चोर चोर! चोर चोर !

Story: छान छान गोष्ट |
03rd February, 10:31 pm
चोर चोर! चोर चोर !

ते सुगीचे दिवस होते. ज्वारीची भरगच्च कणसं वाऱ्यावर डोलत होती. शेतकऱ्याची मेहनत फळाला आल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. 

चिऊताई आपल्या चोचीतनं ज्वारीचे दाणे घेऊन जात होती. चिऊताई पिकांवरले किडेही गट्टम करायची म्हणून शेतकरी तिला तिचा हिस्सा नेऊ देत होता. गोटू उंदीर मात्र शेतकऱ्याच्या शेताची जाम नासधूस करी म्हणून शेतकऱ्याने त्याला शेतात येण्यास मनाई केली होती.

संध्याकाळी चिऊताईने आपल्या पिलांना न्हाऊमाखू घातले. मग ज्वारी दळून त्याच्या भाकऱ्या केल्या. भाकऱ्या अगदी टम्म फुगल्या.

"टम्म टम्म भाकरी फुगली

भाकरी फुगता

पिल्ले हसली..." चिऊताई गाणे गात पिलांना भरवू लागली.

त्या झाडावर चढलेल्या गोटू उंदराला भाकरीचा खरपूस वास आला. त्याची भूक चाळवली.

"भाकरीचा घास किती गोड गोड

चिऊआईच्या मायेस नाही तोड तोड

भाकरीचा घास किती गोड गोड

चिऊआईच्या मायेस नाही तोड तोड"

पिल्लं असं गाणं गाऊ लागताच चिऊताई खूश झाली. तिने पिलांना आंजारलं गोंजारलं, त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. थोड्या वेळातच झाकपाक करुन पिलांना कुशीत घेऊन चिऊताई कापसाच्या गादीवर झोपी गेली.

गोटू उंदीर मात्र टक्क जागा होता. तो दबक्या पावलांनी चिऊताईच्या घरट्यात शिरला. त्याने आपल्या दातांत धरून फणसाच्या पानाचा द्रोण आणला होता. त्यात त्याने ज्वारीचं पीठ भरलं व दातांत द्रोण धरून तो तिथून पसार झाला.

सरसर उतरून तो बिळाकडे गेला. उंदरिणबाई वाट पहात बसली होती. "किती ओ उशीर? मुलं केव्हाची वाट पहाताहेत. अगं बाई! आणि हे काय?"

"ज्वारीचं पीठ आणलंय ताजं ताजं."

"अय्या ज्वारीचं पीठ! कुठे मिळालं तुम्हाला?"

"चिऊताईच्या घरट्यात. तिच्या घरट्यातून भाकरीचा खरपूस वास येत होता. ती झोपताच मी माझं काम फत्ते केलं. चल चल भाकऱ्या कर पटापटा. भूक लागलेय जोराची."

उंदरिणबाई परात, पाणी घेऊन पीठ मळू लागली. तिने चूल पेटवली न पीठ मळायला घेतलं. एक गोळा एक भाकर, एक गोळा एक भाकर... भाकर टम्म फुगायची मग उंदराची पिल्लं हातात हात घालून गाणं गायची

फुगा फुगा भाकर फुगा

आत मऊमऊशार गाभा

बुडकुल्यातंलं दही नि भाकरी उंदिर जोडप्याने व मुलांनी भरपेट खाल्ली व सूस निजली.

दुसऱ्या दिवशीही चिऊताईने दाणे आणले. भाकरीसाठी पीठ घेऊ गेली तर तिला पीठ कमी वाटलं. तिने परत जातं काढलं. दळण दळलंं. भाकऱ्या करुन पिलांना खाऊ घातल्या. 

चारेक दिवस सतत पीठ कमी होतय असं दिसून येताच ती कुकुचकु पोलीसाकडे गेली. तिने त्याला आपली तक्रार सांगितली. कुकुचकु पोलिसाने कुकुचकु करत अंग ताठ करुन एक बांग दिली व चिऊताईच्या कानात काही सांगितले. 

चिऊताई बरं म्हणत घरट्यात आली. तिने पिलांना खाऊ घातलं व निजली. निजली कसली निजायचं ढोंग केलंन. साधारण बाराच्या सुमारास उंदरोबा तिच्या घरट्यात आला. तिचं पीठ द्रोणात भरू लागला.

चिऊताईने लाटणं उंदरोबाच्या पाठीवर सटकावलं. पुन्हा एक, पुन्हा एक. "अगं आई गं. लागतय गं! चुकलो चु चु चुकलो. मला माफ कर चिऊताई."

चिऊताईची पिल्लं जागी झाली. त्यांनी एकच गलका केला. "चोर चोर! चोर चोर! उंदीरमामा चोर चोर!" उंदीर कसाबसा तिथनं पळाला. उंदरिणबाई वाट बघतच होती. "अय्या पीठ नाही आणलंत?" उंदराने तिला आपली फजिती सांगितली.

उंदरिणबाई म्हणाली, "अगदीच धांदरट आहात. नक्कीच तिथे खूडबुड केली असेल तुम्ही म्हणून तिला जाग आली असणार. तुमच्याच्याने एक काम धड होईल तर शपथ! पडा आता. मी पेजभात करते."

दुसऱ्या दिवशी कुकुचकु पोलीस गोटु उंदराच्या घरी हजर.

"कुकुचकु कुकुचकु

पीठचोराला पकडून न्हेऊ

कुकुचकु कुकुचकु"

"प... प... प... पोलीस, आमच्या घ... घ... घघरी क... क... क... कशाला." उंदरिणबाई दातखिळी बसायची वेळ आली. गोटु उंदीरही पोलीसांना पाहून थरथर कापू लागला. उंदराच्या पिल्लांनी तर चड्ड्या ओल्या केल्या. 

"गोटु उंदरा, तू चिऊताईचं ज्वारीचं पीठ चोरलस नं आणि उंदरीणबाई तुम्ही चोरलेल्या पीठाच्या भाकऱ्या थापलात नं म्हणजे तुम्हीही चोरीत सहभागी. चला आता पोलीस चौकीत. तुमच्या बुडाखाली विस्तव लावतो न तुमच्या पाठीवर भाकऱ्या थापतो." आपला लाल तुरा दिमाखात हलवत कुकुचकु पोलीसाने त्या दोघांना दटावलं. 

गोटू उंदीर कुकुचकु पोलीसाच्या हातापाया पडू लागला. उंदराची पिल्लंही रडू लागली, म्हणू लागली, "नका नं आमच्या आईबाबांना घेऊन जाऊ..ऊं ऊं ऊं."

तेवढ्यात चिऊताई तिथे आली. ती कुकुचकु पोलीसाला म्हणाली, "पोलीसदादा... पोलीसदादा... सोडा त्यांना सोडा त्यांना." उंदीर उभयतांनी चिऊताईची माफी मागितली व आभार मानले.

चिऊताई म्हणाली, "गोटु उंदरा, अरे चोरून खाणं सगळ्यात वाईट. ही घे ज्वारीची पोटली. घाला पिल्लांना भाकऱ्या करून. आणि काहीतरी नेक काम करत जा, मेहनतीने पैसे कमवा." उंदीर मामा म्हणाला, "चिऊताई, तू आज मला मानहानीपासून वाचवलंस. मी वचन देतो की पुन्हा चोरीमारी करणार नाही."

त्या घटनेनंतर गोटू उंदराने कधी चोरीमारी केली नाही.


गीता गरुड