पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव
म्हापसा : बंदीरवाडा शापोरा व बादेमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाणी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे रहिवाशांनी म्हापसा येथील पाणी पुरवठा विभागावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंदीरवाडा व बादेमध्ये पाण्याची समस्या आहे. दरवेळी लोकांनी पाणी पुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर पाणी पुरवठा काही दिवसांसाठी सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा तोच प्रकार होत असल्याचा दावा करत या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मागील महिनाभरापासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे लोकांची मोठी पंचाईत होते. वर्षानुवर्षे ही समस्या असूनही यावर साबांखाकडून उपाययोजना शून्य असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, येत्या काही दिवसांत हा पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन सहाय्यक अभियंता रणधीर अस्टेकर यांनी यावेळी दिले.
पार्वती नागवेकर म्हणाल्या, पाणीपुरवठा विभागाचे पर्यवेक्षक आणि ऑपरेटर पाणी अन्यत्र वळवतात. यामुळेच आम्हाला पाणी मिळत नाही. पाणी पुरवठा टँकरही वेळेत उपलब्ध होत नाही. खासगी टँकरद्वारे लोकांची तहान भागवण्याचा प्रयत्न केल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींकडून यात अडथळा आणला जातो, असा आरोपही त्यांनी केला.
आमच्या भागात होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यास जलवाहिनींना गळती लागली आहे, अशा प्रकारची थातुरमातुर उत्तरे दिली जातात. मात्र, पाण्याअभावी लोकांची गैरसोय होते, याकडे कोणीच लक्ष देत नाही. लोक किती दिवस पाणी साठवून ठेवणार, असा सवाल नीलेश गोवेकर यांनी उपस्थित केला.
हा पाणी टंचाईचा प्रश्न आजचा नाही. कित्येक वर्षांपासूनची ही समस्या आहे. याचा जाब विचारण्यासाठीच आम्ही साबांखा कार्यालयात आलो होतो. दरवेळी फक्त उडवाउडवीचे उत्तरेच मिळतात. येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळाले, असे ज्ञानेश्वर पेडणेकर यांनी सांगितले.