशीच बहरु दे." असं म्हणत आजीने संजूचा गालगुच्चा घेतला.

गाडी सुरू झाली. संजू मान वळवून आजीला व आपल्या दोस्तांना पहात होता, हात हलवून त्यांचा निरोप घेत होता.


गीता गरुड