इंग्लंडला आकाश दीप नडला; भारतासमोर ज्यो रूट अडला!

इंग्लिश संघ ७ बाद ३०२ धावा : डाव सावरण्यात यजमानांना यश

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd February, 11:48 pm
इंग्लंडला आकाश दीप नडला; भारतासमोर ज्यो रूट अडला!

रांची : चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३०२ धावा आहे. ज्यो रूट १०६ धावा करून नाबाद परतला. तर, ओली रॉबिन्सन ३१ धावा करून क्रीजवर आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतरही इंग्लिश फलंदाज पॅव्हेलियनकडे लवकर परतत राहिले.

रूटचे शतक, इतरांकडून निराशा

इंग्लंडचे टॉप ३ फलंदाज ५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर जॉनी बेअरस्टोने काही चांगले फटके नक्कीच मारले, पण रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर तो बाद झाला. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. पण ज्यो रूटने आपली भूमिका घट्ट पकडली. बेन फॉक्सशिवाय रूटने खालच्या फळीतील फलंदाजांसह उपयुक्त भागीदारी करत संघाची धावसंख्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेली.

इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने ४२ धावा केल्या. त्याचवेळी, बेन डकेट ११ धावा करून बाद झाला. ओली पोप आपले खाते उघडू शकला नाही. तर जॉनी बेअरस्टोने ३८ धावा केल्या. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स ३ धावा करून रवींद्र जडेजाचा बळी ठरला. बेन फॉक्सने ४७ धावांची चांगली खेळी केली. टॉम हार्टलीने १३ धावा केल्या.

कसोटी पदार्पणातच आकाशची चमक

आकाश दीपने पदार्पणाच्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी केली. आकाश दीपने इंग्लंडच्या टॉप ३ फलंदाजांना आपला बळी बनवले. मोहम्मद सिराजला २ बळी मिळाले. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १ यश मिळाले. तर, कुलदीप यादव विकेट घेण्यात अपयशी ठरला.