संस्कृत भाषा प्रचारक सुनीता फडणीस

सुनीताताई या बऱ्याच उशीरा संस्कृत शिकल्या, नंतर प्रशिक्षण घेतले. संस्कृतमधून एम.ए. केले. आता हीच संस्कृत भाषा त्यांची ओळख बनली आहे. सुनीताताई, तू चाल पुढं.

Story: तू चाल पुढं |
23rd February, 10:19 pm
संस्कृत भाषा प्रचारक सुनीता फडणीस

जगात अनेक प्रचलित भाषा असल्या तरी संस्कृत भाषेला सर्वात प्राचीन आणि देवदेवतांची भाषा म्हणून संबोधले जाते. कारण ही भाषा व्यापक असून अनेक वेद, उपनिषदे, वेदांग याच भाषेतून लिहिली गेली आहेत. संस्कृत भाषा आज फारशी प्रचलित नसली तरी तिचा रोजच्या व्यवहारात वापर करणाऱ्या आणि या भाषेचा प्रचार करणार्‍या फारच थोड्या व्यक्ती आहेत, पर्वरी येथील सुनीता फडणीस या गृहिणी त्यापैकी एक आहेत. संस्कृत भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संस्कृतभारती संस्थेतर्फे संभाषण वर्ग विनामूल्य घेत आहेत.

एम.कॉम. आणि संस्कृत भाषेतून एम.ए.ची पदवी प्राप्त केलेल्या सुनीता फडणीस यांची एकत्र कुटुंबात वाढ झाल्याने संस्कृत श्लोक, स्तोत्र पठण हे सतत कानावर पडल्यामुळे संस्कृत भाषेची ओळख त्यांना लहानपणापासूनच होती. योगायोगाने त्यांना 'संस्कृतभारती' या संस्थेच्या माध्यमातून संस्कृत शिकण्याची संधी उपलब्ध झाली आणि अल्पावधितच त्या संस्कृत अस्खलित बोलायला शिकल्या.


रोजच्या व्यवहारातील संस्कृतची सोपी बोली भाषा संस्कृतभारती संस्थेच्या संभाषण वर्ग, शिबिरांतून शिकवली जाते. सध्याच्या काळात भवितव्याच्या व्यावहारिक दृष्टीने संस्कृतचा लाभ होत नाही त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांकरता संस्कृत भाषा केवळ गुणांपुरती मर्यादित राहिली आहे, असे दुर्देवाने म्हणावे लागते. असे असले तरी त्यातूनही काही विद्यार्थी संस्कृतमध्ये उच्च शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवताना दिसतात हे निश्चितच समाधानकारक असल्यामुळे या भाषेचा जास्तीत जास्त प्रचार करून ही भाषा संवर्धित करण्यासाठी सुनीताताई अगदी तन, मन, धन अर्पित करून झटत आहेत. संस्कृत भाषेतील श्लोक, स्तोत्र, मंत्र, वेद आणि असंख्य पौराणिक साहित्यग्रंथ यांचे महत्त्व आजच्या युगातही अबाधित आहे आणि पुढेही राहील कारण त्यामागे शास्त्र आहे. श्लोक, मंत्र, स्तोत्र उच्चारणाने आपल्या शरिरात विशिष्ट स्पंदने निर्माण होऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, मानसिक बळ मिळते म्हणूनच आजही घराघरात, मंदिरात श्लोक, स्तोत्र, मंत्रांचे नित्य पठण होते. त्यामुळे ही भाषा आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सुनीताताई सांगतात.

संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी आणि उजळणी वर्ग घेण्यासाठी सुनीताताईंना त्यांचे पती नितिन फडणीस आणि दोन्ही मुलांचे उत्तम सहकार्य लाभले. त्यांचे पती याच संस्थेच्या माध्यमातून संस्कृत ज्ञानदानाचे कार्य करत होते. संस्कृत भाषेचा प्रचार करण्याकरता शाळांना संपर्क, सार्वजनिक ठिकाणी पत्रके वाटणे, गृहसंपर्क, वर्तमानपत्रांतून जाहिरात-लेख, पुस्तक प्रदर्शन यांची मदत घेण्यात आली. अनेक संस्कृत व्याख्यानांचे आयोजन सुनीताताईंनी केले. गोवा दूरदर्शन वरील 'तुमची आमची संस्कृत' या मालिकेकरता लेखन करून संयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संस्कृतमधून अनेक बडबडगीते, बालगीते, कविता त्यांनी लिहिल्या. सामाजिक स्तरावर संपूर्णपणे संस्कृत भाषेतून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्या संस्कृतमधून कीर्तनही करतात. त्यांचे कीर्तनाचे अनेक कार्यक्रमही झाले आहेत. एका दैनिकाच्या कॉफी टेबल बुकमध्ये २०१७ साली त्यांच्या या कार्याची दाखल घेण्यात आली आणि गेल्या वर्षी रोटरी क्लबने त्यांच्या कार्याची दाखल घेत त्यांच्या कार्याचा सन्मान केला.


कविता प्रणीत आमोणकर