म्हापसा : तिस्क जंक्शन (बाजार) सुकूर पर्वरी येथे महामार्गावर चालत्या कारमधून बियरच्या रिकाम्या बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी शंकरलाल राधेश्याम खतिक (३२, जयपूर राजस्थान) या पर्यटकाला अटक केली.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली. राजस्थानमधील चार जण गोव्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांनी जीए ०७ टी ०२०७ क्रमांकाची रेंट अ कॅब कार भाड्याने घेतली होती. ही कार घेऊन चारही पर्यटक म्हापसा ते पणजीच्या दिशेने जात होते. गाडीमध्ये त्यातील काहीजण बियर पीत होते आणि पिऊन रिकामी झालेली बाटली महामार्गावर फेकत सुटले होते.
संशयिताने तिस्क- सुकूर जंक्शनवर रिकामी बियरची बाटली रस्त्यावर फेकली. हा प्रकार सदर कारच्या मागे असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. संशयित आरोपी वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवर बसला होता.
पोलिसांनी तत्काळ सदर कार पकडली व संशयितासमवेत कार पर्वरी पोलीस स्थानकावर नेली. तिथे संशयित शंकरलाल खतिक याच्यावर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बियरची बाटली टाकून उपद्रव केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तसेच कारही पोलिसांनी जप्त केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.