मोपाचा दाबोळीला फटका; विमानतळावरील प्रवाशांची संख्या घटली!

संचालकांकडून स्पष्ट; येत्या हंगामात विमानतळ कार्यान्वित राहण्याची हमी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th February, 04:29 pm
मोपाचा दाबोळीला फटका; विमानतळावरील प्रवाशांची संख्या घटली!

पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. ८.४ दशलक्षवरून हा आकडा ७ दशलक्षापर्यंत खाली आल्याचे विमानतळाचे संचालक डी. राव यांनी बुधवारी स्पष्ट केले. येत्या हंगामात दाबोळी विमानतळ कार्यान्वित राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२०२२-२३ मध्ये दाबोळी विमानतळावरून ८.४ दशलक्ष प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतलेला होता. पण, २०२३-२४ मध्ये ही संख्या घटून ७ दशलक्षापर्यंत आलेली आहे. येत्या हंगामातही विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहील. या हंगामात दाबोळीवरील प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून दाबोळी विमानतळ बंद पडण्याच्या अफवा वारंवार उठत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, व्हेन्झी व्हिएगस विधानसभा आणि विधानसभेबाहेरही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मोपा ​विमानतळ सुरू झाल्यापासून विविध विमान कंपन्या आपली कार्यालये दाबोळीतून मोपात स्थलांतरित करीत आहेत. त्यामुळे दाबोळीवर येणाऱ्या विमानांची संख्या घटून विमानतळ बंद पडण्याची शक्यता आहे. दाबोळी विमानतळ बंद पडल्यास त्याचा दक्षिण गोव्यातील टॅक्सी मालक, प्रवासी तसेच व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे. पण, राज्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने गोव्याला मोपासह दाबोळी विमानतळाचीही नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळ अजिबात बंद पडणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय विमानोड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही दाबोळी विमानतळ यापुढेही कार्यान्वित राहील, अशी हमी दिलेली आहे. परंतु, द​क्षिण गोव्यातील जनतेत याबाबतची भीती अद्यापही कायम आहे.

कतार एअरवेजचा मोपात जाण्याचा निर्णय वैयक्तिक

कतार एअरवेजने आपले कार्यालय दाबोळीतून मोपात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी आमदार दाबोळी विमानतळाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. परंतु, दाबोळीतून मोपात जाण्याचा कतार एअरवेजचा निर्णय वैयक्तिक आहे, असेही संचालक डी. राव यांनी स्पष्ट केले.