हजार मिनारांचं शहर : कैरो

Story: प्रवास |
24th February, 10:20 pm
हजार मिनारांचं शहर : कैरो

कैरो, इजिप्तची गजबजलेली राजधानी. नाईल नदीच्या काठावर वसलेली ही नगरी पाहायला आम्ही लक्सरवरून निघालो होतो. रात्रीचा ट्रेनचा प्रवास करून आम्ही स्टेशनवर पोहोचलो ते थेट पिरॅमिड पाहायला गेलो. ट्रेन बाबत आवर्जून सांगेन की, प्रवाश्यांनी एकदम निश्चिंतपणे इथे ट्रेनमधून प्रवास करावा. त्यासाठी खास टुरिस्ट ट्रेन्स लक्सर-अस्वान-कैरो अश्या फिरत असतात. एकदम सुरक्षित नि आरामशीर प्रवास. इथे प्रत्येकाला (दोघादोघांना) वेगळे कॅबिन मिळतात. दोन कॅबिन्समध्ये एक दार असतं. ते उघडलं तर चारजणं एकत्र बसून जाऊ शकतात. रात्रीच्या प्रवाशांसाठी अंथरूण, पांघरूण नि जेवणही दिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर सोय भारतीय रेल्वेमधल्या फर्स्ट क्लासची आणि पैसेही कमी. 

तर कैरो हे कितीतरी सहस्र वर्षांचा इतिहास लाभलेलं खास करून पिरॅमिडसाठीच प्रसिद्ध असलेलं शहर. इथल्या क्षितिजावर विसावलेल्या असंख्य मशिदींमुळे ह्याला 'हजार मिनारांचं शहर' म्हणूनही संबोधलं जातं. त्याच्या समृद्ध इतिहासात प्राचीन इजिप्शियन ते ग्रीक, रोमन, बायझेंटाईन्स आणि अरबांपर्यंत असंख्य संस्कृतींचा उदय आणि पतन समाविष्ट आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शहराच्या लँडस्केप आणि संस्कृतीवर आपली अवीट छाप सोडली आहे. 

आधुनिक इजिप्तच्या सत्तेचं केंद्र बनण्यापूर्वी कैरोने फातिमिड, अय्युबिड्स आणि मामलुकांसह विविध इजिप्शियन राजवंशांची राजधानी म्हणून काम केलंय. आज, कैरो हे जगातलं टुरिझमच्या दृष्टिकोनातून एक मुख्य केंद्र बनलं आहे, जिथे गिझा आणि स्फिंक्सच्या अस्तित्वाने एक पुरातन छाप सोडली आहे, तिथेच आधुनिक गगनचुंबी इमारती आणि गजबजलेल्या बाजारांनी अगदी विरुद्ध असं आपलं स्थान मिळवलं आहे. मॉडर्न टुरिझम जरी इथे नसलं तरी आधुनिक सुखसोयी सहज उपलब्ध आहेत. 


आमच्या प्रवासाची सुरुवात गिझाच्या पिरॅमिडना भेट देऊन झाली. या प्रचंड वास्तूंसमोर उभं राहून, आम्ही प्राचीन इजिप्शियन लोकांच्या वास्तूकलेचं तेज पाहून धन्य झालो. इतिहासात घेऊन जाणारा हा नजारा प्रत्येकाने एकदा तरी पहावा. गिझाच्या ह्या विशाल कायेला पाहत इतिहासात वावरताना, तिथल्या पायऱ्या चढण्याचा मोह अनावर झाला ह्यात नवल नाही. पण काहीच पायऱ्या चढून दमछाक झाली आणि ह्या इमारतीच्या बांधकामात गेलेले श्रम आणि कल्पकतेची दाद देत देत आम्ही वर्तमानात परत आलो. 

गिझाच्या पिरॅमिडमध्ये आतपर्यंत जायची अनुमती आहे. पण आम्ही निघण्या अगोदर अभ्यास करताना ह्या विषयावर अनेक व्हिडिओज पाहिले होते. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच आवर्जून सांगितलं गेलं होतं की हा अनुभव टाळलेलाच बरा. त्यात आम्ही दोन वर्षांच्या अद्वैतला घेऊन हा प्रवास करत असल्याने मग तो विषय पूर्णपणे मनातून काढून टाकला आणि ह्या विशाल कबरी (कारण पिरॅमिड ह्या खऱ्या तर कबरीच, नाही का?) आत जाऊन पाहण्याचं टाळलं.

इथे पिरॅमिड कॉम्प्लेक्समध्ये उंटाची सवारी आणि घोडागाडीत फिरण्याखेरीज करण्यासारखं काहीच नाही. दूरदूर पर्यंत वाळवंट. तुमचे फोटो काढून देण्यासाठी उत्सुक असे फोटोग्राफर्स आणि तुम्हाला चुना लावायला तयार असे सौविनिरचे विक्रेते. ह्यांच्या वस्तूंना ते स्वतःहून तुम्हाला हात लावायला भाग पाडून, तुम्ही ती हातात घेतली की ती विकत घ्यायला गळ घालणारे ठक इथे सदैव उपस्थित असतात आणि कितीही प्रयत्न केले तरी ते पाठ सोडत नाहीत. त्यांच्या पासून सांभाळून राहणं ही एक कलाच आहे. डोकं मात्र पार चक्रावलं. कसेबसे आम्ही त्या गर्दीतून परत आमच्या व्हॅनमध्ये परतलो. 

आमच्या आतापर्यंतच्या अनुभवला गालबोट लागल्यागत वाटलं. हॉटेलवर परतत असताना मनात विचार आला, 'लक्सर, ज्याबद्दल अजिबात अपेक्षा केली नव्हती, ते इतका अविस्मरणीय ठसा सोडून गेलं? नि कैरो, जे पाहण्यासाठी आतुरतेने वाट पहिली होती, कितीतरी वर्षं आस लावली होती, त्याने मात्र निराश केलं.' अतुलनीय ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक समृद्धीमुळे हे शहर प्रवाश्यांना आपल्याकडे खेचतं हे मात्र खरं. 

क्रमशः


भक्ती सरदेसाई