संकुचित मनोवृत्तीची फलनिष्पत्ती...

समाजरचनेच्या पिरॅमिडमध्ये ज्या काही मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव होतो त्यात धार्मिक स्वतंत्रता हा मुद्दा प्रकर्षाने वरच्या क्रमांकावर येतो. भारतासारख्या मूलतः हिंदुत्वाची विचारसरणी असलेल्या देशात तर हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. मात्र आजकाल धार्मिक द्वेष पेरणी इतकी प्रचंड होऊ लागली आहे की, आपण आपल्याच आराध्य, अनुकरणीय व्यक्तिमत्त्वांवर घसरतोय याचेही भान पिढीला राहिलेले नाही.

Story: विशेष |
10th February, 10:44 pm
संकुचित मनोवृत्तीची फलनिष्पत्ती...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इथल्या संस्कृतीला हवे तसे खेचण्याचा, वाकवण्याचा प्रयत्न चालू आहे. संविधानाने जनतेला दिलेले हे स्वातंत्र्याचं देणं हे कोणाच्या भावना दुखवण्यासाठी नसते हे आजकालची पिढी विसरत चाललेली की काय अशी शंका उत्पन्न होते. स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की आशा घटना घडतात हे वास्तव आहे. नुकताच पुणे विद्यापीठात घडलेला प्रकार तर कोणाही संवेदनशील मनाला टोचणी लावणारा आहे. पुणे विद्यापीठाला दिलेलं नाव हे कोण्या सामान्य स्त्रीचं नाही. ऐन ब्रिटिश काळात देशातल्या मुलींच्या शिक्षणासाठी अवघं आयुष्य वाहून घेतलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान समाजसुधारिकेचं नाव या विद्यापीठाला दिलं आहे.

विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात आयोजित एका नाटिकेत रामायणसंदर्भातील काही प्रसंग दार्शनिक होते. जे कोणी कलाकार होते त्यातल्या एकाने सीतामाईच्या तोंडी जे संवाद दिले ते सामान्यपणे ऐकण्याच्याही पलीकडे होते. एक अत्यंत किळसवाणा शब्द सीतेच्या मुखी देऊन नाटिकेच्या लेखकाने आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन मांडले. इतकेच नाही तर सीता चक्क सिगारेट पिऊन धुरांची वलये हवेत फेकत असल्याचा प्रकारही दाखवला गेला. कोणती मानसिकता हे सगळं करायला लावत असेल यांना ? एकदा रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेत श्रीरामांची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांनी सिगारेट ओढलेली रामानंद सागर यांनी पाहिली तेव्हा त्यांनी अरूणजींची कानउघडणी केली. त्या क्षणापासून अरुणजींनी आयुष्यभरासाठी सिगारेट ओढणे सोडून दिले हे त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले. सांगायचा मुद्दा हा की आपल्याकडे अगदी नाटकात काम करणाऱ्या कलाकारावरही त्यातल्या भूमिकांचा प्रत्यक्ष परिणाम पडलेला दिसून येतो. इथे तर थेट सर्वांसमोर बीभत्स दृश्य दाखविले गेले. वास्तविक ही मानसिकता कायमस्वरूपी ठेचायला हवी. तरच अद्दल घडेल.

भारताने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात तेवढ्याच राजेमहाराजांच्या कार्यपद्धतींचे सोहळे पाहिले आहेत. कोणी इथल्या संस्कृतीचा मारक ठरला तर कोणी तारक. अनेक विध्वंसक शक्तींनी इथे विखारी आघात केले मात्र तरीही आपलीच संस्कृती टिकून राहिली. जे आक्रामक होते त्यांच्या संस्कृतींचे पतन झाले हेही इतिहासाने आपल्याला दर्शवले आहे. श्री राम हे केवळ हिंदू समुदायाचे व्यक्तिमत्त्व आहे यापेक्षाही ते एका सुसंस्कारित समाजव्यवस्थेचे रूप आहे हे इथल्या सगळ्याच जातीधर्माच्या धुरीणांनी स्वीकारले आहे. मर्यादेच्या कुंपणतही आपल्या विनयशील, आचाराशील वर्तनाने समाजासमोर कसा आदर्श ठेवावा याचे मूर्तिमंत रूप म्हणून श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्याकडे पाहिले जाते. याच आदर्शवत समाजव्यक्तित्वांना जाहीरपणे किळसवाण्या संवादात प्रत्यक्ष उतरवणे हे कर्त्यांच्या छिन्नविच्छिन्न मेंदूचे निदर्शक आहे. लेखक, निदर्शक, कलाकार अन या सगळ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विद्यापीठ या सगळ्यांच्याच निम्न पातळीवरील वैचारिक बैठकीचे उदाहरण म्हणजे हा प्रकार आहे.

फुले दाम्पत्यांनी सामाजिक उद्धारासाठी जे काही केले ते अवघा भारतवर्ष जाणतो. प्रसंगी शेणाचा मारही सहन केला. स्वतःच्या इच्छेसमोर दिनदुबळ्यांचे, शैक्षणिक मागासवर्गाचे हित प्रथम पाहिले. त्याच सावित्रीच्या नावाचा महिमा मिरवणाऱ्या विद्यापीठात हा प्रकार होण्यासारखे दुर्दैव नाही. विद्यापीठाने या सगळ्यांची गंभीर दखल घेतली असेलच, नसेल घेतली तर घ्यावी अन जे कोणी या गैरप्रकारांत सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, प्रसंगी त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तरी हरकत नाही. भविष्यातील देशाच्या संस्कृतिक मूल्यांचे आधारस्तंभ जर आपल्या वैचारिक निच्चतेचे असे ओंगळवाणे प्रदर्शन मांडत असतील तर असे स्तंभ उखडून काढायला हवेत. समाज उभा राहतो तो सामाजिक मूल्यांच्या संवर्धनाने, संगोपनाने. इथे विद्यापीठासारख्या मोठ्या व्यासपीठावर या मूल्यांची सर्रास धुळदाण होताना पाहावी लागतेय. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात असे कृत्य असहनीय तर आहेच पण समाजव्यवस्थेला बसलेली चपराकही आहे. 

हिंदू समाज प्रचंड सहनशील आहे. खरंतर याला सहनशीलता म्हणावी की षंढता हा चर्चेचा मुद्दा आहे कारण आपल्या आराध्यांवर अशी चिखलफेक झालेली केवळ आपणच सहन करू शकतो. जगात शेकडो धर्म आहेत, हजारो जाती जमाती आहेत. त्यांच्या पूजनीय व्यक्तित्वांवर हल्ला झाला तर गळेकापू मनोवृत्ती ताबडतोब जागी होते. सर्रास गळ्यावर सुऱ्या चालवल्या जातात. हिंदू समाज याचा पुरस्कार करत नाही मात्र याचा अर्थ असाही नव्हे की आपल्या देवत्वाचा असा अपमान व्हावा. एक समाज म्हणून आपल्याला या बाबींचा विचार करावा लागेल. कोणीतरी सहनशीलतेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची गरज आहे का याचा धांडोळा घ्यावा लागेल. गेल्या काही काळात योजनाबद्ध पद्धतीने हा प्रकार चालू आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. कोण याचे कर्ताकरविता आहे हेही सगळे जाणून आहेत. संकोचित मनोवृत्तेची फलनिष्पत्ती म्हणजे हा प्रकार आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यासपीठावर घडलेला प्रकार केवळ निमित्त आहे, आपल्याला या एकूणच सगळ्या प्रकाराचा फेरविचार करावा लागेल. एका सदृढ समाजरचनेसाठी एका मजबूत वैचारिक समाजाची जी गरज आहे, आपल्याला ही गरज प्रथम ओळखावी लागेल. बाकी सगळे सुज्ञ आहेतच...


संतोष काशीद