वंडरफूल दूध (भाग १)

Story: स्वस्थ रहा मस्त रहा |
10th February, 11:13 pm
वंडरफूल दूध (भाग १)

आज मी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थाची माहिती देणार आहे, ज्याच्या वेगवेगळ्या जाहिराती तुम्ही रोज बघता... आणि तो पदार्थ म्हणजे वंडरफूल दूध. तुमच्यापैकी काही जणांचे दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच मिल्क शेक, पेढे, बासुंदी फेव्हरेट आहेत, तर काही जण नुसतं दूध म्हटलं तरी नाक मुरडतात. दुधापासून बनवलेले सगळेच पदार्थ हेल्दी आहेत का? दूध कोणी प्यावं वगैरे इंटरेस्टिंग गोष्टी आपण आज समजून घेऊया. 

आयुर्वेदात ८ प्रकारच्या दुधाचे वर्णन आहे. जसे की गाईचे दूध, म्हशीचे दूध, बकरीचे दूध, उंटिणीचे दूध इ. यापैकी आपल्याला गाईचे व म्हशीचे दूध सहज उपलब्ध होते. त्याबद्दल आपण आयुर्वेद काय सांगतो ते आज बघुया. 

दूध पिण्याचे फायदे कोणते?

शरीराची रोगांशी लढण्याची शक्ती वाढते.

शरीराची ऊर्जा वाढते, थकवा नाहीसा होतो.

झीज भरून येते. 

गाईचं दूध बुद्धि, एकाग्रता वाढवते.  

गाईचं दूध गुणाने थंड आहे, गोड आहे, पचायला थोडे जड आहे आणि त्याहीपेक्षा म्हशीचे दूध पचायला जास्त कठीण आहे.

दूध कोणी प्यावे? 

लहान बाळापासून आजी-आजोबा पर्यंत सर्वांसाठी दूध उपयोगी आहे. पण ज्यांची पचन शक्ती उत्तम आहे, ज्यांना भूक खूप ला गते त्यांनीच दूध प्यावे. 

ज्यांची त्वचा, केस रूक्ष (ड्राय) आहेत, सुका खोकला ज्यांना येत असेल, पोट साफ होत नसेल (शी रोज होत नसेल), झोप लागत नसेल, ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी दूध खूप उपयोगी आहे. 

दूध कोणी पिऊ नये?

ज्यांच्या शरीरात कफ जास्त प्रमाणात आहे, जे खूप जाड आहेत, ज्यांना खूप झोप येते, आळस येतो, वारंवार कफ वाढून सर्दी - खोकला होतो, लाळ गळते, ज्यांना भूक लागत नाही, जीभेला चव नाही, ताप आला आहे त्यांनी दूध पिऊ नये. 

दूध कोणत्या ऋतूत प्यावे? 

शरद ऋतूत आणि ग्रीष्म ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात प्यावे. कारण दूध गुणाने थंड आहे.

कोणत्या ऋतूत पिऊ नये? 

वसंत ऋतूत - कारण या काळात शरीरात कफ दोष खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि दूध कफ वाढवणारे आहे. या ऋतूत दूध प्यायल्याने कफ वाढून होणारी सर्दी, त्वचेचे आजार, उलटी इ. होऊ त्रास होऊ शकतात.

वर्षा ऋतूत - कारण पावसाळ्यात पचन शक्ती कमी असते त्यामुळे पचायला जड असलेले दूध अपचन निर्माण करते.

आणि हं इथे वर्णन केलेले गाईचे दूध म्हणजे आपल्या देशी गाईचे दूध आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जर्सी हा प्राणी गाय नाहीये, त्यामुळे जर्सीचे दूध हे आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. देशी गाईचे किंवा म्हशीचे दूध मिळत नसेल तर जर्सीचे दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ अजिबात सेवन करू नये. 

देशी गाय आणि जर्सी कसं ओळखणार??? उत्तर शोधा हां...

दूधाविषयी अजून माहिती - दूध कसे प्यावे, दूधापासून बनवलेले कोणते पदार्थ चांगले आहेत इ. आपण पुढील भागात वाचूया. तोपर्यंत ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य