गर्भावस्था या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यादरम्यान महिलांच्या शरीरात जे त्रासदायक बदल होतात, त्यापैकी एक म्हणजे शरीरावर येणारे स्ट्रेच मार्क्स. स्ट्रेच मार्क्स गर्भावस्थेदरम्यान होणारे अगदी सामान्य शारीरिक बदल आहेत ज्यांना वैद्यकीय भाषेत स्ट्राय ग्रॅव्हिडारम म्हणतात.
गर्भावस्थेदरम्यान कॉर्टिसोल या हार्मोनचा जास्त प्रमाणात स्राव होतो व वाढणाऱ्या गर्भाला सामावून घेण्यासाठी त्वचा ताणली जाते. आपली त्वचा कोलेजन आणि इलास्टिनपासून बनलेली असते. त्यामुळे वजन वाढल्याने त्वचा ताणली जाते. त्वचा ताणल्यानंतर तिला मूळ आकारात परत येण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्वचा सैल होते व त्यावर स्ट्रेच मार्क्सचे चट्टे दिसून येतात. स्ट्रेच मार्क्स मांड्यांपासून अंडरआर्म्सपर्यंत कुठेही दिसून येऊ शकतात. सर्वाधिक स्ट्रेचमार्क्स हे पोट, कमर, छाती, काखेत व जांघेच्या वर दिसून येतात.
स्ट्रेच मार्क्स किती तीव्रतेने दिसून येऊ शकतात हे गर्भवती महिलेच्या त्वचेवर व अनुवांशिकतेवर अवलंबून असते. तसेच गर्भाचा आकार मोठा असल्यास, जुळे गर्भ असल्यास किंवा गर्भाच्या आजूबाजूला पाणी जास्त असल्यास त्वचेवर जास्त ताण येतो व जास्त स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. त्याबरोबरच फक्त जास्त वजन असलेल्या गर्भवती महिलांनाच स्ट्रेच मार्क्स येतात असे नसते. कमी बीएमआय असलेल्या महिलांना देखील स्ट्रेच मार्क्स येतात.
स्ट्रेच मार्क्सचा रंग वेळेसोबत बदलतो. जितके मोठे स्ट्रेच मार्क्स असतील तितके ते नंतर हलके दिसतात. सुरुवातीला ते लाल आणि जांभळ्या रंगाचे दिसतात व नंतर फिकट गुलाबी होतात. हल्ली बाजारात स्ट्रेच मार्क कमी करणारे अनेक क्रिम्स व तेल येतात. यांच्या वापराने त्या भागावरील त्वचा हायड्रेटेड राहते व स्ट्रेच मार्क्सचे चट्टे थोडेफार कमी दिसतात व ती जलद बरी होण्यास मदत होते. पण खरं तर या प्रसाधनांचा निकाल पूर्णपणे दिसत नाही कारण एवढ्या सहजपणे स्ट्रेच मार्क्स जात नाही. त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे काढण्यासाठी लेझर थेरपी, ओझोन थेरपी, मायक्रोडर्मा अब्रेशन यासारख्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत.
स्ट्रेच मार्क्स होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी त्वचेची योग्यरित्या काळजी घ्यावी. लवचिकता आणि टर्गर चांगला राखण्यासाठी त्वचेवर व्हिटॅमिन युक्त मॉइश्चरायझर, तेल, लोशन किंवा हायड्रेटींग साधनांचा वापर करावा. अगदी स्ट्रेच मार्क्स तयार होण्यास सुरुवात होण्याआधीच त्वचेवर यांचा वापर चालू केल्याने बऱ्याच प्रमाणात स्ट्रेच मार्क्स कमी राहू शकतात. नियमित स्वरूपात एक्सफोलिएशन केल्यामुळे डेड त्वचा निघून जाऊन त्वचेचे पुनरुत्पादन सुधारू शकते.
आहारात काही बदल आणल्याने, चांगला आणि उच्च प्रथिनयुक्त आहार घेतल्याने स्ट्रेच मार्क्स कमी तीव्रतेत येऊ शकतात. यासाठी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स असलेले अन्न खावे व हायड्रेटेड रहावे. आपल्या आहारात टोमॅटो, बेरी, हाडांचा रस्सा, अंडी यासारख्या पदार्थांचा समावेश केल्याने कोलेजनच्या निर्मिती वाढू शकते. पण जड, तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ असलेला आहार घेतल्याने वजन वाढून, स्ट्रेच मार्क्स अधिक होऊ शकतात. चांगला सात्विक आणि पौष्टिक आहार घेऊन आपले वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीराचा वाढता ताण हाताळण्यासाठी व त्वचा जास्त ताणून स्ट्रेच मार्क्स येऊ नये म्हणून पोटाला आधार देणारा पट्ट्याचा वापर केला जाऊ शकतो. पण यासाठी वैद्यकीय सल्ला मात्र जरूर घ्यावा. गर्भधारणेच्या सहा आठवड्यानंतर व डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम सुरू करण्याचा प्रयत्न करावा. व्यायामामुळे चरबी कमी होण्यास मदत होते, त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते. स्नायूचे व त्वचेचे टर्गर चांगले होते.
बाळाला वेळेवर स्तनपान करत रहा. स्तनपानामुळे बाळाचे पोषण होते आणि आईचे वजन कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स कमी दिसतात. त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन वाढवण्यासाठी बाजारात अनेक स्किन फर्मिंग प्रसाधने उपलब्ध असतात. कोलेजन, व्हिटॅमिन सी आणि रेटिनॉइड्स त्वचेचा निळसरपणा कमी करू शकतात. आपल्या त्वचेवर कोणती प्रसाधने उपयुक्त ठरतील हे तपासूनच मग वापरात आणा.
आधीपासूनच योग्य काळजी घेतली तर स्ट्रेच मार्क्स होण्याचे प्रमाण तसेच झाल्यानंतर ते ठळकपणे दिसून येण्याचे बऱ्याचशा प्रमाणात आटोक्यात नक्कीच ठेवले जाऊ शकते.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर