‘सेपरेशन एन्झायटी' आईलाही सतावते का ?

मागच्या महिन्यात कुठेतरी पेपरवर बातमी वाचलेली, मुलीपासून दूर राहिल्याने आलिया भट्ट सेपरेशन एन्झायटीची शिकार.. आणि तेव्हापासून या विषयावर बोलायचे मनात होते.

Story: आरोग्य |
10th February, 12:02 am
‘सेपरेशन एन्झायटी' आईलाही सतावते का ?

सेपरेशन एन्झायटी म्हणजे वेगळे किंवा विभक्त होण्याची चिंता. ही एन्झायटी कोणामध्ये दिसून येऊ शकते. जास्त करून कामाधंद्याच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणास्तव जेव्हा आई आपल्या मुलापासून सवय नसता दूर जाते, तेव्हा मुलाला काही काळ सेपरेशनएन्झायटीचा त्रास होऊ शकतो. लहान मुलांमध्ये पहिल्यांदा आठ महिने ते एक वर्ष वयापर्यंत आई किंवा त्यांना सांभाळणारी महत्त्वाची व्यक्ती यांच्यापासून ताटातूट होण्याची भीती दिसून येते. पण जेवढी ही स्थिती लहान मुलांवर परिणाम करू शकते, तेवढीच आईही त्याचा बळी होण्याची शक्यता असते. यावर वेळीच उपाय न केल्यास ही एन्झायटीची स्थिती तीव्र नैराश्याचे रूप धारण करू शकते. याचा नकारात्मक परिणाम आईच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. 

सेपरेशन एन्झायटी म्हणजेच विभक्त होण्याच्या चिंतेची अनेक कारणे असू शकतात. एक स्त्री आई होताच एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी तिच्यावर असते. तिच्या मनात आपल्या तान्ह्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण झालेली असते. ती आपल्या बाळाशी एकरूप झालेली असते. त्यानंतर अचानक त्यात झालेला बदल, आपला बाळ समोर नसणे हे तिच्याही मनाला सोसवत नाही.

आपल्या शरीरातील हार्मोन्स या एन्झायटीचे एक महत्त्वपूर्ण कारण असू शकते. मातृत्वामुळे आईच्या हार्मोन्समध्ये असंतुलन होते. हार्मोन्सचा अतिरेक किंवा कमतरता आई आणि मुलाच्या वर्तनात विकृती निर्माण करते. या कारणामुळे विभक्त होण्याची चिंताही उद्भवते. अशा परिस्थितीत आई बाळापासून काही काळही दूर राहू शकत नाही. विभक्त होताच एन्झायटी वाढते व ते विचित्र वागू लागते.

आपल्या मनात असाही विचार येऊ शकतो की आई आणि मुलामधील नैसर्गिक प्रेम अन् ओढीमुळे असे घडू शकते. पण मातृत्वाचे आव्हान व कामाचा तोल सांभाळताना नैराश्याशी झुंज देणे किती कठीण जाऊ शकते हे त्याचा सामना करणारी एक आईच सांगू शकते.

पूर्ण आयुष्य कुठे आपण मुलांसोबत असतो? मुलांना आई समोर नसताना रहायची सवय जेवढ्या लवकर करतो तेवढी बरी, असे लोकांना वाटते. पण एका आईला या स्थितीतून जाताना आलेल्या चिंता व नैराश्याचे अनेक तोटे असू शकतात. परिणाम स्वरूपी पुढील काही लक्षणे दिसून येऊ शकतात.

चिंतेमुळे कामावर पूर्ण लक्ष देऊ न शकल्याने आईच्या करिअरकडे दुर्लक्ष होऊ शकते.

बाळाच्या आणि आपल्या नात्यात दुरावा येण्याची आईला सतत भीती राहते.

मुलांच्या अनुपस्थितीत कोणतेही काम करावेसे वाटत नाही.

चिडचिडेपणा वाढू  शकतो.

नवीन काही विचार करण्याची शक्ती बिघडते.

सतत अपराधीपणाची भावना मनात राहते.

हृदयाचे ठोके वाढणे, मळमळ, डोकेदुखी होऊ शकते

सेपरेशनएन्झायटीमुळे आलेले नैराश्य व चिंतेवर उपचार करण्यासाठी मनोचिकित्सक संज्ञानात्मक वर्तन थेरपी (सी.बी.टी.) याचा वापर करू शकतात. यामध्ये समुपदेशन आणि कार्येही दिली जातात. जर स्थिती गंभीर असेल, तर चिंताविरोधी औषधांचा देखील अवलंब केला जातो. अश्या तऱ्हेच्या नैराश्य आणि चिंतेला सुरुवातीला उपचारांची आवश्यकता नसते. आपली लक्षणे स्वतः ओळखून ती कमी करता येते. सेपरेशन चिंतेचा सामना करण्यासाठी विभक्त होण्याचा सराव करणे सुचविले जाते. जर आईने अगदी सुरुवातीपासूनच वेगळे राहण्याचा सराव केला, म्हणजे अधूनमधून वेगळे राहण्याची सवय लावली, तर विभक्त होण्याची चिंता बऱ्याच अंशी कमी होते. तसेच जेव्हा वेगळे होण्याची चिंता नैराश्याचे रूप धारण करू लागते तेव्हा त्यावर चिंताविरोधी औषधांच्या मदतीने उपचार केले जातात. 

आपल्या मुलांची काळजी घेणे देखील आईला आपला तणाव कमी करण्यास मदत करते. आपल्या लहान मुलांसोबत वेळ घालवताना किंवा त्यांची काळजी घेताना, आपला मेंदू ऑक्सिटोसिन होर्मोन सोडतो. ऑक्सिटोसिन हा न्यूरोट्रांसमीटर आपल्या सहानुभूतीशील मज्जासंस्थेला शांत करते आणि आपली चिंता कमी करते. स्वत:ची एन्झायटी ओळखून, त्याबद्दल इतर कोणाशीही बोलल्याने चिंता कमी होण्यास मदत होते. आपल्या मुलापासून दूर राहण्यासाठी स्वतःला मनातून तयार करा. नकारात्मक परिणामांचा विचार करता मुलापासून दूर राहण्याचा सराव करा. स्वतःशी धीर धरा व हळूहळू आत्मविश्वास वाढवा.

तसे बघता सेपरेशन एन्झायटी ही तणावाला एक अनुकूल प्रतिसाद आहे. पण हा प्रतिसाद आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणू शकतो आणि आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी स्वतःला तयार ठेवा व सेपरेशनएन्झायटीला लढा द्या.

डॉ. श्वेता राऊत मुळगावकर