कुर्टी येथील नाल्यात घातक रसायनामुळे शेती पडीक

रसायन सोडणाऱ्या कारखान्याविरुद्ध कारवाई करण्यात अपयश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th February, 12:07 am
कुर्टी येथील नाल्यात घातक रसायनामुळे शेती पडीक

फोंडा : कुर्टी येथील नाल्यात घातक रसायन सोडून पाण्यातील जीव नष्ट करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाल्यात घातक रसायन सोडले जात असल्याने बेतोडा ते बांदोडा पर्यंतची शेती पडीक ठेवण्यात आली आहे. परंतु घातक रसायन सोडणाऱ्या कारखान्याविरुद्ध कारवाई करण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

बेतोडा परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या बाहेर असलेल्या तीन कारखान्यांतून नाल्यात घातक रसायन सोडले जात असल्याचा संशय स्थानिक लोकांना आहे. स्थानिकांच्या अनेक तक्रारीमुळे बेतोडा पंचायतीने अनेकवेळा प्रदूषण मंडळाकडे संयुक्तपणे पाहणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. पण अजूनपर्यंत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करण्यात सहमती दिली नाही. उलट प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दि. २२ जून, ७ जुलै व १२ जुलै रोजी नाल्याची पाहणी केल्याची माहिती पंचायत कार्यलयात उपलब्ध झाली आहे. बेतोडा औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने असले तरी त्यात घातक रसायन वापरणारे कारखाने नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. कारण औद्योगिक वसाहतीच्या बाहेर असलेल्या कारखान्याकडून घातक रसायने सोडली जात असल्याचा संशय स्थानिक लोकांना असल्याने त्यासाठी संयुक्तपणे पाहणी कारण्याची मागणी लोक करीत आहेत.

नाल्यात घातक रसायन सोडल्यानंतर अनेक लोक तक्रारी पंचायत कार्यालयात करतात. त्यामुळे अनेकवेळा प्रदूषण मंडळाला पत्र पाठवून संयुक्त पाहणी करण्याची मागणी करण्यात आली. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे बेतोडा सरपंच  मधू खांडेपारकर यांनी सांगितले. 

नाला दूषित होत असल्याने गेल्या १४ वर्षांपासून स्थानिक बागायतदार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करीत आहेत. पण अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. त्याचा परिणाम कारखान्याकडून वारंवार नाल्यात घातक रसायन सोडले जाते. त्यामुळे जलप्राणी मारून जात असल्याच्या घटना घडत आहेत, असे कुर्टी सरपंचहरीश नाईक यांनी सांगितले. 

कृषीमंत्र्यांकडून कारवाईची मागणी

नागझर कुर्टी येथे छट पूजा साजरी करीत असताना नाल्यातून मोठ्या प्रमाणात घातक रसायन सोडल्याचे आढळून आले होते. त्यावेळी कार्यक्रमात हजर असलेल्या कृषी मंत्री रवी नाईक यांनी बेतोडा येथील नाल्यात घातक रसायन सोडणाऱ्या कारखान्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.