भाजपला ‘अच्छे दिन’ ?

देशातील एकूण वातावरण लक्षात घेऊन भाजपशी सख्य करायचे अकाली दलाच्या मनात आले आहे. आंध्र प्रदेशात तेलगू देशम आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांना भाजपची ओढ लागली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोक दलाने भाजपशी जागावाटप करण्यासाठी संपर्क साधला आहे.

Story: संपादकीय |
11th February, 10:25 pm
भाजपला ‘अच्छे दिन’ ?

देशातील जनता ‘अच्छे दिन’ येण्याची प्रतीक्षा करीत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या भाषणात आपल्या कालावधीत देशातील २५ कोटी जनतेने दारिद्र्य रेषा ओलांडल्याची माहिती दिली. देशभरात लाखो लोकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यात आले असून भविष्यात दोन कोटी घरे बांधून देण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आणि त्यासाठी आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात तशी तरतूद केल्याचे सांगितले. भाजपच्या दहा वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय प्रगती झाल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे दशकातील सरकारची उपलब्धी जनतेसमोर मांडण्याचे भाजपने ठरविले आहे, असे दिसते. दुसरीकडे अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे राहिल्यामुळे देशात निर्माण झालेल्या राममय वातावरणाचा लाभ उठविण्याचे भाजपने ठरविले असल्यास नवल नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५२८ पासून सुरू असलेल्या लढ्याची समाप्ती श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेने झाल्याचे लोकसभेत नमूद करून हे सामाजिक ऐक्याचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. केंद्रात मोदी सरकार भरघोस मतांनी सत्तेवर यावे आणि त्याच कालावधीत अयोध्येतील तिढा सुटावा, हा योगायोग भाजपसाठी मोठा आधार ठरला आहे. मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर देशभरात जे प्रसन्न आणि भक्तीभावाचे वातावरण पसरले त्याचा लाभ भाजपला निश्चित होईल, अशाच घडामोडी नव्याने घडताना दिसतात. भाजपसाठी ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता वाढली आहे.

बिहारमधील विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतेपद भूषविणारे नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम केल्यावर, याचा परिणाम होणे अपेक्षित होतेच. दुसरीकडे आपला बहुमूल्य वेळ ‘भारत जोडो न्याय यात्रे’त घालविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला सारा पक्षच या यात्रेला जुंपल्याचे चित्र दिसले. राजधानीत राहून विविध नेत्यांशी संपर्क साधून आघाडीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्याचे सोडून काँग्रेसचे बहुतेक ज्येष्ठ नेते यात्रेत दंग असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीत समन्वय राहिलेला नसल्यामुळे काही पक्ष आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपशी सलगी करताना दिसतात. आम्ही जनसंघाच्या काळापासून प्रादेशिक पक्षांचे सहकार्य घेत आलो आहोत, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले असून, पंजाबमधील जुना सहकारी असलेल्या शिरोमणी अकाली दलाशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. १९९६ पासून भाजप आणि अकाली दलाची युती त्या राज्यात होती. शेतकरीविषयक तीन वादग्रस्त कायदे लागू करण्याच्या मुद्यावरून अकाली दलाचे मतभेद होऊन त्या पक्षाने भाजपशी नाते तोडले होते. प्रत्यक्षात २०२१ मध्ये हे तिन्ही कायदे रद्दबातल करण्यात आले, मात्र अकाली दलाने नंतर भाजपशी संपर्क साधला नव्हता. आंध्र प्रदेशात तेलगू देशम आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांना भाजपची ओढ लागली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोक दलाने भाजपशी जागावाटप करण्यासाठी संपर्क साधला आहे. या पक्षाने आतापर्यंत समाजवादी पक्षाशी सलोखा केला होता. याचाच अर्थ इंडिया आघाडीला धक्क्यावर धक्के बसत चालले आहेत, असे दिसत असतानाच भाजपप्रणीत एनडीए आघाडी मात्र अधिक सबळ बनत चालली आहे.

ज्येष्ठ नेते स्व. कर्पुरी ठाकूर आणि स्व. चरण सिंग यांना मोदी सरकारने ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च किताब जाहीर केल्यावर राजकीय स्थितीत लक्षणीय बदल झाल्याचे दिसते आहे. एका अर्थाने भाजपची राजकीय चाल यशस्वी होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ जाहीर करून मोदी सरकारने काँग्रेसमध्ये चलबिचल निर्माण केली आहे. गुलाम नबी आझाद सध्या काँग्रेस पक्षात नसले तरी त्यांनी राहुल गांधी यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य फारच बोलके आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजकारण हे राहुल गांधी यांचे क्षेत्र नाही, त्यांना देशातील जनमानसाच्या भावनांची जाण नाही. दुसरे नेते कमलनाथ यांच्याबाबत ते पक्षत्याग करीत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. राजकीय अस्थैर्य हा इंडिया आघाडीचा गुणविशेष ठरू पाहात असल्यामुळे जनता पुन्हा भाजपला सत्ता बहाल करण्याचा विचार करणे साहजिक आहे, त्यामुळे त्या पक्षाला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता वाढली आहे.