अनुष्का-विराट बनले पुन्हा आई-वडील; घरी छोट्या पाहुण्याचे आगमन!

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20th February, 10:04 pm
अनुष्का-विराट बनले पुन्हा आई-वडील; घरी छोट्या पाहुण्याचे आगमन!

लंडन : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. या दोघांच्या घरी मुलगा जन्माला आला आहे. मुलाचे नाव ‘अकाय’ आहे. स्वत: कोहलीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. कोहलीने मंगळवारी सांगितले की, ‘अकाय’चा जन्म १५ फेब्रुवारीला झाला. कोहली आणि अनुष्का दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. दोघांना एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे. वामिकाचा जन्म २०२१ मध्ये झाला.

कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आम्हाला सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारीला आम्ही आमच्या मुलाचे आणि वामिकाच्या लहान भावाचे या जगात स्वागत केले! आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो.प्रेम आणि कृतज्ञता. विराट आणि अनुष्काचे ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते.


कोहलीच्या पोस्टवर अभिनंदनाचा पूर

क्रिकेटपटूंपासून ते सेलिब्रिटींपर्यंत चाहते या स्टार कपलचे अभिनंदन करत आहेत. माजी फिरकीपटू हरभजन सिंगने लिहिले, 'अभिनंदन.' माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने हृदयाच्या इमोजीसह टिप्पणी केली, "विराटचे अनेक अभिनंदन." राशिद खान आणि युझवेंद्र चहल यांनीही त्यांच्या शुभेच्छा दिल्या. कॉमेडियन कपिल शर्माने लिहिले, 'अभिनंदन पाजी, देव तुम्हाला नेहमी आनंद आणि आरोग्य देवो.'