रस्त्याचा अंदाज न आल्याने सिर्ली धर्मापूर येथे झालेल्या चारचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
15th January, 12:43 pm
रस्त्याचा अंदाज न आल्याने सिर्ली धर्मापूर येथे झालेल्या चारचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

मडगाव : सिर्ली धर्मापूर येथे रविवारी रात्री कारचालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने भरधाव कार झाडाला आदळली. यात जखमी चालक सत्या तोमर याला इस्पितळात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवडे नावेली येथील रहिवासी सत्या राजकुमार तोमर हा २९ वर्षीय युवक चारचाकीने रात्री मडगावकडून कुंकळ्ळीच्या दिशेने जात होता. रात्री १.१५ वाजता चालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या अपघातात चालक सत्या राजकुमार तोमर यास गंभीर दुखापत झाली व रक्तस्रावही झाला. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

सत्या तोमर हा मडगावातील चार्ली टेलर्सच्या मालकांचा मुलगा आहे. त्याला याआधी ऑगस्ट २०२० मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात मडगाव पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती व त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाक्याही जप्त करण्यात आल्या होत्या.